सौ.प्राजक्ता पाटील
राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
विषय: कौटुंबिक
उपविषय: या फुलाला सुगंध मातीचा.
टीम सोलापूर..
या फुलाला सुगंध मातीचा भाग-9
ठरल्याप्रमाणे आज सौरभ दीप्तीच्या होणाऱ्या सासरी जाणार होता. तिथे तो सर्वांची हात जोडून माफी मागणार होता. जे काही घडलं त्यात दीप्तीची काही चूक नसून तो स्वतः जबाबदार आहे. हे पाहुण्यांना अगदी प्रामाणिकपणे सांगणार होता. आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर तो लगेच जायला निघाला. तेवढ्यात सरपंच तिथे आले.
"कुठे निघालास सौरभ ?"सरपंचांनी आज कितीतरी दिवसांनी सौरभला हक्काने काहीतरी विचारलं होतं. सौरभच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आपले हरवलेले बाबा आपल्याला परत मिळाले असेच त्याला वाटले. त्यानेही बाबांना दीप्तीच्या सासरी का चाललोय? याचे खरे कारणही सांगितले.
"ठीक आहे तुला जर वाटतय की तू माफी मागितल्यावर सर्व काही ठीक होईल तर जा तू." म्हणून सरपंच निघून गेले.
'खरंच चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर चांगलं होतं हे म्हटलं जातं ते अगदी खरं आहे. अशी किती दिवस झाले दीप्ती माझ्या संपर्कात आली पण दीप्तीमुळेच आज माझे बाबा माझ्याशी हक्काने, प्रेमाने बोलले हे ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मलाही स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवता आले. त्याचे सगळे श्रेय दीप्तीला जाते. दीप्ती यापुढे तुला त्रास होईल असं मी कधीही वागणार नाही.' हा मनात विचार करून सौरभ त्याच्या एका मित्राला घेऊन गाडीत बसला.
तिथे गेल्यावर पाहुण्यांशी काय काय बोलायचं ? हे सौरभच्या डोक्यात विचार चक्र सुरू होतं. 'आपल्या तोंडून काहीही उलट सुलट घालवायचं नाही. ते जे म्हणतील तेच योग्य म्हणायचं कारण त्यातच दीप्तीचं भलं आहे. जिने मला माणसात आणण्यासाठी प्रयत्न केला तिला जर एवढा शिकलेला, चांगला मुलगा मिळणार असेल तर मी तिच्यासाठी एवढे तर करू शकतो.'
गाडी पाहुण्यांच्या दारासमोर येऊन थांबली. सौरभ गाडीतून खाली उतरला.
"तू इथे कशाला आलास?" दीप्तीचा होणारा नवरा सौरभच्या अंगावर खेकसून म्हणाला.
आजवर कोणीही सौरभशी एवढ्या उद्धटपणे बोलले नव्हते पण दीप्तीसाठी सौरभने ते ही सहन केले.
"मी तुमची माफी मागायला आलोय. जे काही घडलं त्यात दीप्तीची काही चूक नाही. तुम्ही तिच्याशी लग्न करू शकता. ती खूप चांगली मुलगी आहे. तुमची बायको म्हणून आणि सून म्हणूनही कोणत्याही गोष्टी नावे ठेवायला जागा ठेवणार नाही. खूप संस्कारी मुलगी आहे दीप्ती."
"अरे तू काय तिच्यावर प्रेम वगैरे करतोस की काय? मगाचपासून तिचं कौतुक करताना श्वासही घेतला नाहीस. इतकी आवडते तुला तर तूच कर ना तिच्याशी लग्न?" दीप्तीचा होणारा नवरा सौरभचा अपमान करत म्हणाला.
'कसं सांगू तुम्हाला ? मी तिच्या योग्यतेचा नाही. तुम्ही चांगले शिकले सवरलेले आहात म्हणूनच तुमच्याकडे आलो आहे.' सौरभ मनात विचार करत होता.
"अय आवाज बंद .." करायचा असच बहुतेक सौरभच्या मित्राला म्हणायचं होतं, पण सौरभने त्याला मध्येच अडवलं.
"तुम्ही समजताय तसं आमच्या दोघांमध्ये काहीही नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. माझ्या चुकांसाठी मी हात जोडून माफी मागतो." सौरभ पुन्हा म्हणाला.
"हो का? बरं.बरं. बस तिथं बाहेर आलोच मी." असे म्हणून दीप्तीचा होणारा नवरा आतमध्ये निघून गेला.
सौरभ घराबाहेर असणाऱ्या बाकावर बसला.
