Login

परावलंबित्व नक्की कोणाचं ?

This article tries to create awareness about women's and what we can do to start a new way of thinking in the society.As human beings we should give everyone equal right to live.

 शिर्षक : परावलंबित्व नक्की कोणाचं ?

विषय: स्त्री आणि परावलंबित्व

फेरी: राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा


मी नाही नाही म्हणतांना,
का लादली बंधने?
मी श्वास घेऊ पाहत होते,
अन का दाबली स्पंदने?
नाही अहो, वाचण्या अगोदर इथून जाऊ नका. स्त्रियांचं नेहमीचं रडक गाऱ्हाणं सांगून सहानुभूती एकत्रित करण्याचा प्रयत्न जराही नाहीये.
मग खरं तर स्त्री आणि परावलंबन हा विषय , हा मुद्दा मला मुळीच मान्य नाही आणि मी याचा तीव्र प्रतिकार करते, असं म्हणून मला देखील त्या पंगतीत बसायचं नाहीये ; जिथे एक तर स्त्री पुरुष भेदभाव होतो किंवा एकाची बाजू उचलून धरली जाते.
म्हणून नारीवादी भाषण छापण्याचा माझा जराही हेतू नाही.
मग काय मी हे मान्य करते की स्त्रिया आणि परावलंबित्व यांचा निकटचा संबंध आहे ?
क्षितिज माहिती आहे का ? हो तेच जमीन आणि आभाळाची मिलन रेषा ...जी आपल्याला फक्त दिसते सापडत कधीच नाही ,तरीसुद्धा मनाला भुरळ घालायला पुरेशी असते.
स्त्री आणि परावलंबित्व हा विषय ही मला त्याच क्षितीज रेषेसारखा दिसतो. आपल्यात समाजातील लोकांनी निर्माण केलेली एक विचारहीन कल्पना.
या विषयाकडे वळताना मला काही प्रश्नांपासून सुरुवात करावीशी वाटते, का खरंच एखादी स्त्री, एखादी मुलगी इतकी असक्षम असते की, साधं दुकानात जाताना तिच्या सोबत पाच वर्षांचे मुल पाठवले जाते.
जेव्हा की हे सत्य सगळ्यांनाच माहिती आहे की, खरोखर तिच्यासोबत काही वाईट झालं तर ते पाच वर्षांचे मुल काहीच करु शकणार नाही. पण तरीसुद्धा त्याला रक्षक बनवलं जातं आणि त्याच्या मनात ही मानसिकता रुजू केली जाते की, स्त्री एक कमजोर व्यक्ती आहे आणि तुला तिचं रक्षण करायचं आहे.
मुलगी एक कमांडर किंवा आर्मी ऑफिसर का असू देत ना, तिच्या लग्नाच्या दिवशी तिच्या चार-सहा मैत्रिणी तिला पकडून मंडपात घेऊन जाणार आणि तिलाही हळूहळू चालावं लागणार अगदी नजर खाली रोखून, मी विचारते का ?
खरंच या गोष्टींची गरज आहे का ? मुलगा स्वतःच्या वरातीत नाचू शकतो आणि अगदी एखाद्या राजासारखा ताठ मानेने मंडपात बसू शकतो,मग तिने खाली मान का घालावी? लेफ्ट राईट करत सीमेवर तर ताठ मानेने चालते, मग इथे हे बंधन का लादले जाते?
एक लेखक आहे म्हणून नुसत्या काल्पनिक भराऱ्या मारुन वाचकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न मी मुळीच करणार नाही. थोडं तर्कशील पद्धतीने पाहूया.
पूर्ण देशाच्या लोकसंख्येत १०० पैकी ४८% स्त्रिया आहेत .
का एखाद्या देशाचा विकास शक्य आहे, हे बोलून की तिथली ४८% लोकसंख्या असमर्थ आहे? हे अगदी त्या क्षितिजासारखंच खोटं आहे.
देशाच्या विकासात स्त्रियांचाही समान वाटा आहे.
तरी पूर्ण जगातील रियल प्रॉपर्टी पैकी ८० % प्रॉपर्टीवर मुलांचं अधिपत्य आहे, तर फक्त २० % प्रॉपर्टीवर मुलींचं.
पूर्ण जगात केल्या जाणाऱ्या कामांमध्ये स्त्री ही पुरुषापेक्षा दुप्पट काम करते. पण तुलनात्मक पद्धतीने स्त्रियांच्या कामाचा दर्जा कमी आखून दिला जातो. जेव्हा की हेही तितकंच महत्त्वाचं असतं .
