Login

जिवंतपणी दुर्लक्षित

जिवंत असताना दुर्लक्षित आणि मेल्यावर कौतुक...
माणूस जिवंतपणी का ओळखला जात नाही?

आपण रोज एखादी अंत्ययात्रा बघतो, एखाद्याच्या निधनाची बातमी ऐकतो आणि मग आपसूकच कानावर शब्द येतात “अरे, तो माणूस खूप चांगला होता...” माणसाच्या बोलीत ही वाक्यं आता एकप्रकारे परंपराच झाली आहेत. पण यामागे दडलेला अर्थ शोधला की प्रश्न मनात ठसतो हे त्याच्या जिवंतपणी का म्हणता आलं नाही? तो असताना त्याच्या गुणांना, त्याच्या माणुसकीला, त्याच्या चांगुलपणाला योग्य मान का मिळाला नाही?

खरं तर, मनुष्याचा हा विरोधाभास जुना आहे. आपण एखादी व्यक्ती जिवंत असताना तिचा स्वभाव, तिचं व्यक्तिमत्त्व, तिची किंमत याकडे दुर्लक्ष करतो; पण ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक ती आपल्याला 'महान' आणि 'खरी' वाटू लागते. हे नेमकं का घडतं?

माणूस असताना त्याच्या चुका, त्याची कमतरता, त्याचे दोष आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असतात. ज्या व्यक्तीशी आपला सतत संपर्क असतो, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला टोचतात. पण तोच माणूस जेव्हा नसतो, तेव्हा त्याच्या आठवणींच्या पलिकडे काहीच उरत नाही. आणि आठवणी नेहमी सौम्य असतात. त्या दोष पुसून टाकतात, गुणच उजागर करतात.

म्हणूनच मृत्यूनंतर तो “खूप चांगला होता” असं म्हणणं सोपं होतं. जिवंतपणी मात्र त्याच्याकडे आपण ‘मानव’ म्हणून न पाहता ‘अपेक्षांचं ओझं’ घेऊन पाहतो. आणि म्हणूनच ओळख कमी, गैरसमज जास्त.

जिवंत माणसाकडे कमीपणा शोधण्याची प्रवृत्ती
आपल्याकडे सांस्कृतिकदृष्ट्या एक विचित्र सवय आहे
जिवंत व्यक्तीला आदर देण्यापेक्षा त्याच्या उणिवा शोधण्यात आपण हुशार आहोत.

ते थोडं जास्त बोलेल, तर 'दिखाऊ' म्हणू;
ते थोडं शांत असेल, तर 'स्वतःपुरतं' म्हणू;
ते मदत करेल, तर 'स्वार्थ असेल' म्हणू.

म्हणजे जिवंत असताना त्याला आपल्याकडून फेअर चान्स मिळतच नाही.

खरं तर हे समाजाचं दोष नसून मानवी मानसशास्त्र आहे
जवळचं नेहमी दुर्लक्षित होतं आणि दूरचं महान वाटतं.

मृत्यूमुळे मिळणारा अचानक आदर हा खरा की दिखाऊ?

जेव्हा एखादी व्यक्ती या जगातून निघून जाते, तेव्हा तिच्याबद्दल बोलताना आपल्यात एक सहानुभूती निर्माण होते. मृत व्यक्तीबद्दल वाईट बोलणं समाजात नापसंत केलं जातं, म्हणून लोक सहाजिकच चांगलंच बोलतात. पण याचा अर्थ तो माणूस चांगलाच होता असं नाही. हा आदर अनेकदा ‘परिस्थितीजन्य’ असतो.

पण एका अर्थाने तो आदर उशिरा का होईना, योग्यच असतो. कारण प्रत्येक माणसात काही तरी चांगुलपणा असतोच. फक्त आपण तो पाहण्याची नजर हरवून बसतो.

जिवंतपणी कदर का होत नाही?

ईर्ष्या आणि तुलना

समाजात प्रत्येकाची कदर दुसऱ्याशी तुलना करून होते. कोणाची प्रगती झाली की अनेकांना त्रास होतो, आणि कदर दूर जाते. मृत्यू मात्र तुलना संपवतो म्हणून आदर वाढतो.

जवळिकीचे दुरावलेले अर्थ

जवळ राहणाऱ्याच्या चांगुलपणाला आपण “ते तर सामान्य आहे” असं मानतो. पण दूर गेलेल्याचं प्रत्येक चांगलं काम मोठं वाटतं.

