का खेळलास तू भावनांशी ? ( भाग 6 )

About Love
का खेळलास तू भावनांशी ? ( भाग 6 )

सुमीतने केलेल्या प्रपोझवर खूप दिवसांनी नाही तर खूप महिन्यांनी स्नेहलने ग्रीन सिग्नल दिल्यावर त्यांची प्रेमाची गाडी एकदाची सुरू झाली.दोघांनाही आपण एका वेगळ्याचं विश्वात गेल्यासारखे वाटत होते. सर्व काही तसेचं होते पण त्यांना आता प्रत्येक गोष्ट वेगळी वाटत होती. आनंद देत होती,जगण्याला उत्साह देत होती.

प्रेमात बुडालेल्यांना सर्व सृष्टी ,सर्व जग छान वाटू लागते. एरव्ही ज्या गोष्टी आवडत नसतात त्याही आवडू लागतात. असेचं काहीसे प्रेमीयुगल सुमीत व स्नेहलचे झाले होते.
प्रेमाची जादू काही औरचं असते !
याचा त्यांना अनुभव येत होता.

आपल्या मनातील प्रेमाच्या अंकुराला , प्रेम व्यक्त करून वाढवावे ,फुलवावे की त्या प्रेमाला व्यक्त न करताच मनातून काढून टाकावे? अशी दोघांचीही मनस्थिती एकवेळ झाली होती. पण सुमीतच्या मनात प्रेमाच्या भावनांचे पारडे अधिक झुकले आणि त्याने आपले प्रेम स्नेहलजवळ व्यक्त केले. तिनेही उत्तर देण्यास वेळ लावला खरा ..पण तिच्या मनानेही प्रेमाकडेच कौल दिला.
दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाचा स्विकार केला होता. पण कॉलेजमध्ये ते इतरांना तसे काही जाणवू देत नव्हते. सुमीतने आपल्या जवळच्या आणि विश्वासातील एकदोन मित्रांनाच आपल्या प्रेमाबद्दल सांगितले होते. स्नेहलने आपले हे प्रेमप्रकरण कोणत्याच मैत्रीणीला सांगितलेले नव्हते. तिला आपल्या घरातील सर्वांचे प्रेमप्रकरणांविषयीचे विचार कसे आहेत , हे माहित होते आणि तीही आजपर्यंत अशा गोष्टींपासून दूरचं होती. म्हणून तर तिने सुमीतविषयी वाटणारे प्रेम व्यक्त न करताच त्या भावना आपल्या मनातून पुसून टाकण्याचे ठरवले होते आणि ती तसा प्रयत्न ही करत होती. पण सुमीतने तिच्यासमोर तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि तिच्या मनातून पुसुन जाणाऱ्या भावना पुन्हा
जागृत झाल्या आणि तिच्या मनाने आनंदाने सुमीतच्या प्रेमाचा स्विकार केला .
पुढे काय होईल ? याचा विचार न करता सुमीतने आपल्या मनातील प्रेम स्नेहलसमोर व्यक्त केले होते. पण आपल्या प्रेमाचा तो मोकळेपणाने कधी आनंद घेत नव्हता. त्याच्या मनात भीती असायची की, आपले हे प्रेमप्रकरण आपल्या घरी किंवा स्नेहलच्या घरी कळले तर ? या विचाराने तो स्नेहलशी बोलताना सावधपणे वागायचा. एकमेकांचे फक्त फ्रेंड आहोत असेच दाखवायचा. खरं तर स्नेहलशी खूप बोलावं,भरपूर गप्पा माराव्यातं ,कुठंतरी बरोबर फिरायला जावं . असं त्याला मनातून वाटत असायचं. पण अशी संधी कधी मिळत नव्हती. निदान एकमेकांना चिट्ठी वगैरे पाठवून संवाद व्हावा. एवढ धाडसही तो करू शकत नव्हता. फक्त कॉलेजमध्ये आल्यावर एकमेकांना पाहणं आणि फ्रेंड म्हणून गप्पा मारणं तेही सर्व सोबत असताना. सुट्टीच्या दिवशी स्नेहल घरी गेली की,तिला फोन करायचा आणि गप्पा मारायचा. ते ही घाबरत घाबरत.
'कोणाचा फोन आहे ? 'असे स्नेहलला घरातल्यांनी विचारल्यावर , 'मैत्रीणीचा आहे.' असे स्नेहल खोटं बोलायची.
खोटं बोलताना तिला वाईट वाटायचे पण प्रेमात सर्व काही माफ असतं. असं तिचं मन तिला म्हणायचं.
स्नेहलच्या आईबाबांचे ,भावाचे तिच्यावर खूप प्रेम होते आणि तिचेही त्या सर्वांवर खूप प्रेम होते. एकमेकांच्या सुखाची ते सर्व काळजी घेत होते.पण आपले प्रेमप्रकरण घरात कळले तर ते आपल्या सुखाचा ,आनंदाचा विचार करतील ..की जात,समाज,मान,प्रतिष्ठा वगैरे गोष्टींचा विचार करून आपल्या प्रेमाला विरोध करतील ?
सुमीत हा चांगला मुलगा आहे,हे घरात पटवून सांगितले आणि त्यानेही त्याच्या घरी सर्वांना विश्वासात घेऊन सर्व सांगितले तर कदाचित दोघी परिवाराकडून आपल्या प्रेमाला कोणताही विरोध न होता ,प्रेमाचा स्विकार झाला तर आनंदच आनंद...पण असे काही झालेच नाही तर ..सुमीतबरोबर पळून जाऊन लग्न करावे लागेल का? पण ..हे पण काही सोपे नाही. खरचं प्रेमात पडणे वाटते तितके सोपे नसते. '

असा विचार स्नेहलच्या मनात यायचा आणि या विचाराने ती दुःखी व्हायची.

