बुद्धिमान बायको
वैशाख एका फॅक्टरीत मेंटेनेंस मॅनेजर होता, आणि त्या दिवशी सॉलिड चिडला होता. एक महत्वाचं मशीन बंद पडलं होतं. प्रॉडक्शन थांबलं होतं. सगळे प्रॉडक्शन वाले लोकं कोंडाळं करून उभे होते, आणि प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर केंव्हा सुरू होणार हे मशीन असा प्रश्न होता. फॉल्ट तर कळला होता, पण तो दुरुस्त करण्यासाठी जो पार्ट लागणार होता, तो फॅक्टरीच्या स्टोअर मधे उपलब्ध नव्हता. आता अश्या परिस्थितीत मशीन सुरू कसं होणार, हा यक्ष प्रश्न होता.
प्रॉडक्शन मॅनेजरने जाऊन जनरल मॅनेजरला परिस्थितीची जाणीव करून दिली. साहेब ताबडतोब मशीनपाशी आले.
“काय झालं वैशाख?” साहेबांनी विचारलं. वैशाख आधीच वैतागला होता, त्यात एकेरी नावाने कोण बोलतेय या विचाराने त्याने रागानेच वळून पाहिलं. समोर साहेबांना पाहून त्याने राग आवरला.
“मशीनचा ब्रेकडाऊन झालाय, आणि पार्ट आपल्या कडे नाहीये.” – वैशाख.
“मग आता?” – साहेब.
“काही नाही, मघा पासून देसी जुगाड लावण्याचा प्रयत्न करतो आहे, पण जमेल असं वाटत नाही.” – वैशाख.
“ठीक आहे. प्रयत्न चालू ठेव. स्टोअर ऑफिसर अजून आहेत का? असतील तर बोलवा त्यांना.” – साहेब.
बोलवायला गेलेला माणूस परत आला आणि त्याने सांगितले की स्टोअर चे साहेब घरी गेलेत. साहेबांनी घडयाळ पाहिलं. रात्रीचे आठ वाजले होते. परचेस वाले कोणी आहेत का ते बघायला . साहेबांनी सांगितलं. ते पण कोणी नव्हते. सर्वच घरी गेले होते. मग प्रॉडक्शन मॅनेजर कडे वळून साहेब म्हणाले,
“तुम्हाला पण हा त्रास होतो का? गोष्टी वेळच्या वेळी मिळत नाही का?”
“हो सर, स्टोअर खूपच अकार्यक्षम झालं आहे. पूर्वी परमेश्वरन साहेब होते तेंव्हा सर्व सर्व व्यवस्थि होतं. पण त्यांच्या जागेवर कोणीच आलं नाहीये म्हणून हा घोळ होतो आहे साहेब.” – प्रॉडक्शन मॅनेजर सेनगुप्ता.
“अरे, त्यांच्याच तालमीत तयार झालेले विनोदकुमार आहेत की, मग?” – साहेब.
“नाही सर त्यांना झेपत नाहीये, परत त्यांचा माणसांवर विशेष कंट्रोल पण नाहीये. सगळीच मनमानी सुरू आहे.” – सेनगुप्ता. वैशाख पण म्हणाला की सेनगुप्ता साहेब बरोबर बोलताहेत म्हणून.
“ओके, वैशाख तू प्रयत्न चालू ठेव, उद्या बघू. आज आत्ता काहीच करता येणं शक्य नाहीये.” असं बोलून साहेब चालले गेले. वैशाख रात्री दोन वाजे पर्यन्त प्रयत्न करत होता, पण पण शक्य झालं नाही. तुटलेल्या पार्ट चा पर्याय काही केल्या जमात नव्हता. शेवटी सेनगुप्ता म्हणाला,
“वैशाख, सोड आता, तू पण थकला आहे आणि काही शक्यता दिसत नाहीये. उद्या सकाळी पहिलं काम म्हणजे नवीन पार्ट आणणे आणि मशीन चालू करणे.”
सकाळी दुकानं उघडल्या नंतर पार्ट फॅक्टरीत आला, तो मशीनला लाऊन मशीन चालू करण्यात आली. प्रॉडक्शन सुरू झाल्या नंतर जनरल मॅनेजर साहेबांनी मीटिंग बोलावली. मीटिंग मधे सेनगुप्ता आणि वैशाखने इतक्या साऱ्या गोष्टी पुराव्यासह सांगितल्या की स्टोअर ऑफिसरला काही स्पष्टीकरण देताच आलं नाही. मग स्टोअर ऑफिसरला ला भरपूर झाड झटक करून झाल्यावर साहेब म्हणाले, की माझ्या मते तुम्हा दोघांपैकी कोणीतरी स्टोअर चा चार्ज घ्यावा, जेणेकरून कालच्या सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही.
