Login

विंडो शॉपिंग

मॅडम सारखी इतकी शॉपिंग करतात पण आपली रंजना मात्र विंडो शॉपिंग करूनच आनंद मानते.मागच्या आठवड्यात दोघे काही समान खरेदीसाठी गेले होते.कितीतरी दिवसांनी आईने दोघांना मुद्दाम बाहेर पाठवलं होतं.आपल्यामुळे मुलांना अडकून पडावं लागतं याचं वाईट त्या माऊलीला नेहेमीच वाटायचं.रंजना आणि महादेव एकमेकांवर खूप प्रेम करायचे,समजून घ्यायचे."रंजू ,अग किती दगदग होते तुझी?मला चांगली नोकरी मिळेपर्यंत तुलाही मी नोकरी सोड असं सांगू शकत नाही.पण शोधतो आहेच मी लवकर मिळेल काहीतरी.सध्या काही मुलांच्या त्युशन्स घ्याव्या म्हणतोय.पण तुझ्यासाठी काहीतरी खरेदी कर ना.बघ किती छान छान वस्तू आहेत ते.इतर बायकांसारखी शॉपिंग करावी असं तुला नाही का वाटत?""अहो,शॉपिंग तर नेहेमीच करते मी.आताही करतेच आहे ना ." महादेव तिचं बोलणं ऐकून आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला तशी ती खळखळून हसली."अहो त्याला विंडो शॉपिंग म्हणतात.म्हणजे फक्त बाहेरून बघायचं.त्या वस्तूंना आपल्या जवळ अनुभव करायचं.यामुळे आपल्याला भाव बघायची सुद्धा गरज नसते.हव्या त्या महागड्या वस्तूंची शॉपिंग करता येते.आहे की नाही मज्जा?"
©®स्मिता भोस्कर चिद्रवार

विंडो शॉपिंग


" ड्राइवर,लवकर या.दोन मिनिटं झाली मी ह्या बॅग्स घेऊन उभी आहे इकडे."शोभना एक अतिशय श्रीमंत आणि अगदी तिच्या नवऱ्याच्या पैशाचा पुरेपूर उपभोग घेऊन आनंद मानण्यातली होती.आजही नेहेमीप्रमाणे भरपूर उधळपट्टी करून ती तिच्या मैत्रिणींच्या सोबत हॉटेलमध्ये जाण्यासाठी तयार होती.तिला तिच्या श्रीमंतीचा खूप तोरा होता.दोन मिनिटे थांबावं लागलं याचा खूप राग आला होता तिला.त्यात मैत्रिणींची भर पडली.'इतके पैसे देऊनही लाज नाही या लोकांना.आता चांगली बघते...' मनात विचार करत असतानाच तिला गाडी दिसली.
"पटकन बसा मॅडम.इथे थांबायला नाही जमत."ड्रायव्हर काकुळतीने बोलला.
"तू काय समजतोस रे स्वतःला?आमची गाडी आणि इतके पैसे देतो ना तुला मग तरीही आम्ही रस्त्यावर थांबायचं?लाज नाही राहिली तुम्हा लोकांना.आयता पगार मिळतो ना.यापुढे हे खपवून घेतलं जाणार नाही समजलं?"शोभना वाट्टेल ते बोलत होती.
"सॉरी मॅडम,पण खूप ट्रॅफिक होता आणि तिथे थांबलो तर पोलीस पकडतात."महादेव खरं सांगायचा प्रयत्न करत होता.पण शोभना मुद्दाम मैत्रिणींसमोर त्याला घालून पाडून बोलत होती.खरंतर तो एक चांगल्या घरातला शिकलेला मुलगा होता.पण वडिलांच्या आजारपणात त्याने त्याची नोकरी गमावली.खूप पैसे खर्च झाले.तशी त्याची बायको रंजना नोकरी करत होती.पण आई आता थकली होती.त्यामुळे तिला वेळ देता यावा म्हणून तिच्यासाठी तो हे काम करत होता.रंजनाचे नोकरीचे तास खूप होते,तिचं ऑफिससुद्धा दूर होतं पण पगार चांगला होता त्यामुळे सध्या दोघांनी मिळून हा सुवर्णमध्य काढला होता.
शोभना मॅडमचं बोलणं त्याच्या मनावर नेहेमीच आघात करायचं पण आज मात्र त्याचं लक्ष मॉलमधल्या त्या मोठ्याल्या दुकानांकडे होतं.या मॅडम सारखी इतकी शॉपिंग करतात पण आपली रंजना मात्र विंडो शॉपिंग करूनच आनंद मानते.मागच्या आठवड्यात दोघे काही समान खरेदीसाठी गेले होते.कितीतरी दिवसांनी आईने दोघांना मुद्दाम बाहेर पाठवलं होतं.आपल्यामुळे मुलांना अडकून पडावं लागतं याचं वाईट त्या माऊलीला नेहेमीच वाटायचं.
रंजना आणि महादेव एकमेकांवर खूप प्रेम करायचे,समजून घ्यायचे.
"रंजू ,अग किती दगदग होते तुझी?मला चांगली नोकरी मिळेपर्यंत तुलाही मी नोकरी सोड असं सांगू शकत नाही.पण शोधतो आहेच मी लवकर मिळेल काहीतरी.सध्या काही मुलांच्या त्युशन्स घ्याव्या म्हणतोय.पण तुझ्यासाठी काहीतरी खरेदी कर ना.बघ किती छान छान वस्तू आहेत ते.इतर बायकांसारखी शॉपिंग करावी असं तुला नाही का वाटत?"
"अहो,शॉपिंग तर नेहेमीच करते मी.आताही करतेच आहे ना ." महादेव तिचं बोलणं ऐकून आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला तशी ती खळखळून हसली.
"अहो त्याला विंडो शॉपिंग म्हणतात.म्हणजे फक्त बाहेरून बघायचं.त्या वस्तूंना आपल्या जवळ अनुभव करायचं.यामुळे आपल्याला भाव बघायची सुद्धा गरज नसते.हव्या त्या महागड्या वस्तूंची शॉपिंग करता येते.आहे की नाही मज्जा?" तिचं ते बोलणं ऐकून महादेवने देवाचे आभार मानले.इतकी समजूतदार बायको लाभली याचा त्याला पुन्हा एकदा अभिमान वाटला.