Login

भ्रमिष्ट कोण? भाग १४ अंतिम

कधी नव्हे ते मी काळा जादू वैगेरे अश्या गोष्टींवर सर्च करू लागले.

गेल्या भागात आपण पाहिले की कांता तिच्या भूतकाळातील सर्व घटना नेहाला सांगते. नेहाला फार वाईट वाटते. तिच्या विक्षिप्त वागण्याचे रहस्य नेहाला आज कळते.

आता पाहू पुढे.

"कांता, हे सर्व ऐकून खूपच वाईट वाटले. तुझा भूतकाळ खूपच भयावह आहे, मला ऐकूनच इतका त्रास झाला, तू तर सगळं सहन केले आहेस.

मी जेव्हा तुला पूजेला बोलावलं तेव्हा तू आली नाहीस, तेव्हाच मला तुझ्याविषयी वेगळं काहीतरी वाटलं.


कांता लक्ष देऊन ऐकत होती.

कांता हसतच बोलली,

" ताई, खरं तर माझं असं वागणं हे समाजासाठी विक्षिप्तच आहे आणि त्यात तुम्हाला जे हळदकुंकू लावलेलं लिंबू सापडलं त्याच्यामुळे माझ्याविषयी तुमच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले."

हे ऐकताच नेहाचे डोळे चमकले.

कांता पुढे बोलू लागली,


"खरंतर, त्यादिवशी मी देवपूजा करत होते आणि यश खेळत होता. खेळत असताना त्याला कॅडबरी खायची इच्छा झाली, तो फ्रीजमध्ये कॅडबरी शोधू लागला. कॅडबरी तर सापडली नाही, पण त्याच्या हाताला लिंबू लागले आणि लिंबूसोबत खेळत असताना तो माझ्याजवळ आला. हळद कुंकवाचा करंडा तिथेच होता आणि जसं मी देवाला हळद-कुंकू लावत होते, तसं त्याने ते लिंबूला लावले आणि खेळता खेळता नंतर बाहेर फेकून दिले. ते लिंबू बाहेर फेकल्यावर मी ते आणायला जाणार होते तोच, मी पाहिले की तुम्ही दरवाजा उघडत आहात; म्हणून मी आत गेले.


तुम्ही ते लिंबू फेकून दिले. त्यानंतर तुमच्या मुलाचा अपघात झाल्याचे कळले, मी ते फोनवरचे बोलणे ऐकले होते. मला तेव्हा जाणवले ते हळद-कुंकू लागलेले लिंबू आणि तुमच्या मुलाचा होणारा अपघात ह्याचा तुम्ही नक्की संबंध लावणार.

असं वाटत होतं, तुम्हाला येऊन सगळं सांगावं, पण मीच माझ्यासाठी एक सीमारेषा आखली होती. एक चौकट होती, त्याच्यातून बाहेर पडू शकत नव्हते. त्यानंतर तुमच्या मनात माझ्याविषयी नको नको ते विचार येऊ लागले. तुमचं बाहेर जाणं कमी झालं.

मला जी शंका होती, ती खरी ठरली. तुमचं नेहमीचं वागणं बदललं होतं. मी तुमच्याशी बोलत नव्हते, तरी देखील मी तुमचे वागणे बघत होते. त्यानंतर राज जेव्हा यश सोबत खेळत होता; तेव्हा देखील मी अशीच वागले.

खरंतर एका आईसाठी ही खूप आनंददायी गोष्ट आहे की, तिच्या मुलाला कोणीतरी दुसरं जीव लावत आहे; पण हे जीव लावणे मला खूप महागात पडलं होतं. मला माहित नाही यश, राज सोबत खेळत असताना पाहून प्रचंड राग आला. मला त्या आजीची आठवण आली. मला ते सारे दिवस आठवले, जे माझ्यासोबत घडले होते.

\"एकदा जीभ पोळली असेल, तर माणूस ताकही फुंकून पितो\" अगदी तसेच झाले माझे. मला कोणाशीच संपर्क ठेवायचा नव्हता. कोणाशीच नाही, अगदी तुमच्याशीही नाही. खरंच कधी कधी असं वाटायचं सरळ कुठेतरी लांब निघून जावं; पण ते शक्य नव्हते. थोड्या दिवसाने वरच्या मजल्यावर काम चालू होते आणि त्या एका कामगारांपैकी एका व्यक्तीच्या हातून काळा रंग पायरीवर पडला होता, तेव्हाही तुमच्या मिस्टरांचा पाय मुरगळला होता.