“सर, मला प्रॉडक्शन आणि प्लॅनिंगच इतकं काम असतं की मी फारसा वेळ स्टोअर कडे देऊ शकणार नाही. वैशाखने त्यांच्या टीमला इतकं उत्कृष्ट ट्रेनिंग दिलं आहे की वैशाख स्टोअर साठी वेळ काढू शकेल.” – सेनगुप्ताने अतिशय चतुराईने बॉल वैशाख कडे टोलवला.
“सर मला वेळेवर हवे ते सामान मिळत नाही म्हणून मी तक्रार केली, पण स्टोअर कसं चालवायचं हे मला माहीत नाही. या बाबतीत कोणी अनुभवी माणूसच आपली मदत कटू शकेल. लवकरात लवकर स्टोअर मॅनेजरची नेमणूक व्हायला हवी.”–वैशाख.
“मी मॅनेजमेंटला यांची कल्पना दिली आहे. काय निर्णय होतो ते बघू, पण तो पर्यन्त तू स्टोअर सांभाळ. फूल फ्रीडम” – साहेब.
“साहेब, जर परिस्थिती माझ्यामुळे अजून बिघडली तर काय करायचं?” – वैशाख.
“वैशाख, तुला जारी नसला तरी आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तू स्टोअर उत्कृष्ट पणे सांभाळशील, इतकंच नव्हे तर अनेक फायदेशीर उपाययोजना पण करशील. आणि तुला मदत करायला विनोद कुमार आहेच, तू टेंशन घेऊ नकोस.”–साहेब.
झालं. शिक्का मोर्तब झालं. साहेबांनी एक सरक्युलर काढलं, आणि वैशाखला स्टोअर इनचार्ज बनवलं. चॅप्टर संपला. वैशाख दोन तास नुसता बसून विचार करत होता, पण त्याला काहीच सुचत नव्हतं. स्टोअर म्हणजे काही खायचं काम नव्हतं. विचार करत करतच तो घरी आला. तो लवकर घरी आला याचं ललनाला जरा आश्चर्यच वाटलं.
“लले, डोक्याचा भुगा झालाय, काहीतरी खायला दे. काहीतरी छानसं दे.” – वैशाख.
“काय देऊ? उपमा, पोहे करू?” – ललना.
“छ्या, नेहमी काय तेच तेच, तू असं कर बॉईल्ड एग दे. चांगली तीन अंडी उकड. आज अंडी खाऊया.”-वैशाख
“बॉईल्ड एग? तुम्हाला तर मुळीच आवडत नाही, आज कशी आवड बदलली?”–ललना
“काल पासून सगळंच विचित्र घडतंय, म्हंटलं न डोक्याचा भुगा झालाय” – वैशाख.
मग वैशाखने तिला काल पासून काय काय घडलं, ते थोडक्यात सांगितलं.
“बापरे, तुम्हाला स्टोअर ची काय माहिती आहे?” -ललना.
“तेच तर, काय करावं तेच समाजात नाहीये. बघू काय करता येतं ते “ – वैशाख
लालनाने त्यांच्या समोर अंडी आणून ठेवली.
“अरे, गडबड झाली, यावर मिरपूड हवी आहे. आपण आंब्याच्या रसावर मिरपूड घेतो, पण आंब्याचा सीजन तर संपला, मग आता मिरपूड नसेल. टेस्ट नाही येणार.” – वैशाख.
ललनाने मिरपूड आणली. वैशाखला आश्चर्यच वाटलं.
“हे कसं काय मॅनेज केलस तू? आत्ता केलीस?” – वैशाख.
“नाही, घरात प्रत्येक गोष्ट असतेच. तुम्हा लोकांना कळत नाही इतकंच.” – ललना.
“म्हणजे काय? मी काहीही मागीतलं तरी ते असेल?” – वैशाख.
“आत्ता लक्षात येते तुमच्या? आम्ही बायका दिवसभर काय करतो हाच समज आहे तुम्हा लोकांचा, पण खरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तोंडातून शब्द काढल्यावर गोष्टी तुमच्या समोर हजर असतात हे तुमच्या लक्षातच येत नाही.” – ललना.
