Login

या फुलाला सुगंध मातीचा. भाग-3

'दुसऱ्याच्या दुःखाने हळवं होणारं मन आज आपल्याच वडिलांना दुःखी कसं काय बघू शकतं?'
या फुलाला सुगंध मातीचा. भाग-3


राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

विषय- कौटुंबिक 

उपविषय- या फुलाला सुगंध मातीचा.. भाग-3

टीम सोलापूर 

भाग-3


"अगं दीप्ती, झालं का नाही तुमचं ? परत निवांत बोलत बसा की. सरपंच वाट बघत असतील." भरभर पुढे जाऊन गाडीजवळ उभे राहिलेले आबा दीप्तीला आणि तिच्या आईला उद्देशून म्हणाले. 



"आलो, आलो आबा." म्हणत दीप्ती आणि आई गाडीत येऊन बसल्या.


दीप्तीचे मन मात्र व्याकुळ झाले होते. कधी एकदा सौरभशी बोलेन असं तिला झालं होतं. मळ्याकडे जाताना त्या रस्त्यावरील चार-पाच वर्षाच्या सौरभ सोबतच्या लहान मोठ्या आठवणी आणि सौरभची मदत दीप्तीला जास्तच हळवं करत होती. जणू काही मळ्याकडचा रस्ता म्हणजे सौरभच्या आणि तिच्या बालपणीच्या आठवणींचा बांधलेला पुलच आहे असे तिला वाटत होते. पहिल्या दिवशी मळ्यावर राहायला गेल्यावर आबांनी दीप्तीला सायकलवरून शाळेत पाठवलं होतं. तेव्हा मध्येच पंक्चर झालेली तिची सायकल, पडणारा पाऊस अक्षरशः दीप्तीसाठी ते एक खूप मोठे संकट होते. तेव्हा सौरभने ड्रायव्हर काकांना गाडी थांबवायला सांगून सायकल तिथेच झाडाच्या मागे ठेवायला लावली होती.किती आपुलकीने दीप्तीला गाडीत बसवले होते. संध्याकाळी घरी आल्यावर ताईसाहेबांकडून आणि सरपंचांकडून दररोज दीप्तीला आपल्याच गाडीतून शाळेत घेऊन जाण्याची परवानगी मागितली होती. 


'दुसऱ्याच्या दुःखाने हळवं होणारं मन आज आपल्याच वडिलांना दुःखी कसं काय बघू शकतं?' दीप्ती मनात विचार करत होती. ती कितीतरी वर्षांनी आज पहिल्यांदाच गावी आली होती. तिला सर्वांशी भरभरून बोलायचं होतं, आपल्या यशाचा आनंद लुटायचा होता पण इथे आल्यावर तिला जाणवलं की, आपल्या आनंद आणि दुःखाशी अगदी लहानपणापासून जोडली गेलेली व्यक्ती अशी बदलली आहे आणि तिला आनंदी करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे.  म्हणून गाडीत बसल्यापासून तिचं विचारचक्र फक्त सौरभभोवती फिरत होतं. आता दीप्तीसाठी त्या वस्तू शुल्लक असल्या तरी कित्येक वेळा सौरभने मदत केलेल्या त्या वस्तूंमुळेच दीप्ती वेळेवर अभ्यास करू शकली होती. गाडीचा हॉर्न वाजला आणि दीप्तीची नजर समोर गेली. तिने पाहिलं मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यात एक गाडी आडवी लावलेली होती. घर अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर होतं. हॉर्न देऊनही गाडी हलत नाही म्हटल्यावर आबांच्या लक्षात आलं. 


आबा म्हणाले, "चल दीप्ती, आता आपल्याला सरपंचांच्या घरी चालतच जावे लागेल. तो काही गाडी बाजूला घ्यायचा नाही."


"काय झाले आबा कोण आहे तो? का नाही घेणार तो गाडी बाजूला ?" दीप्ती म्हणाली.


"सौरभ आहे त्या गाडीत. स्वर्गातून देव जरी सांगायला आले तरी तो आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल." आबा हताश होऊन म्हणाले.


दीप्तीला ज्याची भिती होती तेच आबा बोलत होते. 'इतका क्रूर आहे का सौरभ? नाही तो तसा नाहीच.' दीप्ती मनात विचार करून गाडीतून खाली उतरली. ती सौरभच्या दिशेने जातेय हे बघून आबा म्हणाले, "नको जाऊ तू , तो नाही ऐकणार."


 "मी आलेच आबा." म्हणून दीप्ती गेली.



"नको पोरी ऐक माझं." आबा दीप्तीला विनंती करत होते. दीप्ती थेट सौरभच्या गाडीजवळ पोहोचली. सौरभ गाडीच्या खिडकीतून पाय बाहेर काढून दारू पिऊन सुस्त अवस्थेत पडला होता. दीप्तीला तो उग्र वास असह्य करत होता. तरीही कशाचीही पर्वा न करता दीप्ती म्हणाली, "सौरभ, सौरभ."


सौरभला आवाज ओळखीचा वाटत होता पण तो आता माणसांपासून खूप दूर गेला होता. त्यामुळे त्याला कोणालाही बोलण्याची इच्छा नव्हती. 


