Login

या बया..ओह गाॅड! ..भाग-१

भाषा समजत नसले काय कसा गोंधळ होतो हे सांगणारी रुक्मिणी व मेरी यांची विनोदी कथा
विनोदी कथा फेरी

शीर्षक:- या बया ओह गाॅड

भाग-१

कोंबड्याच्या बांगने रुक्मिणीला पहाटेच जाग आली. तोंडावर उलटा हात ठेवत आळस देत अंगाला आळोखे पिळोखे देऊन ती उठून बसली. तोंडांवरून दोन्ही हात फिरवले व नंतर ते जोडून खिडकीतून दिसणाऱ्या लालसर सोनेरी दिनकराला नमस्कार केला. नीटस दिवस उजाडला नव्हतं. पक्ष्यांची किलबिल, गायी-गुरांचे हंबरणे आणि मंदिराचा घंटानाद ऐकू येत होता.

रुक्मिणीने केसांचा नीट आबंडा बांधला आणि बाजूला घोरत झोपलेल्या तिच्या नवरा विठ्ठलला बघत वैतागत कपाळाला हात मारत म्हणाली, "बया, कसलं घोरत्याती, अख्ख्या घरात आवाज घुमाया लागलाय. उजाडलं तरी कुंभकरणावानी अजून घोरत पडल्याती आमचं हे ध्यान."

"आवं, उठा की वं." ती त्याला गदागदा हालवतं मोठ्याने म्हणाली.

"काय ऽ काय झालं?" असे म्हणत तो दचकून उठला.

"काय नाय झालं, वं? तांबड फुटलया बघा की, तवा उठा अन् गोमूला चारा घाला, चूलं पेटवून पाणी तापायला ठिवा." ती त्याला म्हणाली.

"येवढ्यापायी उठवतीस व्हयं गं, मला वाटलं आभाळ कोसळलं की काय?" तो पुन्हा डोळे मिटत अंथरुणावर पहुडला.

"मच्, आवं ऐका की? "ती थोडी नरमाईने म्हणाली.

"ए, रूकू झोपू दे बरं मला, उगीच सकाळ पारी भुणभुण लावू नगस. जा तुझं तू आवर. म्या उठतो वाईज येळाने. तो पतूर तू शेणगूणं काढून घेऊन गोठा साफ करून घे." विठ्ठल कूस बदलत डोळे झाकतच म्हणाला.

"झोपा काढा तुम्ही फकस्त? म्या हाय नव्हं का फुकटची मोलकरीण राबाया. देवा! आता तूच बघ. जाऊ दे, माझ्या मेलीच ऐकतं तरी कोण?" ती पदर कमरेला पदर खोचत त्याच्याकडे रागात एक कटाक्ष टाकत म्हणाली.

गोमूला(गाय) एका बाजूला बांधून तिला चारा पाणी दिलं. गोठ्यातील शेण एका टोपलीत गोळा करून तिने घराबाहेरच्या अंगणात टाकलं आणि नेमकं तिकडून एक बाई चालली होती. ते शेण तिच्या अंगावर उडलं तेव्हा ती वैतागत म्हणाली,"ओह, गाॅड." असे म्हणत ती बाई कपड्यांना लागलेलं शेण झटकू लागली.

तिचा आवाज ऐकून घरात जाणारी रुक्मिणी मागे फिरली आणि तिच्याकडे खालून वरपर्यंत पाहिलं.
ती फाॅरेनर वाटत होती. काळे खांद्यापर्यंत रूळणारे  केस, कोरीव भुवया, मध्यम आकाराचे डोळे, एकदम पांढरीशुभ्र कांती, सुडौल बांधा, अंगात टी-शर्ट, नाईट पॅन्ट परिधान केलेली ती एखाद्या बाहुली सारखी दिसत होती.

तिला पाहून तिच्याभोवती एक गोल चक्कर मारत रुक्मिणी हनवुटीवर तर्जनी टेकवत म्हणाली, "या बया, गायीचं श्याण गाॅड असतंय व्हयं. आज पहिल्यांदाच मला ठाव झालं."

"व्यॅक ! व्हाॅट कॅन यू से, इडियट वुमन." ती बाई चिडत तिला म्हणाली.

"अय, व्यॅक काय गं? तू काय बोललीस येडीअट? ते काय असतं? मला काय बी समजना, बया? नवीन हाईस व्हयं गं. कापड बी गड्यावानी घातलस की तू?" रुक्मिणी तिला न्याहाळत तिचा टी-शर्ट बोटांच्या चिमटीत धरून ओढत डोळे बारीक करून म्हणाली.

तिचा शर्ट धरल्याने रुक्मिणीच्या हाताचे शेण पुन्हा तिच्या शर्टाला लागलं, शेणाचा वास त्या बाईला सहन झालं नाही तेव्हा तिने एक हात नाकावर ठेवला व दुसऱ्या हाताने शर्ट झटकत रागाने तिच्याकडे बघत चिडत म्हणाली,"याक, व्हाॅट द हेल, नाॅनसेन्स."

"आता गं बया, काय बोलली ही पुन्हा, बघतिया बी कशी मारक्या म्हशीवानी. " रुक्मिणी तोंड वाकडं करत पुटपुटली.

ती बाई पुन्हा कपाळावर आट्या पाडत तिच्याकडे पाहू लागली.

रुक्मिणी अडाणी होती त्यामुळे त्या बाईचं इंग्रजी बोलणं तिला काही कळेना आणि ती बाई या गावात नवीन होती, त्यात तिला मराठी कळतं नसल्यामुळे तिला तिचं बोलणं कळेना.

ती बाई तशीच तिच्याकडे रागात बघत कपडे झटकत इकडेतिकडे पाहत एका व्यक्तीला "डिक्रूजऽऽ डिक्रूज" असे हाका मारू लागली.

"आता गं बया, ही येडी बेडी झाली की काय? सकाळपारी वंगाळ अशा डुकार, डुकार म्हणून हाका मारतेय." असे म्हणत टोपली पोटाजवळ घेत रुक्मिणी हसू लागली.

तिचं हसणं बघून त्या बाईला आणखी राग आला. "यू फूलं." असे म्हणत ती बाई चावताळून तिच्या अंगावर धावून येत होती. तशी रुक्मिणीने तिला हाताचा पंजा दाखवत थांबवलं व पटकन जाऊन तिने तिच्या अंगणातील अबोलीचं फुले तोडून हातात घेतली आणि त्या बाईसमोर पकडत म्हणाली, "घे बाई, फुल, जरा पिरमाने मागितल तरी दिली असती की म्या."

ती बाई अजून चिडत रागात पाय आपटत "डिक्रूजऽऽ" असे मोठ्याने हाक मारली.

"शिवऽऽ शिवऽऽ , अगं ए सकाळ सकाळ कशापायी डुकाराचं नाव घ्यायला लागलीस." रुक्मिणी तोंड वाकडं करत दोन्ही गालावर हात मारत म्हणाली.

"येस मॅम, व्हाॅट हॅपन्स." एक पस्तीसतला व्यक्ती लगबगीने धावत येत त्या बाईसमोर हात पुढे बांधून खाली मान घालून तिला आबदीने म्हणाला.

"हे बघ या मूर्ख बाईने माझे सगळे कपडे खराब करून टाकले." ती बाई इंग्रजीतून त्या व्यक्तीला हातवारे करून चिडत म्हणाली.

त्या व्यक्तीने रूक्मिणीकडे एक कटाक्ष टाकला. नंतर त्या बाईला म्हणाला, "गावात सकाळी शेणाने अंगण सारवण्यासाठी ते बाहेर टाकलं जातं, तिने पण टाकलं असेलं. तुम्हाला बघितले नसेल त्यामुळे चुकून पडलं असेल. तुम्ही घरी जाऊन कपडे बदलून घ्या. मी बोलतो तिच्याशी." अजूनही तो मान खाली घालूनच उभा होता.

"त्या इडियटला सांग मला साॅरी म्हणायला. मग मी जाईन." ती रागात रुक्मिणीकडे बघत त्याला म्हणाली.

क्रमशः-

कोण होती ती बाई ? ती काय म्हणतेय हे तिला कळेल का?