भविष्याच्या विचारांनी स्नेहल जरी दुःखी होत असली तरी पण जेव्हा सुमीतची भेट व्हायची तेव्हा तिला सर्व दुःखांचा विसर पडायचा. सुमीत नेहमी असाच आपल्या सोबत नेहमी असावा. असेच तिला वाटायचे. जरी त्याला एकटे भेटणे शक्य नव्हते तरी कॉलेजात जेवढी भेट व्हायची त्यात ती समाधानी असायची. त्याच्या बरोबरचा प्रत्येक क्षण आठवणीत जपून ठेवायची. कॉलेजात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात दोघेजण आवर्जून सहभागी व्हायचे, जेणेकरुन त्यानिमित्ताने एकमेकांना भेटता येईल ,एकमेकांचा सहवास लाभेल. हाच हेतू दोघांचाही असायचा.

असेच स्नेहल व सुमीतचे लपतछपत प्रेम सुरू होते. कॉलेजची तीन वर्षे कधी संपली . हे सुद्धा कळले नाही.
पुढे काय ? हा यक्ष प्रश्न दोघांच्याही समोर उभा होता. करिअर आणि प्रेम या दोघांचा विचार करून पुढील निर्णय घेणे दोघांनाही महत्त्वाचे वाटत होते.

स्नेहलच्या घरात तर तिच्यासाठी स्थळ येऊ लागली होती.
स्नेहल घरात सर्वांची लाडकी होती. त्यामुळे तिच्या पसंतीनेच आणि तिची इच्छा जाणूनच तिच्या लग्नाचा विचार होणार होता.

"आई, बाबा मला अजून लग्न नाही करायचे. मला अजून शिकायचे आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्नाचे बघू. "

स्नेहलने घरात असे सांगितलेही.

शिक्षणाच्या निमित्ताने आपण लग्नाचा विषय पुढे ढकलत आहोत, या मिळालेल्या वेळात माझे शिक्षण मी पूर्ण करेन आणि सुमीतचेही शिक्षण पूर्ण होईल,त्यानंतर आमच्या दोघांच्याही घरात आम्ही आमच्या प्रेमाविषयी सांगू. आताच घरात याबद्दल सांगितले तर कदाचित .. प्रेमाला विरोध झाला आणि शिक्षण ही पूर्ण न करू देताच ,आलेल्या एखाद्या स्थळाबरोबर लग्न लावून दिले तर.. आणि सुमीतला ही करियर ठरविण्यासाठी वेळही लागेल ना ?

असा दूरचा विचार करून स्नेहलने घरात लग्नाचा विषय सध्या तरी लांबणीवर टाकला.

सुमीतला स्वतः चे टेंशन नव्हते. कारण शिक्षण,करिअर व नंतर लग्न असे मुलांच्या बाबतीत ठरलेले असते.त्यामुळे तो स्वतःच्या बाबतीत निश्चिंत होता. फक्त स्नेहलच्या विचाराने त्याला टेंशन यायचे. कारण मुलींचे ग्रॅज्युएशन होत आले की घरात लगेच त्यांच्या लग्नाचा विषय सुरू होतो. स्नेहलचेही ग्रॅज्युएशन झाले होते आणि तिच्या घरातही तिच्या लग्नाचा विषय सुरू झाला होता. पण स्नेहलने अजून शिक्षण घेण्याच्या नावाने सध्या तरी विषय टाळला होता. हे ऐकून त्याला हायसे वाटले होते. पण आपले शिक्षण पूर्ण होताच नोकरीसाठी प्रयत्न आणि घरात स्नेहलबद्दल सांगू . असे सुमीतने ठरवले होते.
शिक्षण घेता घेता एकमेकांचा सहवासही मिळावा म्हणून स्नेहल व सुमीतने पुढील शिक्षणासाठी एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचे ठरवले. पुढील शिक्षणासाठी दोघांनाही दुसऱ्या शहरात जावे लागणार होते. स्नेहलला होस्टेलची सवय झालेली होती. आता सुमीतही होस्टेलला राहणार होता. घर सोडून होस्टेलला राहयला जसे स्नेहलला जीवावर येत होते तसेच सुमीतचेही होते.
पण शिक्षणासाठी कुठेतरी तडजोड करावीच लागणार होती आणि आपले प्रेम यशस्वी करण्यासाठी स्वतः चेही एक चांगले स्थान निर्माण करण्याच्या उद्देशाने सुमीत घर सोडून होस्टेलला राहण्यास तयार झाला होता.

दोघांसाठी येणारी दोन वर्षे खूप महत्त्वाची व निर्णायक ठरणार होती. शिक्षण,नोकरी, करिअर याबरोबरच प्रेमाला घरातल्यांची परवानगी मिळवून यशस्वी करायचे होते.भविष्यात पुढे सर्व काही चांगले व आपल्या मनासारखेचं होईल हा विचार मनात ठेवून सुमीत व स्नेहल दोघांनी कॉलेजला ऍडमिशन घेतली.

क्रमशः

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all