नाते तुटण्याचा भीतीचा अभाव

जिवंत व्यक्तीशी आपण कधीही चुकीचं बोलू शकतो.
मृत व्यक्तीला काही ऐकू येत नाही त्यामुळे लोक मोकळेपणाने भावपूर्ण बोलू शकतात.

माणूस गेल्यावर त्याची किंमत का कळते?

कारण त्याच्याविना निर्माण झालेली पोकळी सत्य उजागर करते.

जेव्हा तो नसतो तेव्हा जाणवतं की

त्याच्या उपस्थितीने घर उजळत होतं.

त्याने केलेल्या छोट्या मदतींची किती किंमत होती.

घरातील शांतता, हसू, एकोपा यामागे त्याचीच छाया होती.

त्याच्या शब्दांनी दुखावलं असेल पण ते खरं तर मार्गदर्शन होतं.

यापैकी काहीही आपण त्याच्या जिवंतपणी ओळखत नाही.

'ओळख' मिळवण्यासाठी माणूस काय करतो?

आजकाल लोक चांगलं काम करताना सुद्धा इमेजबद्दल विचार करतात
“लोक काय म्हणतील?”
“समाज माझ्याबद्दल चांगलं बोलेल का?”

पण वस्तुस्थिती अशी आहे की समाज कधीच समाधानी नसतो.
कोण कितीही चांगलं वागलं तरी लोक बोलणारच.

त्यामुळे जिवंत माणूस चांगला वाटतच नाही
त्याच्याकडून लोकांना नेहमी काहीतरी जास्त अपेक्षा असतात.

आपण जिवंतांना तितकाच आदर दिला तर?

कल्पना करा
आपण ज्या माणसाबद्दल मृत्यूनंतर चांगलं बोलतो, त्याच्याबद्दल जिवंतपणीही तेच बोललो तर?

त्याचा आत्मविश्वास वाढेल.

नाती दुरुस्त होतील.

गैरसमज कमी होतील.

प्रेम वाढेल.

आणि सर्वात महत्त्वाचं पश्चात्ताप कमी होईल.

आदर हा मृत्यूची वाट पाहून देण्यासारखी गोष्ट नाही.

‘हीच खरी व्यथा’ कारण?

कारणच आपली ही मानसिकता आहे की

जिथे माणसाला जिवंतपणी नाकारलं जातं,
तेथे मृत्यूनंतरच्या स्तुतीला काही अर्थच उरत नाही.

माणूस जगत असताना त्याची किंमत कळत नाही.
तो निघून गेल्यावर मात्र तो अमूल्य वाटतो.

बदल कुठून सुरू करायचा?

१. जिवंत असलेल्या लोकांना appreciation द्या.
२. समजून घ्या की प्रत्येकाची संघर्षकथा आहे.
३. गैरसमज ठेवण्याऐवजी संवाद साधा.
४. ‘उणिवा शोधणा-या’ मानसिकतेला आवर घाला.
५. प्रेम, आदर, कृतज्ञता जिवंतपणी व्यक्त करा.

“मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता” ही वाक्यं केवळ सामाजिक परंपरा नाहीत, तर त्यामागे मानवी मनातील अनेक थर दडलेले आहेत. आपण जिवंत असलेल्या माणसाला कमी लेखतो, त्याच्या मूल्याकडे दुर्लक्ष करतो, आणि तो निघून गेल्यावर त्याची ओळख पटते ही मानवस्वभावातील सर्वांत वेदनादायी बाब.

खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा आपण

जिवंतपणी माणसाला त्याची खरी किंमत देऊ,
त्याचे गुण ओळखू, त्याच्याकडे मानव म्हणून पाहू.

कारण मृत्यूनंतर केलेली स्तुती कधीच त्या माणसाच्या कानापर्यंत पोहोचत नाही;
पण जिवंतपणी दिलेला छोटा ‘आदर’ त्याचं जगणं बदलू शकतो.

मृत्यूनंतर Miss you म्हणण्यापेक्षा
जिवंत असताना With you म्हणून...

त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण निर्माण करावेत आणि त्यांच्या मृत्यूनंतर या अनुभूतीचा काही अर्थ राहणार नाही तर ती अनुभूती जिवंतपणे त्यांना देऊन व आपणही त्यांच्या जीवनात काहीतरी महत्त्वाची होतो ही भावना त्यांना जिवंतपणेच द्यायला हवी, कारण मृत्यूनंतर आपण त्यांना किती आठवतो किती त्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम आहे हे कळत नाही म्हणून जे काय आहे ते जिवंतपणीच त्यांना सांगणं आणि तसं मनातून वागणं हेच खरं माणूस पण जगण्याचा लक्षण आहे...


©®सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५


0