त्याशिवाय जी घरातील काम महिला करतात त्यांची आजपर्यंत कोणीच त्यांना सॅलरी दिलेली नाही.अग्रेसिव्ह पोस्ट ची म्हणजेच सो कॉल्ड सन्माननीय पोस्ट ची गोष्ट कराल तर न्यायाधीश या पदावर स्थित ९९% व्यक्ती हे पुरुष असतात.
९०% सॅलरी मुलंच उचलतात. पार्लमेंट मध्ये ८० % सीटवर पुरुषांचा अधिपत्य आहे.
हे तर झालं मोठ्या बाबींबद्दल, साध्या पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नुसत्या संविधानुसार आरक्षित जागा आहेत ,म्हणून स्त्रियांना निवडणुकीत उभं केलं जातं आणि निवडून आल्यानंतर त्यांचा राजकीय हस्तक्षेप झिरो होऊन त्यांचे परिजन वा कोणीही फॅमिली मेंबर किंवा त्यांचा नवरा तोच पुढाकार दर्शवतो.
ही सृष्टी ज्याने ही निर्माण केली असेल ,त्याने दोघांमध्ये कुठला फरक ठेवलेला नाही आणि जो फरक ठेवलेला आहे तो सुद्धा फक्त यासाठी की आपली रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित चालावी .त्याचा अर्थ हा मुळीच होत नाही की कुण्याही एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर अधिपत्य गाजवण्याचा हक्क मिळतो.
शिवाय भारतीय संविधानाने स्त्री आणि पुरुष यांच्यात कुठलाच भेदभाव केलेला नाही. मग तरीसुद्धा आपण भेदभाव करतो तर नक्कीच आपण संविधानाची अवहेलना करतो.
मिस्टर नारायण मूर्ती आणि मिसेस सुधा मूर्ती.
आजच्या प्रगतीशील भारतात ह्या पावर कपल ला ओळखत नाहीत असे फारच थोडके लोक असतील.जर तुमच्या डोळ्याखालून  ही नावं गेली नसतील तर इंटरनेटवर पाहू शकता.
स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक कसे असावेत त्याचं उत्तम उदाहरण. त्यांचे सगळे कार्य त्यांच्या आयुष्यातली सक्सेस पाहिली की डोळे बंद करुन हे म्हणता येऊ शकतं,
\"जेव्हा एक स्त्री आणि पुरुष एकमेकांना हात देऊन मागे किंवा पुढे चालत नाही, तर जेव्हा ते एकमेकांचा हात हातात घेऊन सोबत चालतात.\"
तेव्हा ते पूर्ण जगासाठी एक उदाहरण बनू शकतात.
हो ते आपल्या सगळ्यांपेक्षा खूप महान आहेत, पण वेगळे मुळीच नाहीत. वेगळेपण असेल तर त्यांच्या विचारांमध्ये आहे.
त्या दोघांनी खूप कमी वयात हे मान्य केलं,की कुठलीही स्त्री एखाद्या पुरुषावर अवलंबून नसते किंवा पुरुषही स्त्रीवर अवलंबून नसतो. हो निसर्गाने दोघांनाही एकमेकांचे पूरक बनवलं आहे एवढं खरं.
डबल स्टॅंडर्ड कशाला म्हणावे हे तर कोणी आपल्याकडून शिकावं, एकीकडे बिडी ओढायला साधे पैसे नसले तरी चालतील पण आपलं साम्राज्य पुढे चालवण्यासाठी वंशाचा दिवा प्रत्येकाला हवा असतो.
खरंच या विचारांवर दया येते, किती संवेदनहीन भावना आहेत आपल्या की, एकीकडे मुलीचं लग्न करून द्यावं लागेल ती एक मोठी जबाबदारी असते म्हणून मुलीला जन्म देण्यासाठी सुद्धा मागेपुढे पाहणारी मंडळी आपल्याला दिसून येते, किंबहुना गर्भातच तिची हत्या करणारेही....तर दुसरीकडे माझ्या प्रॉपर्टीचा माझ्यानंतर मालक कोण असणार म्हणून मुलासाठी आतुर झालेली.
संविधानाने वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हक्क दिला असतानाही मुलीला फक्त लग्नाच्या वेळी  त्या प्रॉपर्टी पैकी ५% रक्कम हुंडा म्हणून दिली जाते आणि बाकी उरलेल्या ९५ % मुलांचं अधिपत्य असतं.
मला इथे परत एकदा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की , जर मुलाला आणि मुलीला प्रॉपर्टी मध्ये समान वाटा मिळाला, तर तिला सासरी जाऊन किमान फायनान्शिअली तरी इतरांवर अवलंबून असण्याची गरज आहे का ?
