Login

विजेते वेगळं करत नाहीत… ते तेच वेगळ्या पद्धतीने करतात

यशस्वी माणूस वेगळ्या जगात राहत नाही, तो त्याच जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतो.
विजेते वेगळं करत नाहीत… ते तेच वेगळ्या पद्धतीने करतात....सुनिल पुणैTM

“Winners don’t do different things, they do things differently” हे वाक्य फक्त मोटिवेशनल कोट नाही, तर जगण्याची एक शिस्त आहे. मी स्वतः या वाक्यानुसार वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. कारण आयुष्यात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली यशस्वी माणूस वेगळ्या जगात राहत नाही, तो त्याच जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतो.

बहुतेक लोक सकाळी उठतात, काम करतात, संध्याकाळी थकून घरी येतात आणि दिवस संपतो. विजेताही तेच करतो. फरक इतकाच असतो की तो “का करतो?” आणि “कसं करतो?” याचा विचार करतो. तो कामाला ओझं मानत नाही, तर तेच काम संधी मानतो. जिथे सामान्य माणूस वेळ काढतो, तिथे विजेता वेळ निर्माण करतो. जिथे लोक कारणं देतात, तिथे तो मार्ग शोधतो.

मी पाहिलं आहे अपयश सगळ्यांच्या आयुष्यात येतं. पण विजेता अपयशाला थांबण्याचं कारण बनवत नाही, तो त्याला शिकण्याचं साधन बनवतो. चूक झाली तर स्वतःला दोष देऊन खचून जाण्याऐवजी, तो विचार करतो, “यातून पुढच्या वेळी मी काय वेगळं करणार?” हाच विचार त्याला इतरांपेक्षा पुढे नेतो.

विजेता मोठ्या गोष्टींची वाट पाहत बसत नाही. तो छोट्या गोष्टी परफेक्ट करतो. वेळेवर काम करणं, दिलेला शब्द पाळणं, सतत स्वतःला अपडेट ठेवणं, लोकांशी प्रामाणिक राहणं या सगळ्या साध्या गोष्टी आहेत. पण त्या सातत्याने, वेगळ्या पद्धतीने करणं हीच विजयी मानसिकता आहे.

महत्त्वाचं म्हणजे विजेता तुलना करत नाही. तो दुसऱ्याच्या यशावर जळत नाही, ना अपयशावर खुश होतो. तो स्वतःच्या कालच्या आवृत्तीशी स्पर्धा करतो. “आज मी कालपेक्षा थोडा तरी चांगला आहे का?” हा प्रश्न तो स्वतःला रोज विचारतो.

हे सगळं वाचताना असं वाटू शकतं की हे कठीण आहे. पण खरं सांगायचं तर वेगळं आयुष्य जगणं कठीण नाही; जुन्याच पद्धतीने जगत राहणं जास्त कठीण आहे. बदलायला धाडस लागतं, पण त्याचा फायदा आयुष्यभर मिळतो.

म्हणूनच मी या वाक्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो वेगळं करण्यासाठी नाही, तर तेच काम वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या शिस्तीत आणि वेगळ्या जिद्दीने करण्यासाठी. कारण शेवटी जिंकणारे लोक वेगळे नसतात…
त्यांची पद्धत वेगळी असते.

सुनिल पुणे TM 9359850065
0