“माय गॉड, हे माझ्या लक्षातच आलं नाही. लले, प्रॉब्लेम सुटला. अगदी घरच्या घरी सुटला.” – वैशाख.
“म्हणजे काय? मला समजलं नाही.” – ललना.
“नेव्हर माइंड, मी आलोच एक फोन करून.” – वैशाख.
वैशाखने साहेबांना फोन लावला.
“सर मला चार दिवस सुट्टी पाहिजे आहे.” – वैशाख.
“अरे, अचानक काय झालं? तब्येत बरी आहे न?” – साहेब.
“मी स्टोअर चं ट्रेनिंग घेणार आहे चार दिवस. मग बघा स्टोअर कसं अप टु डेट करतो ते.” – वैशाख.
“अरे पण तुझं डिपार्टमेंट कोण सांभाळेल?” – साहेब.
“चिंता करू नका साहेब, सगळे ट्रेंड आहेत. आणि मी आहेच अव्हेलेबल तशीच जरूर पडली तर.” – वैशाख.
“ओके” – साहेब.
“तुम्ही ट्रेनिंगला जाणार आहात? कुठे? आधी बोलला नाही?” – ललना.
“ट्रेनिंगच घेणार आहे, पण घरीच. आणि तूच देणार आहेस.” – वैशाख.
“शेवटी बायकोच सापडते ना चेष्टा करायला? नसेल सांगायचं तर नका सांगू.”-ललना
“नाही नाही, तू समजते आहेस तसं काही नाहीये. मला तुम्ही लोकं किचन मॅनेजमेंट कशी करता ते नीट समजाऊन सांग. म्हणजे माझी नवीन जबाबदारी मला समर्थ पणे पेलता येईल असा माझा विश्वास आहे.” – वैशाख.
अहो, काही तरीच काय? किचन वरुन तुम्ही फॅक्टरी सांभाळणार? लोकं हसतील तुम्हाला.” – ललना.
“त्यांची चिंता तू करू नकोस, ते मी बघेन.” – वैशाख.
“ठीक आहे. काय सांगू तुम्हाला? मला असं सांगता येणार नाही. तुम्ही विचारा, मग मी सांगते.” – ललना.
“ओके, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तू बोल.” – वैशाख.
नंबर १ रोजच्या रोज लागणारे पदार्थ किंवा वस्तु.
महिन्या भरात लागणारा अंदाज घेऊन त्याप्रमाणे भरून ठेवायच्या. म्हणजे गहू, तांदूळ, निरनिराळ्या प्रकारच्या डाळी, ज्वारीचं पीठ, तांदुळाचं पीठ, हळद तिखट, मोहरी, जीर आणि नेहमी लागणारे मसाले. चहा, कॉफी, दूध दही पूजेचं साहित्य साबण, साबण पाऊडर वगैरे.
नंबर २ अधून मधून लागणाऱ्या वस्तु.
म्हणजे पोहे, रवा, मैदा, चीज, सावजी मसाला, दाणे, साबुदाणा, सुका मेवा वगैरे.
नंबर ३ सण वार किंवा वर्षातून एकदा किंवा चातुर्मासातच लागणाऱ्या वस्तु.
नंबर ४ भाज्या, फळं, आणि तशाच लवकर खराब होणाऱ्या वस्तु.
आणखीही बऱ्याच गोष्टी असतात की ज्या अगदी थोड्या प्रमाणात लागतात आणि वर्षातून केंव्हा तरी एकदाच लागतात. उदा.- पूजेच्या सुपाऱ्या, जानवी जोड, श्राद्धाला लागणाऱ्या वस्तु,
काही काही गोष्टींची अकस्मात जुळणी करावी लागते. उदा.- लग्नाचं, मुंजीचं किंवा वाढदिवसांचं प्रेझेंट. यांच्या साठी आधीच आर्थिक तरतूद करून ठेवावी लागते.
“बापरे, घरात एवढं सगळं पहायचं असतं, आणि तू ते करतेस?” – वैशाख.
“मी एकटीच नाही, सर्वच बायका संसाराची गाडी अशीच कौशल्याने चालवतात. तुमचं लक्षच नसतं. तुम्ही काय करता? स्पीडब्रेकर वरुन सुसाट गाडी नेता, आणि आमची डोकी छताला आदळतात. आणि आम्ही, संसारात कोणालाही दुखापत होणार नाही याची काळजी घेतो. संसार रथाचं मेंटेनन्स पण आम्हीच करतो. तुम्ही काय करता? फक्त या रथाच्या पेट्रोल चे पैसे देता.” ललनाचा फणकारा स्पष्ट दिसत होता.
