Login

वंडर ट्वेल्व्ह पुस्तक समीक्षण

वंडर ट्वेल्व्ह - सुहास शिरवळकर
पुस्तकाचे नाव : वंडर ट्वेल्व्ह
लेखक : सुहास शिरवळकर

मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध साहित्यिक म्हणजे सुहास शिरवळकर. सामाजिक, प्रेम, रहस्य, गुप्तहेर कथा, लघुकथा, इ. लेखनप्रकारात सुशिंचं बरंचसं लिखाण प्रकाशित झालंय. ऐतिहासिक, एकांकिका, बालसाहित्य, कविता, नभोनाट्य, इ. प्रकारातही त्यांचं लिखाण प्रसिद्ध आहे. त्यांनी दिडशेहून अधिक रहस्यकथा लिहूनही प्रत्येक वेळी त्यांच्या रहस्यकथा वाचताना काहीतरी नवीन वाचायला मिळतं. हेच इतर प्रकारच्या साहित्याबाबतही म्हणावं लागेल. प्रत्येक पुस्तकाचं मुखपृष्ठही विशेष असायचं. तसं तर त्यांच्या कथेतील प्रत्येक पात्र मनात घर करून जातं; पण त्यांची बॅरिस्टर अमर, मंदार पटवर्धन, दारा बुलंद, इ. पात्रं तर अजरामर म्हणावी लागतील. 'दुनियादारी' तर आज चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच जणांपर्यंत पोहोचली आहे. मात्र सुशिंची कादंबरी स्वरूपातील दुनियादारी वाचण्याची मजा काही औरच! हेच 'समांतर'बाबतही. 'देवकी'ची लोकप्रियता सर्वांनी अनुभवली आहेच. एकूणच काय, तर सुहास शिरवळकर आणि त्यांच्या साहित्याविषयी जितकं बोलू तितकं कमीच.

'प्रेषित' बंगल्यापासून सुरुवात होणारा हा वंडर ट्वेल्व्ह कादंबरीचा प्रवास. सूर्यकांत प्रेषित आणि तिथे जमलेली काही पात्रं यांच्यातील हलकेफुलके संवाद, तसेच मानवी मनाच्या पैलूंना हात घातलेलं लिखाण वाचताना नकळतच जिव्हाळा जाणवतो. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारी ती 'खास चीज', तिचं वर्णन वाचताना आपसूकच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. यातूनच उलगडा होतो चंद्रवर्मा आणि 'वंडर ट्वेल्व्ह'चा!


पुढे अमर मंझिलच्या उल्लेखासोबत बॅरिस्टर अमर विश्वास आणि इतर पात्रं भेटीस येतात. तेव्हा हे कथानक आतापर्यंत वाचत असलेल्या ओळींपेक्षा वेगळं आहे असं वाटणंही स्वाभाविक आहे; पण अचानक चंद्रवर्मा यांचा उल्लेख येतो आणि पुन्हा एकदा 'वंडर ट्वेल्व्ह'ची आठवण होते. किंबहुना तसा आवश्यक तो उलगडा होतोच म्हणा. त्या क्षणी भविष्यात वेगवेगळ्या अनपेक्षित रहस्यांवरून पडदा दूर होईल याची जाणीवही होते.

अमर आणि तनुजा वास्वानीतल्या संभाषणातली सहजता जशी कथेतली रंजकता वाढवते, तशीच शंका निर्माण व्हायलाही कारणीभूत ठरते. पुढे बिट्टू भाटीच्या बोलण्यामुळे मनातले बरेचसे अंदाज चुकले की काय असं वाटतं आणि नवे अंदाज जन्म घेतात. या सगळ्यात अमरच्या हुशारीचं विशेष कौतुक करावंसं वाटत असतानाच पुन्हा एकदा अंदाज हुलकावणी देतात.

अशातच कथानकाला वेगळंच वळण देणारी घटना घडते. ती म्हणजे एका महत्त्वाच्या पात्राचा खून! ईश्वर सर्वसाक्षी खरंच खुनी आहे? की पडद्यामागून भलताच डाव रचला गेलाय? अशा प्रश्नांचा विचार करता करता अमरचं विचारचक्र आपल्यालाही विचार करायला भाग पाडतं.

न्यायालयातील एकूणच वातावरणनिर्मिती वाचकांना कथेत गुंतवून ठेवते. पुन्हा एकदा अमर या पात्राच्या हुशारीला दाद द्यावीशी वाटते. जसजसा प्रसंग पुढे सरकतो, तसतसे वेगवेगळे पैलू समोर येतात. उलटतपासणी, नवे खुलासे, नवी वळणं हे कथानक पुढे काय वळण घेईल याची उत्सुकता वाढवतात. अशातच अमरच्या शाब्दिक खेळाने कथेचं चित्रच बदलून जातं. 'द लाईफ' भोवती फिरणारं हे चक्र विचारांच्या चक्रात अंदाजांना खतपाणी घालतं आणि आपसूकच अमरच्या हातातील हुकमी पानं नक्की काय आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचते.

कथानक अंतिम टप्प्यात येतं आणि या केसला एक अगदीच अनपेक्षित वळण मिळतं. वंडर ट्वेल्व्ह आणि चकाकता सूर्यप्रकाश यांच्याबद्दलचा रहस्यमय खुलासा नक्की काय? एक साधीशी सुरुवात वेगवेगळे धागेदोरे गुंफत कुठपर्यंत पोहचते? हे सर्व वाचणं नक्कीच एक उत्तम वाचन अनुभव ठरतो.


या कादंबरीच्या निमित्ताने चित्रांच्या दुनियेच्या माध्यमातून एक भन्नाट रहस्यमय वातावरण वाचायला मिळते. सुरुवातीला प्रेषित कथेतील मुख्य पात्र असावा असे विचार मनात येऊ शकतात; पण शेवटापर्यंत येताना हा अंदाज खोटा ठरतो. कोण मोहरे अन् कोण सूत्रधार? या प्रश्नाचं उत्तर तर कादंबरी वाचल्यावरच मिळेल. शिरवळकरांच्या लिखाणाची जादू या कादंबरीतही पाहायला मिळते. लेखकाने केलेली न्यायालयीन वातावरणनिर्मिती नेहमीप्रमाणेच उत्तम आहे. कथेतील रहस्य, आवश्यक गूढ कायम ठेवणं लेखकाला उत्तमरीत्या जमलं आहे. लहानसहान गोष्टींचा बारकाईने वापर केला आहे. चित्रकलेची आवड असल्यामुळे मला हे पुस्तक आणखी जवळचं भासलं. कादंबरीच्या नावाला साजेसं असं हे छानसं कथानक आहे. मांडणी, आशय, भाषाशैली, कल्पनाशक्ती सर्वच वाखाणण्याजोगे!

पुस्तकात काही लहानशा चुका जाणवून येतात; पण त्या तांत्रिक कारणांमुळे असाव्यात. चित्र, रहस्य, कला रसिकता, इ. गोष्टींचं हे चक्र अनुभवण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचून पहा.

© कामिनी खाने

सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.