का खेळलास तू भावनांशी? ( अंतिम भाग )

About Love

'कधीतरी सुमीत आपले दुःखी मन माझ्याजवळ नक्की व्यक्त करेल. प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नसले तरी फोन तर नक्की करेल.पण वडिलांच्या निधनानंतर सुमीत इतका बदलेल की एक फोनसुद्धा त्याने मला करू नये.मला शक्य असते तर मीच त्याला भेटायला त्याच्या घरी गेले असते,फोन करून त्याचे सात्वन केले असते.पण तेही त्याला आवडले नसते.त्याच्या वडिलांचे असे अचानक जाणे खरचं खूप दुःखाची गोष्ट आहे. मला ते सर्व समजते.या दुःखातून सावरायला खूप वेळही लागेल पण त्याचा माझ्याशी अबोल राहण्याचा मला किती त्रास होतो आहे. आमचे एकमेकांवर नितांत प्रेम आहे.
एकमेकांची सुखदुःख समजून घेणे म्हणजेच प्रेम!
पण सुमीत त्याचे दुःख माझ्याबरोबर शेअर नाही करत,मला असे परके का समजतो?
किती दिवस मी स्वतःला असा त्रास करून घेऊ? त्यापेक्षा मी त्याच्याशी याविषयी बोलतेच.'

स्नेहलने आपल्या मनात असे ठरवले.

आणि
ठरल्याप्रमाणे, स्नेहलने एके दिवशी लेक्चर संपल्यानंतर सुमीत होस्टेलला जात असताना त्याला थांबवले आणि विचारले,

"सुमीत, तुझ्या मनाची स्थिती मी समजू शकते. तुला यातून सावरण्यास वेळ लागेल. पण तू माझ्या मनाचाही विचार कर ना.तू माझ्याशी असे परक्यासारखे का वागतो आहेस... जसे तू मला ओळखतच नाही. मला वाटते, तू माझ्याशी बोलावे, मनातील सुखदुःख सांगावे पण तू तर एकदम शांत. तुला फोन करावा,तुझ्याशी बोलावे असे अनेकदा मनात येऊनही ..फक्त तुला आवडत नाही म्हणून मी एवढे दिवस शांत राहिली. पण शेवटी तुझ्याशी या विषयावर बोलायचे ठरवलेच. आता परीक्षा संपल्यानंतर आपली भेट होईल की नाही सांगता येणार नाही, फोनवरच बोलणे होईल आणि तेही तू करशील तेव्हाच.आता घरातल्यांनी माझ्यासाठी स्थळे पाहण्यास सुरूवात केली तर मी आता कोणते कारण सांगून त्यांना थांबवू?मला तर वाटते आता घरात आपल्या प्रेमाविषयी सांगावेच लागेल."

स्नेहलने आपले मन सुमीतजवळ व्यक्त केले.

सुमीतने तिचे शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि म्हणाला,

"सध्या तू फक्त अभ्यास आणि परीक्षा यावर लक्ष केंद्रित कर.परीक्षा संपल्यावर मी आईला सांगतो आणि मी सांगेन तेव्हा तू ही तुझ्या घरात सांग. वडिलांच्या जाण्याने आईला खूप मोठा धक्का बसला आहे. डॉक्टरांनी तिची काळजी घेण्यास सांगितले आहे.आता मी व माझी ताई आमच्या दोघांवर आईची जबाबदारी आहे. ताईला तिच्या संसाराचीही जबाबदारी आहे.त्यामुळे मलाच आईची काळजी घ्यावी लागेल.तिला त्रास होईल असे काही करायचे नाही. असे डॉक्टर व नातेवाईक मला बोलले. वडील तर सोडून गेले पण आईला गमवायचे नाही.
त्यामुळे वडिलांच्या जाण्याचे दुःख व आईची काळजी यामुळे दुःखी राहतो. मी आता स्वतः पेक्षा आईचाच जास्त विचार करत असतो. ती आनंदात राहवी यासाठी प्रयत्न करतो.आईला थोडे बरे वाटायला लागले की मी आपल्याविषयी बोलतो तिच्याजवळ आणि तोपर्यंत आपली परीक्षाही संपेल."

सुमीतचे हे सर्व बोलणे ऐकून स्नेहलला बरे वाटले कारण खूप दिवसांनी तो तिच्याशी बोलला. पण तिला खूप आनंद झाला असेही नाही. त्याच्या बोलण्यात आपल्या प्रेमासाठी काही महत्त्व आहे असे तिला जाणवलेच नाही.

'आई वडिलांवर सर्वांचेच प्रेम असते. त्यांना दुःख होईल,त्रास होईल. असे कोणी वागत नाही. माझेही माझ्या आईवडिलांवर प्रेम आहे. मी त्यांना सर्व सांगूनच पुढे काय करायचे ते ठरवणार होते.पण आता सुमीत त्याच्या घरात जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत मीही घरात काही सांगणार नाही. परीक्षा संपल्यावर बघू काय होते ते?'
स्नेहलने असे ठरवले आणि ती अभ्यासात लक्ष देवू लागली.