“ओके ओके, अशी चिडू नकोस, आता मी तुला गुरूचा दर्जा दिला आहे, माझं शिक्षण अर्धवट नको टाकुस. सॉरी म्हणतो न मी तुला. प्लीज.” – वैशाख स्वरात शक्य तितका आर्जवी पणा आणून बोलला आणि ललना विरघळली.
सगळं तर सांगितलं तुम्हाला आता अजून काय राहिलं आहे?” – ललना
“सगळ्या सामानाची लिस्ट कशी करायची ते तर कळलं. आता काय कुठे ठेवतेस ते सांग. यांच्या मागे पण काही गणित असतं का?” – वैशाख.
“असतं तर. हे बघा, गहू, तांदूळ डाळ यांच्या मोठ्या कोठया असतात, त्या सर्वात खाली. वरच्या खणात, कणिक, ज्वारीचं पीठ तांदूळ आणि डाळीचे छोटे आठवड्या भरात लागणारे डबे. शेजारी चहा आणि साखरेचे डबे. रोज लागणारी चहा आणि साखर ओट्यांच्या ड्रॉवर मधे. वरच्या खणात, हळद, तिखट, मसाले, मोहरी जिरं तूप, तेल वगैरेच्या मोठ्या बाटल्या. रोज लागणार सामान मिसळण्याच्या डब्यात आणि तो ओट्यांच्या ड्रॉवर मधे. कधी कधी लागणारं सामान, म्हणजे पापड, पोहे, बिस्किटं वगैरे वरच्या खणात. असंच गरज आणि फ्रीक्वेंसी प्रमाणे सामान लावायचं. जरूर भासल्यास जागेची आदला बदल करायची. या दुसऱ्या कपाटात क्वचित आणि अचानक मागणी होणारे पदार्थ ठेवायचे. उदा. आंबे हळद, तुरटी, वेखंड लहान बाळाच्या गुटी चं सामान, मेणबत्त्या, रांगोळी वगैरे. जसं आज मी मिरपूड काढून दिली. आंब्याच्या मोसमात ती नेहमी लागते, तेंव्हा ती ओट्याच्या ड्रॉवर मधे असते..
वैशाखला आता संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं होतं. तो खुशीत होता. मग ललनाने अनेक खाचा खोंचा समजाऊन सांगितल्या. आता गरज आणि सामानाची आंपूर्ती कशी करायची ते सांगितलं कशी चार दुकानं हिंडायची आणि सर्वात विश्वासार्ह दुकान कसं निवडायचं ते सांगितलं.
“सामान घरी आल्यावर, जसं असेल तसं लगेच लावून ठेवायचं नाही.”- ललना.
“मग काय करायचं?” – वैशाख.
“प्रत्येक सामान उघडून बघायचं. आपल्याला हवं तेच आलं आहे यांची खात्री करून घ्यायची.” – ललना.
“अग, जे मागवलं तेच दुकानदार पाठवेल ना, मग बघायचं कशाला?” – वैशाख.
“आता हे बघा, छोले, हे तीन प्रकारचे असतात. छोटे, माध्यम आणि मोठे. आपण साधारण माध्यम आकाराचे खातो, जर त्याने मोठे पाठवले तर वापस करावे लागतील. म्हणून बघायचं. साबुदाणा दोन प्रकारचा असतो, तुम्हाला बारीक आवडत नाही. बारीक आला तर काय करायचं? वरतून ब्रॅंड. आपल्याला काही काही ब्रॅंड ची सवय झाली असते. त्या लोकांना धंदा करायचं असतो, एवरेस्ट च्या ऐवजी बादशाह मसाला पाठवला की लगेच तुमची कमेन्ट असते, “आज भाजी नेहमी सारखी झाली नाहीये.” त्यामुळे हे सगळं बघावच लागतं. कोल्हापुरी च्या ऐवजी अंकापल्ली किंवा पतंजलीचा गूळ आला की पदार्थांची सगळी चवच बदलते.” – ललना.
“लले मला तुझा अभिमान वाटतो. कसली बुद्धिमान आहेस तू!” – वैशाख कौतुकाने म्हणाला.
“ते ठीक आहे हो, पण या सगळ्यांचा तुमच्या कामाशी काय संबंध आहे?” – ललना.
