नेहाच्या शेजारी एक नवीन बाई राहायला आली होती. ती बाई आणि तिचा लहान मुलगा, भाड्यानेच राहायला आले होते. नेहाला नवीन लोकांशी मैत्री करायला आवडायचे. त्यामुळे तिने घरी पूजा ठेवली होती; तेव्हा तिलाही बोलावले होते.
ती आली नाही. नेहाला थोडं वाईट वाटलं. ती बाई सकाळीच कामाला निघून जायची आणि मुलाला बहुतेक पाळणाघरात ठेवत असे. येता जाता नेहाच्या नजरेस ती पडली की नेहा स्माईल देत असे, पण ती मात्र स्वतःच्या वेगळ्याच दुनियेत असायची.
नेहाला तिचे वागणे जरा वेगळेच वाटायचे. एक दिवस, ती तिच्या नवऱ्याला म्हणाली,
“आपल्या शेजारी जी नवीन बाई राहायला आली आहे, ती अजिबात बोलत नाही आणि तिच्याकडे बघून स्माईल दिली तरी ती काहीच रिस्पॉन्स देत नाही. मी आपल्या पूजेला तिलाही बोलावले होते तरी ती आली नाही.”
मोबाईल मध्ये डोकं खुपसतच नरेश म्हणाला,
“नेहा, हे बघ तिला जर बोलायचे नसेल तर नको बोलू दे. तू इतका का विचार करतेस? असतात असेही काही लोक ज्यांना चार लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. तिचेही तसेच असावे.”
नेहा तिच्या विचारांच्या तंद्रीत होती, नरेश बोलत होता तरी तिचे लक्ष नव्हते. नरेश मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला,
“नेहा, काय खोलवर विचार करते आहेस?”
“नरेश, मी हा विचार करते आहे की, ती असं का वागत असावी?”
नरेश कपाळाला हात लावत म्हणाला,
“म्हणजे, मी जे आता बोललो ते तू काहीच ऐकलं नाहीस?
प्रश्नार्थक नजर टाकत तिने नरेशला विचारले,
“तू काही म्हणालास का?”
नेहाचा गालगुच्चा घेत तो म्हणाला,
“नेहा, मी म्हणालो असतात काही लोक ज्यांना मिसळायला आवडत नाही. असेच त्या बाईचे असावे.”
नेहाने फक्त मान हलवली. नरेशला जाणवत होतं की, नेहा अजूनही त्या बाईचा खोलवर विचार करते आहे. नेहाला सतत विचार करायची सवयच होती.
नरेशने नेहाचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला,
“नेहा, ही तुझी विचार करायची सवय सोड. नको त्या गोष्टी विषयी विचार करायची काहीच गरज नाही. कोण ती कुठली बाई? ती काही आपल्या ओळखीची नाही. कुठून आली हे माहीत नाही? पुढे कुठे जाणार हे देखील माहीत नाही, तरी इतका विचार तू करत बसली आहेस. हे असे विचार करणे सोड. त्यामुळे तुलाच त्रास होणार, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तू जे कार्यक्रम बघते ना, ते आधी बघणे बंद कर. चांगल्या डोक्याची पूर्ण वाट लावतात असले कार्यक्रम. सतत संशयाचे जाळं निर्माण करणे आणि ते सोडवणे इतकंच काय ते दाखवतात.”
नेहा लटक्या रागातच म्हणाली,
“माझ्या प्रोग्रामला अजिबात काही बोलायचे नाही हा सांगून ठेवते.”
“बरं! काही बोलत नाही, मी आपला झोपतो. उद्या कामावर लवकर जायचे आहे .” असे म्हणत त्याने रूमची लाईट बंद केली.
नरेश तर लगेच झोपून गेला; पण नेहा मात्र अजूनही विचारांच्या तंद्रीतच होती.
कोण असेल ती शेजारची बाई? नेहा विनाकारण विचार करते आहे का खरंच काही गुपित आहे?
क्रमश:
फेरी : तिसरी. रहस्य कथा.
अश्विनी ओगले.
कसा वाटला पहिला भाग जरूर कळवा. भाग आवडल्यास एक लाइक आणि शेअर जारूर करा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा