Login

जागतिक मानसिक आरोग्य दिन

एक छोटासा प्रयत्न कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्यावर प्रकाश टाकण्याचा
एखादे दिवशी खूप जास्त धावपळ झाली की आपलं शरीर कसा पार्थून जातं दमत अगदी एखादा ग्लासही इथून तिथे उचलून ठेवायचा त्रास आपल्या शरीरात उरत नाही. असंच काहीसं आपल्या मनासोबतही होतं. शरीरावरील जखमा त्याचा थकवा हा डोळ्यांनी दिसून येतो परंतु मनावरील आघात दिसत नाहीत अन तेच जास्त घातक ठरतं. कारण त्याकडे विशेष असं लक्ष दिल्या जात नाही. आणि मग पुण्याच्या त्या सीए असलेल्या गुणी मुलीने उचललेल्या टोकाच्या पावलात त्याचे रूपांतर होते. तिला कळत होते की तिच्यावर कामाचा खूप तणाव येत आहे तरीही ती रात्र रात्र जागून, सुट्टीच्या दिवशीही काम करून स्वतःला सिद्ध करायच्या प्रयत्नात होती. कधी कधी मला सर्व जगाचा खूप राग येतो. मशीन बनवून ठेवले आहे आपण स्त्रियांना. आधी तरी फक्त चुलमुल होतं तिच्यावर, आता तर चूल मूल वर कमावण्याचं खूळ. पार वाट लावली आहे स्त्रीच्या मानसिक शारीरिक आरोग्याची. असो यावर नंतर कधीतरी लिहील.

नमस्कार मी अर्चना, मला वाटतं आपण या जगातील प्रत्येक गोष्टीकडे, वस्तूकडे व व्यक्तीकडे थोडे दयाळू भावाने  बघायला हवे. ही अगदी शोकांतिकेची बाब आहे की ज्यावर्षीच्या वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिन ची थीम 'इट्स टाइम टू प्रायटराईज मेंटल हेल्थ इन वर्क प्लेस' म्हणजेच 'कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे' ही आहे त्यावर्षी एका तरुण उच्चशिक्षित मुलीचा कामाच्या तणावाखाली जाऊन हार्ट अटॅक येऊन मृत्यू व्हावा. ज्या कंपनीत ती काम करत होती त्या कंपनीच्या लोकांनी तर आपले हात झटकले. कमीत कमी आपण हा तरी विचार करायला हवा की समोरील व्यक्तीला आपण किती तणाव देत आहे, त्याच्यावर किती प्रेशर निर्माण करत आहे? त्याच्याकडून ते झेपत आहे का? त्याच्याशी बोलतांना आपली भाषा कशी आहे? किती टोमणे आपण मारतोय समोरील व्यक्तीला? काही अंदाज असतो का?

आता काही लोक म्हणतील या निष्ठुर जगात इतकं कमकुवत होऊन चालत नाही. मला एक सांगा हे जग कोणापासून बनले आहे? आपण इथे आहोत म्हणूनच हे जगही आहे ना? मग आपण एकमेकांकडे थोड्या सहानुभूतीने नाही बघू शकत का? नाही जमत एखाद्याला स्वतःहून स्वतःला सावरायला, अशावेळी आपणही त्याची खिल्ली उडवत, त्याच्यावर हसायचे की त्याला मदतीचा हात द्यावा? काय वाटतं तुम्हाला कशाला ही 'जागतिक मानसिक आरोग्य दिवस' वगैरेची भानगड करण्यात आली असेल?

काहीतरी तथ्य असेलच ना यात. मग आपण काय इतके निर्मम वागतो आपल्याच सहकाऱ्यांसोबत? विचार नक्की करा.