पुन्हा एकदा दीप्ती म्हणाली, "सौरभ मी दीप्ती, ओळखलंस का? आज खूप वर्षांनी मी गावात आलेय. तुझ्या बाबांनी मला जेवायला बोलावलं आहे. म्हणूनच मी बंगल्यावर जाणार आहे. गाडी बाजूला घेशील ? प्लीज ! तुला नसेल घ्यायची गाडी बाजूला, तर असू दे. जाईन मी चालत. आहे मला चालत जायची सवय." दीप्ती नाराज होऊन परत फिरली.


"आई ,आबा चालत जाऊया आपण." असं म्हणून तिने गाडीतली पर्स घेण्यासाठी दरवाजा उघडला. 


काय आश्चर्य! सौरभ गाडी सुरू करून वेगाने दूर निघून गेला होता. आबानाही फार आश्चर्य वाटले. दीप्तीला अजूनच वाईट वाटले. 'का वागतोय सौरभ असा ?' तिने मनात विचार केला. असो. म्हणून दीप्ती गाडीत बसली. गाडी बंगल्यासमोर आली. सरपंच वाट पाहात बसले होते. त्यांनी दीप्तीच्या स्वागताची तयारी केली होती. सरपंचीनबाई कपाळावर आठ्या पाडून दीप्तीकडे पाहत होत्या. सरपंचांनी दीप्तीची ओळख करून दिली. 


"जिद्द,चिकाटी आणि मेहनत काय असते ? ते या पोरीकडून शिकावं. या या समोरच्या पत्र्याच्या खोल्यात राहून पोरीनं गावाचं नाव केलं. सरपंचीनबाईच्या पोराला आणि पोरीला उद्देशून सरपंच म्हणाले, बघ ही ताई, हा सोपान आणि ही त्याची बायको दिवस रात्र आपल्या इथं कष्ट करायचे पण पोरीला कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही. आणि आज तीच पोरगी शिक्षणाधिकारी म्हणून जिल्ह्याचा कारभार पाहतेय. शिका जरा तिच्याकडून काहीतरी." सरपंचीनबाई ताट ठेवून आत गेल्या. त्यांनी ते ताट दीप्तीच्या औक्षणासाठी आणलं होतं. पण ती एका आपल्याच शेतात काम करणाऱ्या गड्याची मुलगी आहे हे ऐकल्यावर त्यांनी ताटच खाली ठेवलं. सरपंच त्यांच्या मागे मागे गेले. 


"काय झालं? करा की त्या पोरीचं औक्षण." सरपंच म्हणाले. 


"मी नाही करणार तिचं औक्षण. एका आपल्याच शेतात काम करणाऱ्या गड्याची मुलगी आहे ती. आणि हे तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी ताटही तयार केलं नसतं." नवीन सरपंचीनबाई म्हणाल्या.


दीप्तीच्या कानावर दोघांचेही बोलणे पडले. दीप्ती स्वतःहून हॉलमध्ये आली आणि सरपंचांना म्हणाली, "हे असले औक्षण करून घेणे वगैरे मलाही कधीच नाही आवडणार. तुम्ही मला इथे बोलावले हेच माझ्यासाठी खूप आहे.आधीच खूप उपकार आहेत माझ्यावर या घराचे आणि घरातल्या माणसांचे" दीप्ती ताईसाहेबांना मनापासून आठवत होती.


डायनिंग टेबलवर जेवणाची सोय करण्यात आली होती. सरपंचांनी घरच्या नोकऱ्यांना जेवायला वाढायला सांगितले. दीप्तीच्या आई आबांनाही सरपंचांनी मानाने डायनिंग टेबलवर जेवायला बसायला सांगितले. घरचे नोकर जेवायला वाढत होते. नवीन सरपंचीनबाई जेवायला बसल्या नाहीत, पण सरपंच स्वतः दीप्तीच्या कुटुंबीयांसोबत जेवायला बसले. हेही दीप्तीसाठी खूप महत्त्वाचे होते. दीप्तीला एकंदर परिस्थितीचा अंदाज आला होता. सौरभ असा का वागत असेल ? याची तिला थोडीशी जाणीव झाली. दीप्ती जेवण करत होती पण तिच मन मात्र सौरभचाच विचार करत होतं. जेवण झाल्यावर दीप्ती हॉलमधल्या ताईसाहेबांच्या फोटो जवळ जाऊन हात जोडून उभी राहिली. लहानपणीपासूनच्या आठवणींनी आपसूकच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. दीप्तीकडे पाहून सरपंचांच्याही डोळ्यात पाणी आले होते. या क्षणाला सरपंचांनाही केलेल्या कृतीचा नक्कीच पश्चाताप होत होता हे त्यांच्या डोळ्यातील अश्रुतून दिसत होता.


बाहेर सोफ्यावर बसल्यावर हळूच दीप्ती सरपंचांना म्हणाली," एक विचारू ? राग तर नाही ना येणार तुम्हाला?"


"विचार तू. आता मी कुणावरच रागवत नाही." सरपंच म्हणाले.


"मला सौरभला भेटायचं आहे. कुठे असेल तो आत्ता?" दीप्ती म्हणाली.


सगळ्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.


सरपंच, सौरभ कुठे असेल ते दीप्तीला सांगतील का?

आबा आई दीप्तीला सौरभला भेटू देतील का?

पाहूया पुढील भागात क्रमश:


सौ. प्राजक्ता पाटील 





🎭 Series Post

View all