एकदाची परीक्षा संपली आणि सर्वांनी मोकळा श्वास घेतला. अभ्यास,परीक्षा यांच्यापासून सुटल्याचा आनंद झाला होता. हा आनंद वाढविण्यासाठी सर्वांनी शेवटच्या दिवशी छान पार्टी केली.मनसोक्त गप्पा मारल्या आणि यापुढेही एकमेकांना भेटत राहू अशी इच्छाही व्यक्त केली.स्नेहललाही सर्वांप्रमाणेच आनंद झाला होता. 'पण आपले पुढे काय होणार? प्रेम यशस्वी होईल का? सुमीत काय निर्णय घेणार?' या विचारांनी ती अस्वस्थ होती.ती सुमीतकडे मोठ्या आशेने बघत होती.तो स्वतःहून काहीतरी बोलेल असे तिला वाटत होते.पण सुमीत नेहमीप्रमाणे शांत..मोजकेच आणि ते पण इतरांबरोबर बोलत होता.शेवटी स्नेहलच पुढाकार घेत त्याच्याशी बोलली,
"घरी जाऊन आईला आपल्याबद्दल सांग आणि मला फोन करून सांग.म्हणजे मी पण घरात सांगते."

सुमीतने काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली.
त्याच्या अशा वागण्याने स्नेहलला खूप रडावेसे वाटत होते पण आपल्या भावनांना आवर घालत तिने सर्वांचा निरोप घेतला.


स्नेहल होस्टेलवरून घरी आल्यामुळे घरात सर्वांनाच आनंद झाला होता.

"बाबा,आता एखादा चांगला मुलगा शोधून स्नेहलचे लग्न करू."

स्नेहलचा दादा मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी गंमतीने म्हणत होता.

"मला नाही लग्न करायचे,मी नाही जाणार कुठे,मी इथेच राहणार."

स्नेहलही खोटा खोटा राग दाखवत म्हणायची.

घरात ती सर्वांना हसरी, आनंदी दिसत असली तरी मनातून ती खूप दुःखी होती.सुमीतच्या निर्णयावर तिचे भविष्य ठरणार होते आणि त्यासाठी ती त्याच्या फोनची आतुरतेने वाट पाहत होती.पण सुमीतचा काही फोन आला नाही. वाट बघून बघून शेवटी तिने सुमीतच्या जवळच्या मित्राला जो तिचाही चांगला मित्र होता;त्याला फोन केला आणि सुमीतविषयी विचारपूस केली.त्याने जे सांगितले ते ऐकून तर तिला सुमीतबद्दल खूप राग,चीड आली.
सुमीतने आईच्या तब्येतीचा विचार करून घरात स्नेहलविषयी काही सांगितलेच नाही. उलट आईला आनंद होईल,तिच्या मनासारखे व्हावे यासाठी आईने पाहून ठेवलेल्या मुलीसोबत लग्न करण्याचे ठरवले.

'का खेळलास तू भावनांशी?' सुमीतला आता जाऊन विचारावे...असे स्नेहलला वाटत होते.

'तू स्वतः हून मला प्रपोज केले.माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे.. वेळोवळी सांगत होता..तसे दाखवतही होता,भविष्याची स्वप्ने दाखवत होता.आणि आता इतका बदलून गेला? एकदा तरी आईशी आपल्याबद्दल बोलला असता.कदाचित त्यांनी परवानगीही दिली असती. पण आईला काही होईल का या भीतीनेच तू सांगितले नसेल. तू खरचं खूप भित्रा आहेस...सुमीत.
तुझा आपल्या प्रेमावर विश्वास नव्हताच म्हणून तर तू कायम स्वतः ही घाबरून राहत होता आणि मलाही अनेक गोष्टीसाठी आडकाठी करत होता.
मी मनापासून प्रेम केले होते सुमीत..सुखी संसाराची स्वप्नेही पाहिली होती. प्रेमासाठी माझ्या घरातल्यांशी खोटे सुद्दा बोलली.पण तुझ्या अशा वागण्याने मला किती त्रास होतो आहे याचा तू विचारही केला नाही.
मुली मनापासून प्रेम करतात आणि मुले फक्त टाईमपास म्हणून प्रेम करतात का? का खेळत असतात अशी मुले मुलींच्या भावनांशी?'

आपल्या मनातील या भावनांना स्नेहलने अश्रूंवाटे मोकळी वाट करून दिली.

'घरात आपल्या प्रेमाविषयी सांगणारच होते. पण सुमीतने ती वेळच येऊ दिली नाही. पण मनात एवढी मोठी गोष्ट ठेवून मी जगू शकणार नाही. वाटते जीवाचे काहीतरी करून घ्यावे. पण माझ्या या कृत्याने आईवडिलांना,भावाला किती त्रास होईल? त्यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा त्यांना भोगायला लागेल.माझेच चुकले मी सुमीतच्या प्रपोजला होकार द्यायचाच नव्हता. म्हणजे आज ही वेळ आलीच नसती.पण पुढे काय होणार? हे थोडीच माहीत असते.
आता जे काही झाले ते सर्व घरात सांगते.'

