"काय रे सुम्या, तुझ्या प्रेमाची गाडी पुढे गेली की नाही? की अजून तिथेच आहे? "
मित्रांनी सुमीतला प्रश्न विचारत त्याच्या मनातले जाणण्याचा प्रयत्न केला.
" मी आमच्या प्रेमाच्या गाडीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आहे. तिला मी माझ्या मनातील भावना सांगून माझे प्रेम व्यक्त केले. पण अजून तिच्याकडून काहीच रिप्लाय नाही. माझ्या बोलण्यावर त्या दिवशी तिला माझा राग वगैरे आला असेही वाटले नाही आणि तिला आनंद झाला असेही काही वाटले नाही. त्यामुळे काहीच कळत नाही. त्या दिवसाचे माझे वागणे,बोलणे तिने घरात सांगितले आणि त्यांनी माझे काही बरेवाईट केले तर..याचीही भीती वाटते आहे. काहीतरी चांगले व्हावे याचं आशेवर मी दिवस मोजतो आहे. पण अजून तसे काही होत नाही आहे."
सुमीतने मित्रांसोबत आपले मन मोकळे केले.
" बी पॉझिटिव्ह मित्रा, सर्व काही चांगलेच होईल. तू मनात निगेटिव्ह विचार आणू नको. तुझे तिच्यावर खरे प्रेम आहेस आणि तू तुझे प्रेम तिच्याजवळ व्यक्तही केले आहेस ना.. मगं तिचे उत्तर हो आले तर आनंदच आनंद.आणि ती नाही म्हटली तर तुला तेही दुःख पचवता आले पाहिजे. तू या गोष्टीचा आपल्या शिक्षणावर,करिअर वर परिणाम नको करून घेऊस."
मित्रांनी दुःखी मन असलेल्या सुमीतला आशेचा किरण दाखवला.
मित्रांचे ऐकून सुमीतच्या दुःखी मनात आनंदाच्या आशा पल्लवित झाल्या.
'त्याला माझ्याबद्दल विशेष काहीतरी वाटतं हे मी त्याच्या वागण्यातून, नजरेतून जाणलं होतं. आणि मलाही पहिल्या भेटीपासून त्याच्याबद्दल एक वेगळीच भावना वाटत होती.मी आपल्या भावना त्याला सांगाव्यात. असे मला अनेकदा वाटले. पण हिंमत झाली नाही. आणि आईबाबांचे त्या दिवसाचे बोलणे ऐकून तर.. आपल्या त्या नाजूक भावनांना कधीही व्यक्त न करण्याचे ठरविले होते. आणि तसे प्रयत्नही सुरू होते. आणि विशेष म्हणजे तो ही पहिल्यासारखा वागत नव्हता. तो ही मला टाळण्याचा प्रयत्न करतो. हे जाणवत होते.बरे झाले... तो त्याच्या मार्गी आणि मी माझ्या
मार्गी. असेचं मनात आणून माझे छान रूटीन सुरू होते. आणि त्या दिवशी अचानक तो माझ्यासमोर आला आणि आय लव्ह यू ..म्हटला.
त्याच्याकडे पाहण्याची हिंमतही झाली नाही आणि काय बोलावे हे ही सूचत नव्हते.
त्याच्या वागण्याचा मला रागही आला नाही आणि आनंदही झाला नाही.
माझेही तुझ्यावर प्रेम आहे. असे त्याला सांगावेसे वाटते आहे. पण आईबाबांचा विचार करून तो विचार मनातच दाबून टाकते आहे. '
सुमीतच्या त्या दिवसाच्या वागण्याचा, बोलण्याचा स्नेहलच्या रूटीनवर काही परिणाम झाला नाही पण तिच्या मनात संमिश्र विचारांची,भावनांची चलबिचल सुरू होती.
स्नेहलने आपल्या मनातील भावनांना कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी त्या पुन्हा पुन्हा मनात येतचं होत्या. कॉलेजला गेल्यावर त्याला न पाहण्याचे तिने ठरविले होते तरी तिचे मन काही ऐकत नव्हते. तो कॉलेजला आला आहे, वर्गात बसला आहे. हे कळले तरी तिचे मन सुखावत होते. एखादे दिवशी तो आला नाही तरी तिचे मन बेचैन होत होते.
एकीकडे ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती आणि दुसरीकडे त्याच्यासाठी तिचे मन वेडे होत होते.
