Login

शब्दांना धार नाही आधार हवा

शब्दांचा आधार फक्त शारीरिक आजारातच उपयोगी पडतो असं नाही. आयुष्यात प्रत्येक माणूस कुठे ना कुठे जखमी असतो. कोणी अपयशाने, कोणी नात्यांतल्या फसवणुकीने, कोणी एकटेपणाने, तर कोणी आर्थिक ताणाने. या जखमा दिसत नाहीत, पण फार खोल असतात. त्यावर कुठलंही औषध काम करत नाही. इथे काम करतात ते शब्द आपुलकीचे, समजून घेणारे, धीर देणारे.
"शब्दांना धार नको, आधार हवा",
लेखक सुनिल जाधव पुणे, 9359850065

कधी कधी माणूस आजारी पडतो तेव्हा त्याच्या अंगातला आजार जितका त्रास देतो, त्याहून जास्त त्रास त्याच्या मनाला होत असतो. शरीर दुखत असतं, ताप असतो, थकवा असतो; पण मनात वेगळाच गोंधळ चाललेला असतो. “हे बरं होईल ना?”, “आपण यातून बाहेर पडू का?”, “आपल्याला कोणी समजून घेणार आहे का?” असे अनेक प्रश्न न बोलता मनात फिरत राहतात. अशा वेळी औषधं आपलं काम करतातच, पण अनेकदा खरी गरज असते ती औषधांपेक्षा माणसाच्या शब्दांची.

आपण शब्दांचं सामर्थ्य फारच हलकं घेतो. शब्द फक्त बोलण्यासाठी असतात असं आपल्याला वाटतं. पण खरं तर शब्द जखमही करतात आणि जखम भरूनही काढतात. फरक एवढाच असतो त्या शब्दांत धार आहे की आधार. आजच्या काळात बहुतेक वेळा शब्दांना धारच जास्त असते. “तुझ्याच निष्काळजीपणामुळे झालं”, “वेळीच ऐकलं असतंस तर आज ही वेळ आली नसती”, “तू फारच मनावर घेतोस” अशा वाक्यांनी समोरचा माणूस अजूनच खचतो. आजारापेक्षा हे शब्द जास्त बोचतात.

आजारी माणसाला सल्ल्यांची गरज नसते, भाषणांची गरज नसते. त्याला गरज असते ती समजून घेणाऱ्या दोन शब्दांची. “काळजी करू नको” हे वाक्य जरी साधं असलं, तरी ते मनापासून बोललं गेलं तर त्यात मोठी ताकद असते. “मी आहे ना” एवढंच वाक्य कधी कधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनपेक्षा जास्त काम करतं. कारण त्या शब्दांत माणुसकी असते, आधार असतो.

रुग्णालयात किंवा घरी आजारी माणसाजवळ बसलेला एखादा आपला माणूस पाहिला की हे लक्षात येतं. तो सतत औषधांची चौकशी करत नसतो, रिपोर्ट्सची चर्चा करत नसतो. तो कधी फक्त हात धरून बसतो. कधी शांतपणे शेजारी बसतो. त्या शांततेतही शब्द असतात न बोललेले, पण मनाला धीर देणारे. प्रत्येक वेळी शब्द बोललेच पाहिजेत असं नाही; पण जेव्हा बोलायचे, तेव्हा ते आधार देणारे असावेत.

आपल्या समाजात एक सवय आहे दुसऱ्याच्या दुःखावर लगेच मत देण्याची. कोणी आजारी पडलं की आपण डॉक्टर झाल्यासारखं वागतो. कोणी अडचणीत सापडलं की आपण न्यायाधीश होतो. “हे असं करायला नको होतं”, “तू तिथे चुकलास”, “मी सांगितलं होतं ना” अशी वाक्यं सहज बाहेर पडतात. पण त्या क्षणी समोरचा माणूस दोष ऐकण्याच्या अवस्थेत नसतो. तो आधीच कमजोर असतो. त्याला दोष दाखवणं म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं असतं.

शब्दांचा आधार फक्त शारीरिक आजारातच उपयोगी पडतो असं नाही. आयुष्यात प्रत्येक माणूस कुठे ना कुठे जखमी असतो. कोणी अपयशाने, कोणी नात्यांतल्या फसवणुकीने, कोणी एकटेपणाने, तर कोणी आर्थिक ताणाने. या जखमा दिसत नाहीत, पण फार खोल असतात. त्यावर कुठलंही औषध काम करत नाही. इथे काम करतात ते शब्द आपुलकीचे, समजून घेणारे, धीर देणारे.

“तुझं दुःख मला समजतं”, “तू एकटा नाहीस”, “हे सगळं सहन करणं सोपं नाही” अशी वाक्यं माणसाला मोकळा श्वास घ्यायला मदत करतात. समोरचा आपल्याला समजतोय, हे जाणवलं की माणसाच्या मनात एक वेगळीच ताकद येते. तो अजून लढायला तयार होतो. आशा निर्माण होते. आणि आशा हीच खरी औषधं असतात.

आज आपण फार पटकन कठोर होतो. सोशल मीडियावर, घरात, मित्रांत सर्वत्र टोकाचे शब्द वापरले जातात. कोण चांगला, कोण वाईट, कोण योग्य, कोण अयोग्य हे ठरवायला आपण वेळ लावत नाही. पण माणूस एवढा सोपा नसतो. तो परिस्थितीने, वेळेने, वेदनेने घडलेला असतो. प्रत्येक जण सारख्या ताकदीचा नसतो. अशा वेळी त्याला धारेची नाही, तर आधाराची गरज असते.

आधार देणारे शब्द म्हणजे खोटं बोलणं नाही. सत्य लपवणं नाही. पण सत्य सांगतानाही माणुसकी ठेवणं गरजेचं असतं. कठोर शब्द बोलून समोरच्याला मोडण्यात शहाणपण नाही. त्याला उभं करणं, धीर देणं, थोडा वेळ त्याच्या बाजूने उभं राहणं हेच खरं मोठेपण.

शब्द हे आपल्या हातात असलेलं सर्वात स्वस्त, पण सर्वात प्रभावी औषध आहे. ते वापरणं आपल्यावर अवलंबून आहे. ते औषध ठरेल की विष, हे आपल्या बोलण्यावर ठरतं. म्हणूनच, जेव्हा समोरचा माणूस थकलेला असेल, आजारी असेल, हरलेला असेल, तेव्हा शब्द जपून वापरा. धारदार शब्दांनी शहाणपणा दाखवू नका. आधार देणाऱ्या शब्दांनी माणुसकी दाखवा.

कारण कधी कधी माणसाची प्रकृती गोळ्यांनी नाही, इंजेक्शनने नाही, तर एखाद्या आपुलकीच्या वाक्याने, एखाद्या विश्वासाच्या शब्दाने ठिक होते. आणि तेच शब्द त्याला पुन्हा जगण्याची हिंमत देतात.
शब्दांकन: सुनिल जाधव पुणे, 9359850065, topsunil@gmail.com
0