Login

वर्क फ्रॉम होम...! | भाग १

वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुलाची थरकाप उडवणारी भय कथा...!
वर्क फ्रॉम होम...!

भाग १

"हो गं आई, आत्ताच उठून आवरलं मी नाष्टा करून तुला फोन केला. तू काही खाल्लं की, नाही? नुसती माझीच विचारपूस कर..."
फोनवर सोहम त्याच्या आईला म्हणाला.

"हो खाल्ले मी, आम्ही इथे नीट आहोत. तू तिथे नीट रहा बस. कधी असा एकट्याला सोडला नाही रे कुठे. आज अमावास्या पण चालू होईल. त्यात तुझं रात्रीचं काम सांभाळून राहा रे लेकरा."
बोलताना आईच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

"मी लहान नाही आता आई. काही नाही होत. मी राहतो नीट इथे आणि आता इथे येऊन मला बारा दिवसच झालेत. आता कुठे हळू हळू काम समजायला लागले आहे. आणि असं ही आता आठवड्यातून दोन दिवस सुट्टी सांगितली आहे मग मी प्रत्येक आठवड्यात तुम्हाला भेटायला येत जाईन."
सोहमच्या बोलण्याने आईला थोडा धीर आला. पुढे तश्याच त्यांच्या बराच वेळ गप्पा चालू राहिल्या.

सोहम त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता. तेव्हा त्याला त्याच्या शहरापासून लांब दुसऱ्या शहरात नोकरीची संधी मिळाली. त्यांच्या शहरात त्याला हवी तशी संधी मिळत नव्हती. तिथे त्याने नातेवाईकांच्या ओळखीने एक खोली भाड्याने घेतली. त्याने ज्या क्षेत्रा मधून ग्रॅज्युएशन केले होते त्याला तसेच हवं त्या क्षेत्रात काम मिळाले. त्या कंपनीने त्याला वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करायला म्हणून त्याच्या घरी कॉम्प्युटर वगैरे सगळं पाठवून दिलं. पण फरक इतकाच की, ते काम रात्रीचं होतं. तो सकाळी उठल्यावर न चुकता त्याच्या आईला फोन करत असे.

बराच वेळ फोनवर बोलून त्याने फोन ठेवला मग नंतर आणखीन काही मित्रांना फोन करून त्याने थोडा वेळ घालवला. बोलता बोलता त्याने जेवण बनवले आणि जेवण बनवून झाल्यावर फोन ठेवून त्याने जेवायला घेतले. आणि जेऊन त्याने संध्याकाळ होई पर्यंत पुन्हा थोडी झोप घेतली.

बघता बघता संध्याकाळ झाली. संध्याकाळी पाच वाजता त्याला लॉगिन करायचे होते. त्याने उठून चहा बनवला त्याचं सगळं आवरून चहाचा कप घेऊन समोरच्या टेबलवरचा कम्प्युटर चालू केला. कॉम्प्युटर चालू करून तो खुर्चीवर बसून चहाचा घोट घेऊ लागला. कॉम्प्युटर चालू झाल्यावर त्याच्या कामाला सुरुवात झाली.

मध्येच ब्रेक घेऊन त्याने दुपारचे जेवण गरम केले आणि लगेच जेवण आवरून घेतले. जेवण झाल्यावर भांडी वगैरे आवरून तो रात्री बारा वाजता पुन्हा त्याच्या खुर्चीवर बसला.

खुर्चीवर बसून पुन्हा कॉम्प्युटर चालू करताच त्याच्या कॉम्प्युटरवर मेलचा पॉपअप आला. तो चेक करण्यासाठी त्याने तो ओपन केला. तो मेल कोणत्या तरी अनोळखी नावाने आला होता. आणि त्यात काहीच मजकूर लिहिलेले नव्हते. कोणी तरी चुकून तो पाठवला असेल असे समजून त्यानं तो दुर्लक्ष केला आणि पुन्हा आपल्या कामाला लागला.

पुढच्या पंधरा मिनिटांनी पुन्हा मेलचा पॉपअप वाजला. त्याने तो मेल पुन्हा ओपन केला. ' सागर देसाई ' पुन्हा ह्याच नावाने त्याला मेल आला होता. ज्याचा सब्जेक्ट होता, ' स्वागत आहे.' त्याला वाटले की, तो नवीन असल्यामुळे त्याला कंपनीच्या एच आर ने तो मेल पाठवला असावा. म्हणून त्याने फक्त त्या मेलला धन्यवाद असा रिप्लाय देऊन आपल्याला कामाला लागला.

काम करता करता पुन्हा एकदा मेलचा पॉपअप वाजला. त्याने सवयीप्रमाणे पुन्हा तो उघडून बघितला. " अरे यार, हा एकाच मेलमध्ये सगळं का लिहून पाठवत नाही आहे?" पुन्हा तेच नाव बघून तो वैतागून स्वतःशी म्हणाला. त्याने पुन्हा तो मेल ओपन केला. ' तू माझ्या खुर्चीवर बसला आहेस.' असा मेल वाचून त्याला थोडे विचित्र वाटले.

त्याला वाटले की, कोणी तरी त्याची मस्करी करत आहे म्हणून त्याने आपल्या वरिष्ठांना फोन करून त्या मेल बद्दल सांगितले. "बहुतेक मेल मध्ये काही तरी ग्लिच आला असावा. तू आयटीला फोन करून बघ ना." त्याच्या वरिष्ठांनी सांगितल्या प्रमाणे त्या संबंधित व्यक्तीला फोन केला. आणि घडलेली घटना सांगून त्यांना तो मेल आयडी कळवला.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all