असे ठरवून स्नेहलने घरात आपल्या व सुमीतच्या प्रेमाविषयी सांगितले.

हे सर्व ऐकून आईवडिलांना, भावाला सुमीतचा खूप राग आला. आपल्या लाडक्या स्नेहलच्या भावनांशी सुमीत का खेळला याचा.

"स्नेहल, त्या सुमीतचा पत्ता सांग.मी जाऊन त्याला या गोष्टीचा जाबच विचारतो."

स्नेहलचा भाऊ अगदी त्वेशाने स्नेहलला म्हणाला.

"दादा,तू तिकडे गेल्यावर त्याने तुझा काही अपमान केला तर मला ते चालणार नाही आणि मला आता हे जबरदस्तीचे प्रेम वगैरे नको आहे. त्याला माझ्या बद्दल खरचं प्रेम वाटले असते तर.. त्याने घरात सांगितले असते. पण त्याला माझ्यापेक्षा घराचीच जास्त काळजी वाटते.त्यामुळे तू नको जाऊ."

स्नेहलने आपल्या भावाला समजावले.

आपली स्नेहल प्रेमात पडली आणि प्रेमभंगही झाला तरी आपल्याला हे समजले नाही. घरात छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणाऱ्या स्नेहलने एवढी मोठी गोष्ट मनात कशी ठेवली? याचेच तिच्या आईवडिलांना व भावाला आश्चर्य वाटत होते.

"स्नेहल, एक विचारायचे होते तू आणि सुमीत प्रेमात किती जवळ आले होते म्हणजे काही ....?"

स्नेहलला आईने असे विचारताच स्नेहल म्हणाली,

"आई,तुमचे माझ्यावर खूप चांगले संस्कार आहेत गं...मी कोणत्याही मर्यादा ओलांडल्या नाहीत आणि आमची प्रत्यक्ष भेटही जास्त होत नव्हती. लग्नही तुमच्या संमतीनेच करणार होतो."

स्नेहलचे उत्तर ऐकून आईला बरे तर वाटले पण ती सुमीतला विसरेल का? या धक्यातून सावरेल का?

असे तिच्या आईला वाटू लागले.

स्नेहलच्या मनावर झालेल्या आघातातून ती सावरायला हवी,तिने सुमीतला विसरायला हवे म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला तिच्या मावशीकडे पाठवले. थोडी स्थिरावली की मग लग्नाचे पाहू. असे घरातल्यांनी ठरवले.

स्नेहलने सुमीतवर मनापासून प्रेम केले होते. त्यामुळे त्याला विसरणे शक्य नव्हते. त्याच्या आठवणीने तिचे मन भरून यायचे. पण त्याने घेतलेल्या निर्णयामुळे स्नेहलचे मन दुःखीही व्हायचे.मनाला होणारा त्रास कमी व्हावा म्हणून ती आपले मन इतर गोष्टीत रमवण्याचा प्रयत्न करत होती. मावशीची मुलगी तिच्याच वयाची होती. दोघींचे चांगले जमायचेही. दोघी कधी फिरायला जायच्या तर कधी मूव्हीला जायच्या. गप्पागोष्टी, हिंडण,फिरणं यात स्नेहलला बरे वाटू लागले.

एकदा मावशीच्या एका नातेवाईकाकडे लग्नासाठी स्नेहल मावशीच्या कुटुंबासोबत गेली होती.एका नातेवाईकाने मावशीला स्नेहलच्या लग्नाविषयी विचारले आणि एक स्थळ सूचवलेही.
मावशीने स्नेहलच्या आईवडिलांना या स्थळाविषयी सांगितल्यावर त्यांनी पुढची बोलणी करण्याचे ठरवले. तो मुलगा मावशीच्या नात्यातीलच होता व त्याला स्नेहल आवडत होती. त्याने स्नेहलला यापूर्वी दोनतीन वेळा पाहिलेही होते.

मुलगा परिचयातील होता. दिसायला देखणा आणि व्यवसाय, घरदार या सर्व गोष्टी लक्षात घेऊन स्नेहल लग्नाला तयार झाली. आणि तिला तो आवडलाही होता.

प्रेम करणारा नवरा, सासूसासऱ्यांकडून होणारे लाड, हौसमौज यामुळे स्नेहल लवकरच आपल्या संसारात रूळली. तिकडे सुमीतही आईने सांगितलेल्या मुलीबरोबर लग्न करून सुखाने संसार करू लागला होता आणि आईचीही काळजी घेत होता.

शेवटी वेळ हेचं सर्व दुःखावर चांगले औषध असते.

याचा अनुभव स्नेहल व सुमीतला आला होता.


समाप्त


कधी परिस्थितीमुळे तर कधी इतर कारणांमुळे आपले प्रेम यशस्वी नाही होऊ शकले तर...स्वतः चे किंवा इतरांचे आयुष्य उध्वस्त करण्यापेक्षा,झाले गेले विसरून,नव्या मार्गाचा स्विकार करून आपले आणि इतरांचेही जीवन आनंदी केले तर ...किती छान!


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all