माहेरी म्हटलं जातं की, मुलीला परक्या घरी जायचं आहे आणि सासरी म्हटलं जातं की ही परक्या घरुन आली आहे. तीच तर जणू घरच नाही.साधी तिच्या नावाची नेमप्लेट सुद्धा घरावर लावली जात नाही. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण नेहमी एका स्त्रीला सांगत असतो की, या सगळ्या तिच्या जबाबदाऱ्या आहेत, हक्क तर तिचा कशावरच नाही.
मग कशावर हक्कच नाही म्हणून ती पुरुषांवर अवलंबून आहे,असं म्हटलं जातं आणि मग कधीच न संपणारा हा वर्तुळाकार विषय इथेच मोठा होत जातो जेव्हा स्त्री सुद्धा स्वतःला परावलंबित समजते.
ठीक आहे एका नव्या जीवाला जन्म देणं ही तिची जबाबदारी असू शकते किंवा निसर्गाने मुद्दाम तिला दिलेली एक संधी.
पण जन्म झाल्यानंतर त्या मुलाला चालणं, बोलणं शिकवण्यापासून त्याची प्रत्येक जबाबदारी उचलणं हे फक्त स्त्रियांचेच काम आहे का? स्वतःच्या मुलांचं पालनपोषण करण्यास असमर्थ असणारा पुरुष या कामासाठी स्त्रियांवर अवलंबून नाही का?  स्वतः तर दररोज थाटात ऑफिसला जाणार पण नेमकं हेच विसरतो की,जॉब त्याच्या बायकोचाही आहे. पण तिचा टिफिन बनवून देणे म्हणजे आपल्यातल्या पुरुषात्वाला मान खाली घालण्यासारखं वाटतं आपल्याला.
सासू-सासर्‍यांची सेवा करणे हे तर प्रथम कर्तव्य असतं. म्हणूनच तर आज कालची संस्कारी पिढीतील मुलं लग्नाच्या पहिल्या रात्रीच बायकोला ठणकावून सांगतात की, माझ्या आई वडिलांचा जराही अनादर होता किंवा त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासतात कामा नये,कारण मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. हो तर मग प्रेम करतोस तर बाबांना सकाळचा चहा,वर्तमानपत्र संध्याकाळच्या त्यांच्या मेडिसिन्स,आईला देवपूजेसाठी फुलांपासून ते गुडघे त्रास देतात म्हणून तेल लावण्यापर्यंतचे काम स्वतः का करत नाहीत यासाठी तर ते स्त्रियांवर अवलंबून असतात. आईला साधा स्मार्टफोन गिफ्ट म्हणून दिला, किंवा शॉपिंग साठी पैसे दिले म्हणून स्टेटसला स्वतःची महानता मिरवणारी आजकालची तरुण पिढी हेच विसरते की, आईला या गोष्टींमधून एकच भावना देत आहात की,
ती तुमच्यावरही अवलंबून आहे. जेव्हा की तुमचं पूर्ण आयुष्य तिच्यावर डिपेंड असतं.
विषय आपला तो नाही पण रस्त्यावर रेप झाला,म्हणून किमान कॅण्डल मार्च तरी काढला जातो किंवा शिक्षा नाही होत ही गोष्ट वेगळी असली तरी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची तसदी तरी घेतली जाते. पण तीन पैकी दोन मुलींवर दररोज त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याच घरात बलात्कार होतो, त्याचा साधा विषयही काढला जात नाही. का शारीरिक वासनेला भागवण्यासाठी पुरुष स्त्रियांवर अवलंबून असतं नाहीत का?
ओहह प्लीज याला विरोधाभासी म्हणून असं म्हणू नका की, शारीरिक गरजा दोघांच्याही असतात, कारण संपूर्ण जगातला प्रॉस्टिट्यूट रेशो पाहिला तर स्त्रियांचीच संख्या आघाडीवर येते.मग हा व्यवसाय त्यांची मजबुरी का असो ना.
पण मग पुरुष स्वतःची वासना भागवण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून नसतो का?
मी लेखक आहे, तर यमक कुठेतरी जुळतातच आणि या सगळ्या विषयाला धरून माझा मोठा प्रश्न उद्भवतोच.
किती हे परावलंबित्व पुरुषांचं ?