“ते तुझं गहू, तांदूळ गूळ वगैरे तपशील सोडून दे, प्रिन्सिपल महत्वाचं. याच प्रिन्सिपल वर मी आमच्या कंपनीच्या स्टोअरची उभारणी करणार आहे. एकदा ते झालं, की सर्व सुरळीत होईल.” वैशाख म्हणाला. “बोल काय गुरुदक्षिणा देऊ तुंला. आज तू म्हणशील ते.”
मग दोघ शॉपिंगला गेले, वैशाखच्या मते ते अतिशय बोरिंग काम होतं, आणि साधारण पणे तो टाळाटाळ करायचं, पण आजची गोष्ट वेगळी होती. ललना साठी त्याने पूर्ण वेळ चेहरा हसरा ठेवला होता, तिच्या बरोबरीने साड्या बघितल्या, चर्चा केली. मग बाहेर हॉटेल मधे जेवण. ललना एकदम खुश. आणि ती खुश म्हणून वैशाख पण खुश.
दुसऱ्या दिवशी वैशाख फॅक्टरीत हजार. साहेबांना जरा आश्चर्यच वाटलं.
“अरे तू चार दिवस सुट्टी घेतली होती ना? मग आज कसा काय आलास?” – साहेब.
“मला वाटलं होतं, चार दिवस लागतील, पण एकाच दिवसांत सर्व समजलं.” – वैशाख
“मग आज पासून स्टोअर चा चार्ज घेतो आहेस?” – साहेब.
“हो पण मला काही दिवस द्या, आधी परिस्थिती बघतो आणि मग काय बदल करायचे ते करतो. अजून काही दिवस तरी त्रास सहन करावा लागणार आहे”- वैशाख
साहेब काही बोलले नाहीत, नुसतेच थंबस् अप करून चालले गेले.
वैशाखने पूर्ण दिवस स्टोअरचं निरीक्षण करण्यात घालवला. दुसऱ्या दिवशी तो प्रॉडक्शन मॅनेजर बरोबर बसला. निरनिराळ्या बॅच ला लागणाऱ्या सामाना बद्दल माहिती घेतली, कोणच्या प्रॉडक्शन साठी कोणचं रॉ मटेरियल आणि किती प्रमाणात लागतं यांची यादी बनवली. मग प्लॅनिंग मॅनेजर बरोबर बसून पुढच्या दोन महिन्यांची लिस्ट घेतली. एवढं झाल्यावर, स्टोअर मधे जुन्या प्रॉडक्शन प्रोग्राम प्रमाणे जे प्रमाणाबाहेर सामान मागवलेलं होतं ते एका बाजूला काढल, त्यांच्या मुळे जागा अडत होती आणि कामात अडथळे पण येत होते. ते सर्व स्क्रॅप म्हणून विकून टाकलं. त्याचेच ५ लाख रुपये आले. स्टोअर आता बरंच मोकळं झालं होतं. मग व्हाइट पेंट आणून स्टोअरचे भाग पाडले. प्रत्येक भागावर बॅच चं नाव लिहून जड सामान जमिनीवर आणि बाकी रॅक् मधे लावून ठेवलं आणि प्रत्येक सामानावर लेबल लावले. एवढं झाल्यावर अत्यावश्यक आणि नेहमी मेंटेनन्स ला लागणारं सामान यांची विभागणी करून ते नीट लावून ठेवलं.
आता प्लॅनिंग प्रोग्राम प्रमाणे जे जे सामान हवं होतं त्या प्रमाणे परचेस डिपार्टमेंटला मागणी नोंदवली. हे सर्व करतांना त्याने आपल्या एका सहकाऱ्याला बरोबर घेतलं होतं, त्याला मटेरियल कसं तपासायचं त्याला ट्रेनिंग दिलं. तो आलेल्या मटेरियलचं क्वालिटी इन्सपेक्शन करणार होता, त्याने अप्रूव केल्यावरच मटेरियल स्वीकारल्या जाणार होतं आणि पेमेंट क्लियर होणार होतं.
ही सगळी व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वित व्हायला जवळ जवळ तीन महीने लागले. त्यांच्या नंतर मात्र स्टोअर बद्दल कुठलीच तक्रार आली नाही. वैशाख ला एक कौतुकाचं सर्टिफिकेट मिळालं आणि प्रमोशन पण मिळालं. हे सर्व ललना मुळे शक्य झालं अशी जाहीर कबुली वैशाखने सत्कार समारंभात दिली.
समाप्त
दिलीप भिडे
दिलीप भिडे.