Login

पर्यावरण दिवस आणि वटपौर्णिमा

World environment day and vatpornima

काय योगायोग आहे नाही...  'पर्यावरण दिवस' आणि 'वटपौर्णिमा' एकाच दिवशी...  एकीकडे 'पर्यावरण वाचवा' म्हणून स्टेटस ठेवायचं...  आणि दुसरीकडं...  वडाची फांदी घरी आणायची... वेळ नाही किंवा जवळपास वडाचं झाड नाही... अशी अनेक कारणं पुढे करुन फ़ांद्या घरी आणून पुजणाऱ्या कमी नाहीत....  आणि आता तर काय...  lockdown...  social distancing....  ही कारणं आहेतच ...  

काय वेडेपणा आहे..  जे झाडं ऑक्सिजन देतं म्हणून त्याची पूजा करायची.... तर...  त्याच्याच फांदया अशा तोडून आणायच्या...  आता त्या फांदीनं कसा वाचायचा हो तो सत्यवान...  

रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये म्हणतात...  फक्त वडाचं झाड सोडून...  कारण झाडं रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात..  वड मात्र २४ तास ऑक्सिजन च देतात.. त्याच्याच फांदया अशा तोडून...  त्याला असं लुळं पांगळं करुन...  त्यालाच वर मागणं मागायचं...  त्याचं आयुष्य कमी करुन नवऱ्याचं आयुष्य मागायचं... आणि नुसतं  याच जन्मी नाही... तर पुढच्या सात जन्माचं..  वा रे वा...  

तुमच्या पूजेला.. श्रद्धेला विरोध नाही.... पण ती ज्या पद्धतीने केली जाते... त्याला विरोध आहे...  

पूर्वीच्या काळी बायकांना इतकी कामं असायची की स्वतःकडे बघायला... नटायला... सजायला...  इतरांना भेटायला वेळ नसे..  बंधनं असायची...  म्हणून या वटपौर्णिमा च्या निमित्तानं त्यांना छान नटता यायचं...  आपल्या सारख्याच सासुरवाशिणींना भेटता यायचं... मन मोकळं करता यायचं.. म्हणून बायका वड पुजायला जायच्या..  शास्त्रीय कारणं आहेतच.. पण ही सामाजिक.. मानसिक कारणंही होतीच.. आता वर्किंग वूमन ना नाही शक्य होत...  घरचं.. ऑफिसचं करुन...  पण हा फांदी आणायचा फंडा काय पटत नाय....  त्यापेक्षा पाटीवर वडाचं चित्र काढा.. छोटीशी वडाची रांगोळी काढा...  आणि करा पूजा..  नाहीतर छोटंसं झाडच आणा...  आणि सोसायटी मधल्या सगळ्या बायकांनी पूजा करा...  आणि सोसायटी च्या आवारातच ते झाड लावा.. दरवर्षी एक नविन झाड...  सोसायटी सुद्धा हिरवीगार होईल काही वर्षात...  आणि ऑक्सिजन पण भरपूर...आता या वर्षी social distancing लक्षात घेता हा उपाय कितपत लागू पडेल नाही सांगता येत...पण हे केलं तर तुमच्या नवऱ्याचंच काय... घरातल्या सगळ्यांचं आयुष्य वाढेल की..  

शाळेत असताना वाचलं होतं... 

देणाऱ्याने देत जावे.... 

घेणाऱ्याने घेत जावे... 

घेता घेता एक दिवस... 

देणाऱ्याचे हात घ्यावेत... 

अर्थात देणाऱ्याची दान करण्याची सवय घ्यावी.. पण आपण याचाही विपर्यास करत...  देणाऱ्याचे हातच काढून घेतले... तोडून टाकले.. अजूनही वेळ गेलेली नाही...  या lockdown मध्ये बऱ्याच गोष्टी शिकलो आपण...  सगळं बंद असल्यानं स्वच्छ झालेल्या नद्या...  किलबिलणारे पक्षी...  निरोगी हवा.. 

यावर्षी कदाचित वड सुद्धा सुटकेचा निश्वास टाकेल...  फांदया कमी तुटल्या म्हणून.. त्याची ही सुटका कायमस्वरूपी करूया...  त्याला भेटायला त्याच्याकडेच जाऊया...  नाहीतर चित्र किंवा रांगोळी वर समाधान मानूया.. किंवा एक नवीन रोप लावूया.. 

पर्यावरण दिवस याहून चांगला नाही साजरा करता येणार... 

पटलं तर इतरांनाही सांगा..