Login

चूक कुणाची?

चूक कुणाची?
चॅम्पियन ट्रॉफी 2025

चूक कुणाची?

शहरात नावाजलेली देशमुख इंडस्ट्रीज. चार पिढ्यांच्या अथक कष्टानं उभारलेलं हे साम्राज्य. मोठमोठे बंगले, आलिशान गाड्या, कारखाने, ऑफिसेस… समाजात देशमुख नावाचं वेगळंच स्थान. कुणाला त्यांची प्रगती पाहून ईर्षा वाटायची तर कुणी त्यांना यशाचं प्रतीक मानायचं.

घराचे मोठे सुदर्शन देशमुख, वडिलांकडून मिळालेलं व्यवसायाचं वारसास्थान स्वतःच्या मेहनतीनं दुप्पट वाढवलं होतं. त्यांचा चेहरा बिझनेस जगतात विश्वासाचं प्रतीक मानला जायचा. पण या वैभवाच्या आड एक मोठं दुःख त्यांना सतावत होतं ते म्हणजे त्यांची मुलं आर्यन आणि सिया.

दोघांनाही उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवलं गेलं. सुदर्शनना वाटलं होतं की तिथलं शिक्षण, तिथलं जग बघून ते अधिक जबाबदार होतील, कुटुंबाचा व्यवसाय आणखी पुढं नेतील. पण परत आल्यावरचं चित्र अगदी वेगळंच होतं.

सकाळपासून रात्रीपर्यंत मोबाईल हातात.
नवनवीन गाड्या, ब्रँडेड कपडे, सतत पार्ट्या, सोशल मीडियावर फोटो टाकणं हाच त्यांचा दिनक्रम होता.
आर्यनला वडिलांचा व्यवसाय “बोअरिंग” वाटायचा. गाड्या बदलणं, इन्स्टावर पोस्ट टाकणं ह्यातच त्याला मजा वाटायची.
सिया दिवसरात्र इंस्टा लाईव्ह, रील्स, फॉलोअर्सच्या मागे धावत होती.

घरात कोण आजारी आहे, कामगारांपैकी कुणाला प्रॉब्लेम आहे, व्यवसायात काय चाललंय या सगळ्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं.

अशातच एके दिवशी धक्कादायक बातमी आली.
शहरातील एका ड्रग्ज पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला आणि अटक झालेल्यांमध्ये आर्यन देशमुख हे नाव पहिल्या रांगेत होतं.

शहर थक्क झालं.
“देशमुखांसारख्या घरातली मुलं असं काय करून बसली?”
लोक अजून या बातमीमधून सावरले नाहीत तोच दुसऱ्या दिवशी सियाचा व्हिडिओ व्हायरल झाला. एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याशी ती उर्मटपणे बोलताना दिसली.

मग तर मीडियाला मुद्दा मिळाला.
“देशमुखांच्या पुढच्या पिढीचं काय होणार?”
“बडे लोग और कर्म इतने गंधे?”
“पैसा आहे, पण संस्कार कुठे हरवले?”

शेजारी, नातेवाईक, पार्टनर्स सगळीकडे एकच चर्चा:
“देशमुख साम्राज्याचं पुढं काय?”

त्या रात्री सुदर्शन स्टडी रूममध्ये बसले होते.
समोर व्यवसायाचे जुने हिशोब, फाईल्स आणि एका बाजूला मुलांचे फोटो छापलेला वर्तमानपत्र.
त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.

पत्नीने हळूच विचारलं,
“संपत्ती, गाड्या,हाताखाली नोकर चाकर सगळं आहे आपल्याकडे. पण घरचं सुख कुठं आहे? आपण मुलांचं उत्तम शिक्षण करून दिलं, पण संस्कारांकडे दुर्लक्ष झालं का?”

सुदर्शन यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले “हो, आपलीच चूक झाली. पैसा दिला, पण वेळ देता आला नाही. गाड्या दिल्या, पण जबाबदारी समजवता नाही आली. आपण कमी पडलो.”

