तिचा पगार हक्क कुणाचा... भाग १

A Story About Her Payment
तिचा पगार हक्क कुणाचा-भाग१


आश्विनी आज खूप थकलेली दिसत होती. तिची मानसिक अवस्था सुद्धा बरोबर नव्हती. त्यामुळे तिला दोन दिवस शाळेत रजा टाकावीशी वाटली. तसा अर्ज तिने लिहून शेजारच्या त्या शाळेत जॉब करणाऱ्या मैत्रिणीकडे आपल्या मुलीला अर्ज घेऊन पाठविले.
वसुधा मावशी, "माझ्या आईची तब्येत बरी नाही. उद्याचा व परवाचा दोन दिवसाचा रजेचा अर्ज आईने तुमच्याकडे शाळेतल्या मुख्याध्यापकांना द्यायला दिलेला आहे."

आश्विनीच्या इयत्ता सहावीत असलेल्या मुलीने, वसुधाला सांगितले. काय झालं अश्विनीला? थांब!
' मी येते तुझ्याकडे माझे काम आटपून. 'तशी वसुधा आश्विनी कडे गेली....
अश्विनीने एक, दहा बाय दहाची खोली भाड्याने घेतलेली होती. राहायला तेथे एक बेड. व तिथे स्टोव् व स्वयंपाकाची भांडी, तेथून शाळेत जायला सोपं व्हायचं. व मुलगी सुद्धा त्याच शाळेत बरोबर घेऊन जायची ती..
बेडवर वाचनीय पुस्तके व मुलीची अभ्यासाची पुस्तके. बस, एवढेच काय त्या खोलीचं सौंदर्य!

त्या खोलीने सुद्धा आश्विनीच्या त्या छोट्या संसाराला कवेत घेतलं होतं. ती खोली सुद्धा तिचा संसार पाहायची.
आश्विनी, का ग !अशी उदास आहेस आज... शाळेत तर चांगली बोलत होती सर्वांशी.
ए रिया! तो बल्ब लाव आधी. संध्याकाळ झाली आहे. आणि या सांजप्रहरी तुझी आई बेडवर लोळत आहे. कसं वाटतं ते....

अगं! या रिया ला सुद्धा तुझी काळजी वाटते आहे... वसुधा म्हणाली. वसुधा! मला आज ह्यांची खूप आठवण येते आहे.. मघाशी शाळेत, त्या मंजुषा मॅडमनी एक वाक्य म्हटले, की माझा पगार मला पूर्ण सासरी द्यावा लागतो. मला त्यातून माझ्या खर्चाला काही उरत नाही.
ते ऐकून मला, माझाच तिरस्कार वाटायला लागला. का कुणास ठाऊक! माझ्या मिस्टरांविषयी मला एक प्रकारची ओढ, सहानुभूती, प्रेम या सर्व भावनांचा कल्लोळ माझ्या मनात होत आहे. मला, मी माझीच अपराधी वाटत आहे. त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे. कशातच मन लागत नाही...

वसुधा म्हणाली, कशाला एवढा विचार करतेस? तुझा नवरा मनाने खूप चांगला आहे. असे नवरे दुर्मिळ असतात बरं! पण आपण त्यांच्या ह्या अशा सोशिक स्वभावाचा फायदा घेतो.
अश्विनी म्हणाली, तसे नव्हे ग! मी माझा जास्तीत जास्त पगार माहेरी देते. माझ्याजवळ खर्चाला सुद्धा मोजकेच ठेवते. मला माझ्या बहिणीचे शिक्षण, भावाचे लग्न ,वडील नसल्यामुळे माझ्यावर ही जबाबदारी आलेली आहे. मला तर माझ्या माहेरच्यांची जास्त काळजी वाटते. माझा नवरा माझ्या पगारातील एक रुपया सुद्धा मागत नाही. मी काय खर्च केला, माहेरी किती दिले ,कशाचाही त्यांना मोह म्हणून नाही.
बरं, सासरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यांचा पगार सुद्धा माझ्या पगारापेक्षा खूप कमी आहे. त्यांच्या बहिणीचा संसार सुद्धा माझा नवरा सांभाळतो. दोन बहिणींचे नवरे नसल्यामुळे नणंदा, आई-वडिलांचा औषधांचा खर्च त्यांनाच करावा लागतो. दीर सुद्धा काही कमावत नाही.
अशी परिस्थिती असताना सुद्धा ते त्यांच्या तुटपुंज्या पगारात हे सर्व करतात. बहिणींना भावाला, आई-वडिलांना सांभाळतात.
मी तर येथे एकटीच असते मुलीला घेऊन. तुला माहित आहे, ते दर आठवड्याला येतात. आमच्या दोघांचेही जॉब वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे आम्हाला असं सर्व जुळवून घ्यावं लागतं.
वसुधा हे सर्व ऐकत असताना, तिच्या मनात हाच प्रश्न निर्माण झाला, की लग्न झाल्यानंतर तिचा पगार नेमका कुणाचा? सासरचा, माहेरचा, की स्वतःचा....

हेच प्रश्नचिन्ह तिने अश्विनीच्या मनात निर्माण केले. ती घरी परतली.

अश्विनीच्या विचारांनी वेग घेतला. ताशी 100 च्या वेगाने तिचे विचार चक्र सुरू झाले. तिची मुलगी रिया, अभ्यासात गुंतलेली पाहून ती तशीच बेडवर पडून राहिली. एवढ्या छोट्याशा खोलीत कामे तरी काय असणार... वेळ मिळाला की वाचत बसायचं, किंवा रियाचा अभ्यास घ्यायचा...
तिने वसुधा जवळ दिलेला अर्ज मागे घेतला.
दुसऱ्या दिवशी तिने त्याच विचारात शाळेची तयारी केली. दोघी मायलेकी शाळेत गेल्यात. तिच्या मनात, वसुधाने टाकलेला प्रश्न तिला स्वस्थ बसू देत नव्हता. 'to be or not to be'च्या व्युव्हचक्रात गुरफटून गेली. खरंच की,'आपला पगार आपल्या हक्काचा, सासरचा, की माहेरचा! तिने हा प्रश्न दीर्घ सुट्टीत सर्व शिक्षकां समोर ठेवण्याचा विचार केला.

क्रमशः


छाया राऊत( बर्वे)
अमरावती