आपल्या मनातील भावनांचा कल्लोळ कुणाजवळ तरी मोकळा करावा. असे तिला वाटू लागले. घरात आईबाबा,भाऊ यांच्याशी याबद्दल बोलूच शकत नाही. वर्गातील मैत्रीणीजवळ बोललो तर कॉलेजात ही गोष्ट पसरण्याची शक्यता होतीच.
मामांची मुलगी अनुजा..तिला आठवली. अनुजा आपली मामेबहीण आहे पण आपली एक चांगली आणि विश्वासू मैत्रीण पण आहे. तिचे आणि आपले चांगले जमतेही.
स्नेहलच्या मनात असा विचार आला आणि तिने अनुजाला फोन करून आपल्या मनातील सर्व सांगून मन मोकळे केले.
अनुजा इतकी मोठीही नव्हती की, ती स्नेहलला काही सल्ले वगैरे देऊ शकेल.पण अनुजाने स्नेहलच्या मनातील भावनांना समजून घेतले. तिच्या मनातील भावनांचा कोंडमारा मोकळा करण्यास मदत केली.
नाते असो की मैत्री ,आपण समोरच्या व्यक्तीला पैसा किंवा अन्य काही मदत नाही करू शकलो पण त्या व्यक्तिच्या मनातील भावनांना ऐकून ,भावनांना वाट मोकळी करून दिली तरी आपण त्या व्यक्तिला एक प्रकारे मदतच करत असतो.
ज्या व्यक्ती आपल्या भावना कोणाजवळ व्यक्त करत नाही ,त्या मानसिक तणावात जगत असतात किंवा आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलत असतात.
स्नेहलने अनुजाजवळ आपले मन मोकळे केल्यापासून तिला बरे वाटत होते.
स्नेहलचे सर्व ऐकून घेतल्यानंतर तिला काय सांगावे हे अनुजाला कळत नव्हते.
'तुझ्या मनाला योग्य वाटते ते तू करं.'
एवढचं ती स्नेहलला बोलली.
स्नेहलच्या मनात द्विधा सुरूचं होती.
सुमीत दिसायला चांगला ,अभ्यासातही हुशार आणि वागणूक वगैरे सर्व काही चांगलेचं. आपल्या बद्दल प्रेमाची भावना जशी त्याच्या मनात आहे तशी मलाही त्याच्याबद्दल प्रेमाची भावना आहे.
नाव ठेवण्यासारखे त्यात असे काही नाहीचं.
जात आणि प्रेम या गोष्टी सोडल्या तर आईबाबांना ही तो आवडणार.
आमचे दोघांचे प्रेम खरे असेल तर पुढे सर्व चांगलेचं होईल. मला घरातल्यांचेही प्रेम हवे आहे आणि त्याचेही प्रेम हवे आहे. मी घरात हळूहळू सर्वांना पटवून देउन की, तो खूप चांगला आहे. फक्त त्याने मला साथ द्यायला हवी.
स्नेहल सर्व बाजूंनी विचार करत होती आणि शेवटी तिने आपल्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करण्याचे ठरविले.
त्याच्या प्रपोझला होकारार्थी उत्तर देण्याची संधी कधी मिळते याची वाट पाहू लागली.
यासाठी तिला जास्त वाट बघावी लागली नाही. आपल्या मनातले सांगण्याची संधी तिला लवकरच मिळाली.
सर रजेवर असल्याने लेक्चर नव्हते. त्यामुळे स्नेहल लायब्ररीत जाऊन अभ्यास करणार होती. लायब्ररीत गेल्यावर तिने पुस्तक काढून वाचायला सुरूवात करणार तेवढ्यात.. तिला लायब्ररीत तो दिसला ..त्याच्या कडे तिने पाहिले तेव्हा तो आपल्या कडून उत्तराच्या अपेक्षेत आहे असे तिला जाणवत होते.
त्याच्याकडे पाहून ती छानसी हसली.
त्यानेही तिला छानशी स्माईल दिली आणि तो ही पुस्तक घेऊन वाचण्याच्या निमित्ताने तिच्या समोर येऊन बसला.
तो काही विचारणार.. या अगोदरचं ती त्याला म्हणाली,
"आय लाईक यू...आय लव्ह यू.. "
तिचे बोलणे पूर्ण होण्याअगोदरचं त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते.
जणू प्रेमाची पहिली पायरी तो जिंकला होता..असेचं त्याला वाटत होते.
आणि तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर प्रितीचा गुलाबी रंग चढत होता.
दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. फक्त एकमेकांना बघत होते. आणि अधूनमधून पुस्तकात बघत होते म्हणजे इतरांना काही वेगळे वाटू नये.
क्रमशः
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा