Login

शब्दांच्या सावलीत फुललेले प्रेम

शब्दांनीही नाते घट्ट होतात शब्दांनीही नाते जुळतात
कथा :- शब्दांच्या सावलीत फुललेले प्रेम

अनिकेत हा एक अपंग तरुण. पायात कमजोरी असल्यामुळे त्याला चालताना आधार घ्यावा लागतो. पण शब्दांमध्ये मात्र त्याचं स्वातंत्र्य होतं. कविता म्हणजेच त्याचं आयुष्य. त्याने अनेक कविता लिहिल्या होत्या व्यथा, स्वप्नं, आणि आत्मभान यावर.

एके दिवशी, एका राज्यस्तरीय काव्य संमेलनाचं आयोजन झालं. अनिकेत त्यात सहभागी झाला. त्याच्या शब्दांमधली ताकद लोकांच्या हृदयात थेट पोचली.

त्याच संमेलनात होती "अनन्या" सुंदर, सुदृढ, आणि आत्मविश्वासू मुलगी. तिची कविता सुद्धा तितकीच खोल आणि भावनिक. ती आयुष्यातील अंधारालाही कवितेत उजळवून टाकायची ताकद बाळगून होती.

जेंव्हा अनिकेतने स्टेजवरून आपल्या अपंगत्वाविषयीची पण प्रेरणादायी कविता सादर केली, तेंव्हा अनन्याच्या डोळ्यांत पाणी आलं.

कवितेनंतर दोघांची गाठभेट झाली.
अनन्याने अनिकेतला थेट विचारलं:
“तुमच्या शब्दांमध्ये इतकी सच्चाई आहे, तेवढीच ताकद तुमच्यातही आहे... मी तुमची चाहती झाले.”

अनिकेत एक क्षण थबकला. कारण बहुतेकदा लोक त्याच्या अपंगत्वावर आधी बोलायचे. पण अनन्याने त्याच्या शब्दांतलं सौंदर्य ओळखलं होतं.

कवितेच्या निमित्ताने ते दोघं एकत्र लिहू लागले, चर्चासत्रं, काव्यलेखन स्पर्धा, एकत्र प्रवास, एकत्र विचार...

त्या ओळींतून मैत्री निर्माण झाली आणि हळूहळू प्रेम.

जेंव्हा अनन्याने आपल्या घरच्यांना अनिकेतबद्दल सांगितलं, तेंव्हा पहिल्यांदा त्यांना धक्का बसला.

“तू सुदृढ आहेस... का एखाद्या अपंगा सोबत आयुष्य घालवावं?” असं विचारलं गेलं.

पण अनन्या ठाम होती.
“त्याचा देह वेगळा असेल... पण त्याचं मन, त्याचे विचार, त्याची कविता... त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रेम केलंय.”

शेवटी, तिच्या प्रेमासमोर घरचं मत हरलं.

लग्नानंतरही त्यांची कविता चालूच राहिली.
अनिकेतच्या कवितेला अनन्याच्या स्वरांनी आवाज मिळाला.
ते दोघं एकत्र कविसंमेलनं घेत, नव्या कवींसाठी मार्गदर्शन करत आणि लोकांमध्ये एकच संदेश देत:

“प्रेम ही केवळ देहाची गोष्ट नाही,
ते मनाच्या गाभाऱ्यात फुलणारं नातं आहे.”

शेवटी, ते दोघंही एकत्र लिहित राहिले
एक अपूर्णता आणि एक संपूर्णता एकमेकात पूर्णत्व शोधत…
शब्दांच्या सावलीत एक सुंदर आयुष्य जगत.

"शब्दांच सजन"

तुझ्या कवितेच्या ओळी
माझ्या हृदयात खोल गुंतल्या
तुझ्या अक्षरांच्या स्पर्शानं
माझ्या वेदनाही शांत झाल्या

मी जेव्हा चालू शकत नव्हतो
तुझं प्रेम माझी वाट झाली
लोक म्हणाले "तो अपंग"
माझ्यासाठी तू पूर्ण कहाणी झाली

तू सुदृढ, सुंदर, तेजस्वी
मी साधा, थोडा अधुरा
पण प्रेमाच्या या कवितेत
तुझा मिळाला मला आसरा

मी लिहीत राहिलो स्वप्नांतून
तू वाचत राहिलीस नजरेतून
तुझ्या पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा
तू पाहिलंस मला माझ्या शब्दांतून

आता चालणं नसे मुद्दा
आता हातांत हात पुरेसे
तुझं प्रेम मिळालं जिथे
तिथे कोणाची गरज नसे

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३३१५
0