तेव्हा त्याचा मित्र विजय सौरभला म्हणाला," सौरभ, अरे एवढ्या मोठ्या पिळदार शरीराचा तू. दोन ठेवून दिले तर त्या पोराला दवाखान्यात ऍडमिट करावे लागेल. तू काय त्याने केलेला अपमान सहन करतोय रे ? कशासाठी करतोय हे सगळं, त्या दीप्तीसाठी? ते काही नाही तू तिच्या लग्नाचा विषय दे सोडून. तुझी इज्जत धुळीला मिळवतोय तो माणूस आणि तू काय करतोय तर त्याचं गप्प ऐकून घेतोय."
"विज्या, तू शांत हो रे. इज्जत होती का आपल्याला ? चोवीस तास नशेत असणाऱ्या माणसाला असते का रे इज्जत ? दीप्तीमुळे पंधरा दिवस का असेना मी या सगळ्यांपासून लांब राहू शकलो. तिने खरी इज्जत मिळवून दिली आपल्याला. आता तिच्यासाठी मला एवढं करणं भाग आहे." सौरभ विजयला म्हणाला.
आतून कसलातरी विचार करून आल्यावर दीप्तीचा होणारा नवरा त्याच्या घरी काम करणाऱ्या गड्याला काहीतरी सांगत होता. सौरभ मात्र मनाने खूप चांगला होता त्यामुळे त्याच्या मनात असला कोणताही विचार आलाच नाही. सौरभ ज्या बाकावर बसला होता त्याच बाकाच्या समोर खुर्चीवर येऊन दीप्तीचा होणारा नवरा बसला आणि सौरभला म्हणाला, "काय सोय करायची तुमची ? आमच्याकडे सगळं मिळतं. आम्हाला कळलेय तुम्हालाही सगळं लागतं. बाटली, ग्लास वगैरे वगैरे. खरे आहे का ते ?" "हो. हे सगळं खरंय. पण आता मी कशालाही स्पर्श करत नाही." सौरभ म्हणाला.
"मग आता मला बी बघायचंय? तुम्हाला जर वाटत असेल मी त्या दीप्तीशी लग्न करावं तर तुम्हाला माझ्याबरोबर हे सगळं करावं लागेल." म्हणून दीप्तीच्या होणाऱ्या नवऱ्याने शिट्टी वाजवली. तेवढ्यात तिथे ग्लास आणि बॉटल घेऊन एक व्यक्ती आली. त्याने ग्लासमध्ये दारू भरली.
सौरभ उठून उभा राहिला. त्याला तिथे एक क्षणही थांबायचे नव्हते. पण त्या व्यक्तीने सौरभला दीप्तीची शपथ घातली आणि सौरभने ग्लास उचलला. आज पहिल्यांदा ग्लासला हात लावताना सौरभचा हात थरथरत होता. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. सौरभने ग्लास संपवला आणि तो म्हणाला, "आता तरी कराल ना दीप्तीशी लग्न ?"
"अजून एक ग्लास घ्यावा लागेल." तो व्यक्ती सौरभकडून त्या दिवशी झालेल्या अपमानाचा बदला घेत होता.
ग्लास खाली ठेवत सौरभ म्हणाला, " याल ना उद्या साखरपुड्यासाठी."
"हो जा तुम्ही." दीप्तीचा होणारा नवरा म्हणाला.
सगळं दीप्तीच्या आबांना शब्द दिल्याप्रमाणे घडलं होतं. पण सौरभ मात्र मनातून खूप उदास होता. आज त्याच्या प्रिय मैत्रिणीला दिलेला शब्द त्याने मोडला होता. कसे तोंड दाखवू दीप्तीला ? याचाच त्याला प्रश्न पडला होता.
संपूर्ण प्रवासात त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. गाडी आबांच्या घरापुढे येऊन थांबली.
विजयला सौरभ म्हणाला, "आबांना सांग उद्या दीप्तीचा साखरपुडा त्याच मुलाशी होणार आहे म्हणून. आम्ही जाऊन भेटून आलो म्हणावं त्यांना."
विजय खाली उतरला आणि आबांना सौरभचा निरोप दिला. तेवढ्यात दीप्ती बाहेर आली. सौरभ गाडी चालू पाहत होता पण दीप्ती गाडीसमोरच जाऊन उभी राहिली. "तुला आत यायचं नाही का सौरभ?" दीप्ती म्हणाली.
सौरभ दीप्तीकडे नजर वर करून पाहू शकत नव्हता. त्याची झुकलेली मान दीप्तीला काहीतरी वेगळा संकेत देत होती. ती सौरभच्याजवळ गेली. तिला तोच उग्र वास पुन्हा जाणवला.
"तू दारू पिला सौरभ?" या दीप्तीच्या वाक्यावर कधीही खोटं न बोलणाऱ्या सौरभने होकारार्थी मान हलवली. दीप्तीच्या डोळ्यात चटकन पाणी आलं.
सौरभच्या अशा वागण्याने दीप्ती त्याच्यापासून दुरावणार तर नाही ना?
कसा असेल दीप्तीचा साखरपुडा?
पाहूया पुढील भागात क्रमशः
सौ. प्राजक्ता पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा