Login

वर्क फ्रॉम होम भाग-२

चांगली नोकरी सोडून सासरच्यांसाठी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या भाव्याची कथा!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: वर्क फ्रॉम होम भाग-२

"हा ठीक आहे." मामा-मामी येणार आहेत हे ऐकून
भाव्याला पुन्हा वाईट वाटायला लागले.

कारण आता हे नेहमीचेच झालेले.कोणतरी पाहुणे म्हणून येणार मग ते तीन-चार दिवस राहणार आणि त्यासोबतच त्यांचे सर्व तिला एकटीने करावे लागायचे आणि त्यात जरा सुद्धा काही कमी जास्त झाले तर त्यावरून बोलणे सुद्धा ऐकावे लागायचे.

तिला काही महिन्यांनी वर्क फ्रॉम होमसाठी जॉब मिळालेला होता परंतु त्याचा पगार हा तिला आधी काम करणाऱ्या पगारापेक्षा कमी होता. त्यामुळे तिला वाईट वाटत होतं परंतु जी परिस्थिती समोर आहे. ती तिने स्वीकारली होती.

सकाळी दहा ते रात्री सात वाजेपर्यंत अशी तिची कामाची वेळ होती परंतु कधी जर एखाद्या कामामुळे कामाची वेळ वाढण्याची सुद्धा शक्यता असायची.

या सगळ्याची कल्पना तिला आधीच होती त्यामुळे ती शक्य तेवढे लवकरात लवकर घरातील काम पूर्ण करून तिचे काम लॅपटॉपवर करण्याचा प्रयत्न करायची.

सतत लॅपटॉप वर बसल्यामुळे आणि सर्व घरातील काम केल्यामुळे तिला थकवा जाणवायचा पण आपल्याला आता हेच काम करणेच आहे, हे समजून ती स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून काम करण्याचा प्रयत्न करायची.

आपण एकाच वेळी एकच गोष्ट करू शकतो. सर्व कामे एकाचवेळी सर्वांनाच करणे शक्य नसते. तसेच सर्वांना आपण कधीच खूश ठेवू शकत नाही. कारण एखाद्याला आपले म्हणणे पटते किंवा एखाद्याला आपले म्हणणे पटत नाही. तरीसुद्धा भाव्या आपल्या ऑफिसचा आणि आपल्या घरातील कामाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत होती.

तिने पुन्हा एकदा सुट्टीसाठी अर्ज केलेला होता पण पंधरा दिवसांपूर्वी काही कारणाने तिने सुट्टी घेतलेली होती. त्यामुळे तिचा सुट्टीचा अर्ज फेटायला गेला होता.
तिने दुसऱ्या दिवशी महेंद्रला याबाबत सांगितले.

"मला तर ना एक समजत नाही की, एकतर तू किती थकतेस आणि दुसरे म्हणजे आता आपल्या घरी पाहुणे पण येणार तर तेव्हा तू काय लॅपटॉप घेऊन बसणार आहेस का? तुला सुट्टी देत नसतील तर तू हे काम सोडून दे." अगदी सहजपणे महेंद्र आपल्या बायकोला म्हणाला.

हे दोघांचे बोलणे हॉलमध्ये बसूनच सुरू होते. त्यावेळी भाव्याची सासू सुद्धा पाठिंबा दर्शवत म्हणाली की,
"हो, मला सुद्धा काही बाबा ते घरातून काम करणं पटत नाही. कारण मागच्या वेळेस गडबडीमध्ये तर तू जेवणामध्ये मीठच टाकायचं विसरली होतीस आणि पंधरा दिवसांपूर्वी तर महेंद्रची आत्या आलेली होती ती सुद्धा बोलत होती की असे दोन्ही ठिकाणी बघताना कुठे ना कुठेतरी दुर्लक्ष होते. जेवणामध्ये काही कमी-जास्त झाले तर मग जेवणाची इच्छाच होत नाही."

"मग थोडीफार तू सुद्धा मदत करत जा." टीव्ही बघत असणारे महेंद्रचे वडील म्हणाले.

"मला आता कुठे जमतंय? माझे तर हात-पाय खूप दुखतात."लगेच त्यांनी आपले कारण समोर सांगितले.

"मी काय म्हणत होती की आपण जर मदतनीस म्हणून कोणत्या बाईला घरकामासाठी ठेवण्याचा विचार केला तर? माझे सुद्धा काम थोडे हलके होईल." भाव्या त्यातून उपाय सुचवत म्हणाली.

"हा म्हणजे ते सगळं तू कमवायचं आणि ते त्या मोलकरणीला पैसे द्यायचे. त्यापेक्षा तू कामच करू नकोस ना म्हणजे हे सर्व करायची काही गरजच राहणार नाही." तिच्या सासूने त्यावर आपले मत सांगितले.

यावर काहीच न बोलता भाव्या आपल्या खोलीत निघून गेली.

"तू जरा तिला समजून सांग. आपण लग्नाआधीच सांगितलेले होते ना तरीसुद्धा आपण तिला घरातूनच काम करायला परवानगी दिली पण आता पाहुणे आल्यावर तिची पण ही जर अशी नाटकं सुरू राहिली तर ते काय बोलतील ?" महेंद्रची आई महेंद्रला बोलत होती.

"ठीक आहे. मी बघतो काय करायचे ते." असे म्हणून तो आपल्या खोलीत गेला.

"हे बघा जर तुम्ही मला नोकरी सोडायचं सांगणार असाल तर मी काही नोकरी सोडणार नाही. कारण आधीच घरावरती कर्ज आहे. एकट्याने सर्व भागत नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि दुसरी गोष्ट मी काही सर्व जबाबदाऱ्या झटकत नाहीये. फक्त मला मदत करायला एक व्यक्ती हवी एवढेच मी म्हणत आहे." तिने निक्षून सांगितले.

"अगं, पण दुसऱ्याच्या हातचे जेवण आईला आवडत नाही आणि पुन्हा तुला तर माहितीच आहे ना पुढच्या बिल्डिंगमध्ये एक धुणी-भांडी करणाऱ्या बाईने चोरी केलेली होती. त्यामुळे आई घाबरून बोलत आहे." तो तिला समजावत म्हणाला.

"तुम्हाला जर माझी कधी साथ द्यायचीच नव्हती तर मला लग्नामध्ये साथ देण्याचे वचन तरी कशाला दिले?" ती रोखून त्याच्याकडे बघत म्हणाली.

त्याने ह्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही आणि तो झोपून गेला.

क्रमश:

भाव्याचे वागणे बरोबर आहे का?

© विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

0

🎭 Series Post

View all