या गोष्टीला विरामाकडे नेताना एक उदाहरण, भारतावर जेव्हा इंग्रजांनी राज्य केलं तेव्हा त्यांनी भारतातील जनतेला मृत्युदंड नाही दिले किंवा कुणालाही संपवण्याचा प्रयत्न नाही केला.
तर त्यांचे जात ,वर्ण, लिंग, भेद यावरून द्वेष निर्माण करुन एकमेकांत भांडण लावून दिली.
ते शक्तिशाली आणि आपण कमजोर आहोत अशी मानसिकता आपल्या मध्ये रूढ करवून दिली.
आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेच काम फक्त संख्येने जास्त असणाऱ्या पुरुषांनी महिलांविषयी केलं.
त्यांच्या मनात ही मानसिकता रुजवून दिली की, त्या पुरुषांपेक्षा कमी आहेत किंबहुना पुरुषांवर अवलंबित आहेत.
जेव्हा की त्यांनाही हे चांगलंच माहिती आहे अगदी इंग्रजांसारखंच ,\"की हे खरं नाहीये .\" तेव्हा या विरोधात खूप मोठ्या मोठ्या क्रांती झाल्या आणि आज स्त्री-पुरुषांच्या बाबतीतही ह्या क्रांती टाळण्यासाठी एक खूप छान मार्ग अवलंबला जातो तो म्हणजे फिजिकल  व्होयलेंस.
कधी कुण्या स्त्रीने मान वर काढण्याचा प्रयत्न केला की, तिच्यावर अत्याचार करुन तिचा आवाज दाबला जातो. वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा एखाद्या स्त्रीने जरी या सगळ्या व्यापातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ती मजबूर असते. कारण वेगळी होणार किंवा घटस्फोट घेणार तर समाजात उलटसुलट चर्चा होणार माहेरच्या लोकांची मान खाली जाणार आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिच्या मुलांचं काय होणार ? छान पद्धत आहे ना मैन्यूपुलेशनची.
आणि ह्या सगळ्या मानसिकता स्त्री हृदयात पेरण्याचं काम अगदी लहानपणापासून केलं जातं.
आता कसं ते सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष लहानपणीपासून घरात घडत असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून काय काय परिणाम तुमच्यावर झाले याचा विचार केला की सगळी उत्तर आपोआप मिळतील.
फक्त खेळण्यांमध्ये मुलींना घरघर भांडे देऊन त्यांचं काम घर सांभाळायच आहे हे शिकवण आणि मुलांना सुपरमॅन, बुलेट सारखे अग्रेसिव्ह गेम देवून त्यांचं मोठेपण दाखवणं असो की आपल्या सण समारंभात रक्षाबंधनाला भावाच्या हातावर राखी बांधून भावाचं बहिणीला रक्षणाचे वचन देणं असो.
इथे सुद्धा प्रश्नच उभा राहतो, भाऊ लहान असो किंवा मोठा का करावं भावाने रक्षण, तो खूप महान आहे म्हणून की स्त्री स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम नाही म्हणून.
ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपल्या पुढच्या पिढीला हाच संदेश देत आहोत की, स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव तर असतो, एक कमी तर एक जास्त असतो.
नकळत आजच्या जगातील  मॉडर्न मानसिकता असणारे आपणही ह्याच रूढी परंपरा फॉलो करत आहोत.
आणि ही सायकल कधीही न संपण्यासारखी वाटते म्हणून ही आपली नैतिक जबाबदारी असली पाहिजे की या विचारांना कुठेतरी वाचा फोडावी.
वर मी जे काही लिहिलं त्यात माझा हा उद्देश मुळीच नव्हता की, स्री एक दुर्बल घटक आहे आणि पुरुष त्यांच्यावर अत्याचार करतात किंवा असंही म्हणत नाही की, पुरुषचं स्त्रियांवर अवलंबून असतात‌ व स्त्रिया सर्व गोष्टीत सक्षम.
तर याचा पूर्ण अर्थ असा होता की,स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक असू शकतात. कोणी मोठा किंवा लहान असूच शकत नाही.
स्वतःची सत्सद विवेक बुद्धी वापरुन जेव्हा आपण एक तार्कीकता वापरून विचार करु आणि आपल्या पुढच्या पिढीला ही तोच विचार देऊ, तेव्हा या गोष्टीत कुठेतरी बदल होण्याची शक्यता दिसून येते .
शेवटी एक मुलगी म्हणून हे लिहिण्यामागची एक अपेक्षा व्यक्त करते की, किमान तुम्ही तरी तुमच्या घरातील स्त्रियांना ही जाणीव निष्ठुरपणे नाही करुन देणार की, त्या तुमच्यावर अवलंबून आहे जे की, तुम्हालाही माहिती खोटं आहे. जर तुम्ही महिला असाल तर तुमच्याकडे एवढीच अपेक्षा असेल. तुम्ही आधी स्वतःच्या मनाला ठामपणे बजावून सांगा की, तुम्ही कोणावर अवलंबून नाही आहात. जे की खरं आहे.
ह्या विचारांच्या प्रवाहाची गरज आहे कारण उज्वल भविष्य तेव्हाच शक्य असतं जेव्हा सगळ्यांना जगण्याची समान संधी मिळते.
म्हणून बोलते, हे वाचत असाल तर वाचल्यानंतरही गप्प राहू नका एखाद्या गोष्टीला समर्थन नसेल तर त्याविषयी बोला समर्थन असेल तर तुमचे मुद्दे ऍड करा कारण बोलल्याने चर्चा होतात आणि चर्चांमधून बदल.
कमेंट लाईक मॅटर करत नसले, तरी सुद्धा तुमचं याविषयी बोलणं खूप मॅटर करतं एका बदललेल्या समाजासाठी.