Login

पुरुषाच्या आयुष्यातील स्त्री

स्त्रीच्या मिठीत दुःख हरवतं,आणि तिच्या कुशीत आयुष्याला खरं समाधान मिळतं.
पुरुषाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अस्तित्व म्हणजेच “स्त्री”...सुनिल पुणेTM


या जगात जर पुरुषाच्या आयुष्याला अर्थ देणारी, त्याच्या अस्तित्वाला पूर्णत्व देणारी एखादी गोष्ट असेल, तर ती म्हणजे स्त्री.
ती केवळ एक नातं नाही…
ती एक अनुभूती आहे…
ती एक आश्रय आहे…
आणि अनेक वेळा, तीच त्याचं संपूर्ण विश्व असते.
पुरुष कितीही कठोर दिसत असला, कितीही जबाबदाऱ्यांचा डोंगर पेलत असला, तरी त्याच्या मनात एक कोपरा असतो
जिथे तो थकलेला असतो…
जिथे तो हरलेला असतो…
आणि जिथे त्याला फक्त समजून घेणारी मिठी हवी असते.आणि ती मिठी…
फक्त स्त्रीच देऊ शकते.

आईच्या कुशीत शिरताच पुरुष लहान होतो.
जग जिंकणारा योद्धा, क्षणात एक निष्पाप बाळ बनतो.
आईच्या कुशीमध्ये शब्द लागत नाहीत, तिथे फक्त मायेचा स्पर्श पुरेसा असतो.
ती कुशी म्हणजे वेदनांवरचे औषधं, अपयशावरची फुंकर आणि आयुष्यभराचा आधार. आणि
प्रेयसीच्या मिठीत पुरुषाला स्वतःची ओळख मिळते.
तो तिथे मजबूत असतो, पण असुरक्षितही असतो.
तिच्या डोळ्यांत पाहताना त्याला स्वतःवर विश्वास बसतो. ती त्याला सांगते
“तू आहेस, म्हणून मी आहे.”
आणि ते एक वाक्य त्याला पुन्हा उभं करतं. तसेच
पत्नीच्या कुशीत पुरुषाला शांती मिळते.
दिवसभराच्या संघर्षानंतर, अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला पुरुष जेव्हा तिच्या मिठीत विसावतो,
तेव्हा त्याच्या मनातली सगळी वादळं शांत होतात.
ती त्याला बदलत नाही,
ती त्याला स्वीकारते.
आणि स्वीकारले जाणं, हेच तर आयुष्यातील सर्वात मोठं समाधान असतं...

स्त्री पुरुषाला कधीच कमकुवत करत नाही,
ती त्याला मानव बनवते.
रडायला शिकवते,
माफ करायला शिकवते,
आणि पुन्हा पुन्हा उभं राहायला शिकवते.
म्हणूनच…
जगात पुरुषाच्या आयुष्यात “स्त्री” इतकी सुंदर, इतकी अर्थपूर्ण आणि इतकी अमूल्य गोष्ट दुसरीच नाही.
कारण तिच्या मिठीत दुःख हरवतं,
आणि तिच्या कुशीत आयुष्याला खरं समाधान मिळतं.
ती आई असो, प्रेयसी असो किंवा पत्नी, ती फक्त एक स्त्री असते…आणि तेच पुरेसं असतं......! मग ती आई, बहीण, मावशी, आत्या, काकू, मामी, सासु कोणत्या ही रूपात असोत...

(जगात पुरुषाच्या आयुष्यात “स्त्री” इतकी सुंदर, इतकी अर्थपूर्ण आणि इतकी अमूल्य गोष्ट दुसरीच नाही.
कारण तिच्या मिठीत दुःख हरवतं,
आणि तिच्या कुशीत आयुष्याला खरं समाधान मिळतं.)