मला नेहमीच जाणवत होते, काहीही झाले तरी तुम्ही माझ्यावरच शंका घेत असणार. खरंतर मी तुम्हाला त्रास देण्यासाठी काहीच केले नव्हते. ज्या दिवशी तुमचा अपघात होता होता वाचला, त्या दिवशी देखील मी तुम्हाला दिसले होते. मी खिडकीमध्ये कपडे वाळत घालत होते, तेव्हाच मी पाहिले, तुमचा अपघात होता होता वाचला. हे सर्व काही एकापाठोपाठ असे घडले त्यामुळे माझ्यावर तुम्ही संशय घेऊ लागलात.


ताई एकच सांगेन, भले मी तुमच्याशी संबंध ठेवले नाही; पण तुम्हाला त्रास व्हावा म्हणून मी असे काहीच केले नाही.

हे ऐकून नेहाच्या मनावरचे ओझं हलकं झाले.


"कांता,मला माफ कर मी विनाकारण तुझ्यावर संशय घेत राहिले. तू जे काही म्हणाली ते बरोबर म्हणालीस. ते हळदकुंकू लावलेलं लिंबू, पायऱ्यावर काळा रंग, तुझं दिसणं आणि माझा अपघात होणं ह्या सर्वांचा संबंध मी तुझ्याशीच लावला. मी स्वतः तुला घाबरत होते. त्यात लता काकूंनी त्यांचा अनुभव सांगितला तेव्हापासून तर अजूनच घाबरले.

कधी नव्हे ते मी काळा जादू वैगेरे अश्या गोष्टींवर सर्च करू लागले.

एक भीती डोक्यात आणि मनात बसली. मी डिप्रेशन मध्ये गेले.

राज, नरेश दोघेही मला समजावत होते , असे काही नसते, पण डोक्यात संशयाचे भूत इतके खोलवर गेले होते की, मी भ्रमिष्ट झाले होते.


तुझ्याविषयी मी फार चुकीचा विचार केला.
आता मला माझ्याच विचारांची लाज वाटते आहे.

अगदी यश जेव्हा दार ठोकत होता तेव्हादेखील मी राजला दार उघडण्यास मनाई करत होते. मी फार विचित्र वागले. मी असे वागायला नको होते. मला माफ कर कांता."

नेहाने हात जोडून माफी मागितली.


"ताई, माफी नका मागू. तुमच्या ठिकाणी जर मी असते तर मी देखील हेच केले असते. माणूस असा मुद्दामून वागतच नाही,पण काही घटना अश्या घडतात, लोकं जेव्हा क्रूरपणे वागतात,विश्वासघात करतात,मुखवटा धारण करतात तेव्हा माणूस भ्रमिष्ट वागतो."

आज सारे गैरसमज दूर झाले होते.


राज यशला घेऊन येतो. यश कांताला घट्ट बिलगतो आणि पापी घेऊ लागतो.

कांता आणि यशला पाहून, नेहा आणि राजच्या डोळ्यात पाणी येते.

नेहाच्या डोक्यात एक प्रश्न अजूनही घुमत राहतो,

खरंच भ्रमिष्ट कोण?
हा समाज जो एखाद्या व्यक्तीला असे विक्षिप्त वागण्यास भाग पाडतो?
का ती व्यक्ती जी समाजाचा खरा चेहरा समजण्यास चुकते?

तुमच्याकडे ह्याचे उत्तर असेल तर नक्की द्या.

हो आणि कांताचे रहस्य तुमच्याकडेच राहू द्या. कोणालाही सांगू नका.


समाप्त.

ही कथा पूर्णतः काल्पनिक होती. ह्याचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवंत व्यक्तीशी नाही. असल्यास योगायोग समजावा. कथा कशी वाटली कंमेंटमध्ये नक्की सांगा. मला फॉलो करायला विसरू नका.

धन्यवाद.

 

🎭 Series Post

View all