त्या क्षणी त्यांनी ठरवलं मुलांना पैशाची नव्हे, तर जबाबदारीची किंमत शिकवायची.

दुसऱ्या दिवशीच निर्णय झाला.
क्रेडिट कार्ड्स ब्लॉक केले तसेच त्यांच्या पार्ट्या बंद केल्या.दोघांना थेट कारखान्यात कामावर हजर राहण्याचा आदेश.

पहिल्याच दिवशी आर्यनला प्रखर उन्हात कामगारांसोबत उभं राहून घाम गाळावा लागला.
सियाला ऑफिसात बसून ग्राहकांच्या तक्रारी ऐकाव्या लागल्या.

सुरुवातीला प्रचंड कुरकुर झाली.
“हे आमचं काम आहे का?”
“आम्ही बिझनेसमनचे वारस, आम्हाला कामगारासारखं उभं करणार?”
पण सुदर्शन ठाम होते“हो, ह्याच कामातून आम्हाला आजचं स्थान मिळालंय.

दिवसेंदिवस त्यांच्या नजरा बदलू लागल्या.
कामगारांचा घाम, त्यांच्या घरातील संघर्ष, छोट्या छोट्या पगारासाठीचं कष्टमय आयुष्य त्यांनी जवळून पाहिलं.
सियाच्या हातात पहिल्यांदा पगाराची स्लिप आली, तेव्हा ती काही मिनिटे थक्कच बसली.
“हा एवढा कमी पगार घेऊन हे लोक महिनाभर कसं निभावतात?” तिला स्वतःलाच प्रश्न पडला.

एका संध्याकाळी ती आईजवळ आली आणि हळूच म्हणाली “आई, आम्ही पैशात बुडून मस्ती करत होतो आणि हे लोक रोज एक रुपया मिळवण्यासाठी जीव तोडून मेहनत करतात. खरंच, मला स्वतःची लाज वाटतेय. पप्पांनी सुद्धा असंच काम करून आम्हाला वाढवलं असेल, पण आम्ही काय करत होतो? या वयात त्यांना आराम द्यायला हवं होतं आणि आम्ही त्यांच्या पैशावर मौज करत बसलो.”

आर्यनलाही हळूहळू जाणीव होऊ लागली.
एका दिवशी वडिलांजवळ येऊन तो म्हणाला“डॅड, आता खरंच तुमच्यासोबत काम करायचं आहे. पैशाचं खरं मूल्य आता कळायला लागलंय. आलिशान गाड्या काही दिवस मोहात पाडतात, पण खरा आनंद काम पूर्ण केल्यावर मिळणाऱ्या समाधानात आहे.”

सुदर्शन यांच्या डोळ्यांत पाणी आलं.
त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मिठीत घेतलं आणि म्हणाले “उशीर झाला, पण योग्य दिशा मिळाली. हाच माझ्यासाठी सर्वात मोठा दिलासा आहे.”

घरातला तणाव जरी कमी झाला, तरी एक प्रश्न मात्र अजूनही मनात होताच

चूक कुणाची होती?
मुलांची?की अती लाडानं त्यांना गाफील केलेल्या पालकांची?

आजही देशमुख कुटुंबाचं साम्राज्य तसंच आहे पण आता त्याच्या भक्कम पायावर एक नवा पाया घातला गेला आहे संस्कार आणि जबाबदारीचा.

ही गोष्ट फक्त देशमुख कुटुंबापुरती मर्यादित नाही.
आजूबाजूला पाहिलं की अशी अनेक घरं दिसतात.
पालक मुलांना उत्तम शिक्षण, पैसा, सुखसोयी देतात पण वेळ, प्रेम, आणि जबाबदारी शिकवायला विसरतात.

तेव्हा प्रश्न मात्र कायम तोच राहतो
चूक कुणाची?


*भाग कसा वाटला हे कमेंट व रेटिंग देऊन प्रोत्साहन द्या* 
*तुमच्या जान्हवी ला फोल्लो करा म्हणजे तुम्हला वेळेत नोटिफिकेशन येईल.*
*तुमचे मनोगत माझ्यासाठी खूप अमूल्य आहे.*