Login

भ्रमिष्ट कोण? भाग आठ

काय त्यांना उलटसुलट बोलताय? आता गाडीखाली चिरडला गेला असता, तुमचा जीव गेला असता. तुमचं नशीब चांगलं जे ह्या भाऊने तुम्हाला वेळेवर बाजूला खेचले.”



गेल्या भागात आपण पाहिले की, राज नेहाला मनातून नकारात्मक विचार काढायला सांगतो. नेहाला चांगले वाटते. आता पाहू पुढे.

राज लगेच दुसऱ्या दिवशी महाबळेश्वरला फिरायला जाण्यासाठी गाडी बुक करतो.

तिघेही महाबळेश्वरला जातात. तेथील निसर्गाची सुंदरता, थंड वातावरण, वेगवेगळे पॉईंट्स पाहून नेहा खूप प्रसन्न होते, तिला पाहून राज आणि नरेशही खुश होतात.

संसाराच्या जबाबदारीत पडल्या पासून नेहा असे बाहेर फिरणे विसरलीच होती आणि नरेशही नेहमी ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा, त्यालाही अशी खास फिरायची हौस नव्हती. सुट्टी असली की तो घरातून बाहेर पडायला मागत नसे; त्यामुळे नेहाला देखील घरात रहावे लागत असे.

किती तरी वर्षाने ती निसर्गाच्या सानिध्यात आली होती, एक वेगळीच शांतता मनाला वाटत होती. आतून खूप शांत शांत वाटत होते. वेगळीच अनुभूती.
ना कसली धावपळ, ना कसले विचार. ना कसला गोंगाट.

चार दिवस कधी निघून गेले कळले नाही. ती खूप रीफ्रेश झाली. त्या चार दिवसात निसर्गाने तिला जणू नवसंजीवनी दिली होती.

तिच्यात वेगळाच उत्साह संचारला होता.

पूर्वीची नेहा परत आली होती.
डोक्यातील सारे नकारात्मक विचार दूर झाले होते.

एक दिवस,
भाजी आणायला ती घरा बाहेर पडली, तर काळी मांजर आडवी आली.
त्या काळ्या मांजरीला पाहून ती दोन मिनिट थांबली.
तिच्या मनात पुन्हा विचारांचा खेळ सुरू झाला.
‘मांजर आडवी जाणे अशुभ आहे.’
‘नेहा, असं काही नाही प्राणी आहे. समोरून गेला म्हणजे अशुभ घडणारच असे नाही’

तोच तिला ती शेजारची बाई समोरून येताना दिसली.
नेहाने तिला बघून न बघितल्या सारखे केले.
तिच्या डोक्यात पुन्हा विचारांचा खेळ सुरू झाला.
‘मांजर पण आडवी गेली आणि ही दिसली, देव जाणे काय होते काय माहीत?’

तिचं मन पुन्हा बजावत होते,
‘असे काहीच नाही नेहा. तू पुन्हा असे विचार करू नकोस.’

विचारांच्या तंद्रीतच ती चालू लागली.
तिला आजूबाजूचे अजिबात भान राहिले नव्हते.
तोच समोरून एक कार भरधाव वेगाने आली.
नेहाने ती कार बघितली, पण विचारात गर्क असल्या कारणाने तिला बाजूला व्हायचे भान राहिले नाही.

तिचे नशीब चांगले म्हणायचे, ड्राईवरने लगेच ब्रेक दाबला. तिच्या बाजूला चालणाऱ्या माणसाने तिला हात पकडून ओढले.
हे सर्व होऊन देखील तिची विचारांची साखळी काही संपत नव्हती.

सर्व माणसं गोळा झाली.
ज्याने तिला वाचवलं, तो माणूस तिला म्हणाला.
“मॅडम, ठीक आहात ना तुम्ही?”
“मला काय झाले? मी ठीक आहे.” नेहा निर्विकार चेहऱ्याने म्हणाली.
“अहो मॅडम जरा लक्ष देऊन चाला की रोडवर.” तो माणूस म्हणाला.

नेहाला त्याचा राग आला.
“तुम्ही कोण मला शिकवणारे? मला चांगलेच समजत कसं रोडवर चालायचे.” ती त्याला रागातच म्हणाली.

आजूबाजूची माणसं तिला आश्चर्याने बघू लागली.
तो माणूस तिच्याच भल्यासाठी बोलत होता आणि ही त्यालाच रागारागाने बोलत होती.

त्या गर्दीतून एक बाई आली आणि तिला म्हणाली,

“ओ ताई, हे तुमच्या भल्यासाठीच बोलत आहे आणि तुम्ही काय त्यांना उलटसुलट बोलताय? आता गाडीखाली चिरडला गेला असता, तुमचा जीव गेला असता. तुमचं नशीब चांगलं जे ह्या भाऊने तुम्हाला वेळेवर बाजूला खेचले.”

जीव गेला असता हे ऐकून नेहा गार पडली.

आजूबाजूला नजर फिरवली तर सर्व लोकं तिलाच पाहत होते.
तिने त्या माणसाची माफी मागितली.
हा प्रसंग घडल्यामुळे ती खूपच घाबरली.
‘आज माझा जीव जाता जाता राहिला आणि कळलं देखील नाही.’
तिला लगेच ती बाई आणि काळी मांजर आठवली.

क्रमश:

कसा वाटला आजचा भाग नक्की कमेन्ट मध्ये सांगा. भाग आवडल्यास लाईक, शेयर जरूर करा. माला फॉलो करायला विसरू नका.
धन्यवाद.

🎭 Series Post

View all