चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा फेरी
जलदकथा फेरी
कथेचे नाव - या वळणावर ( भाग ५ अंतिम )
"काय अटी आहेत मयुरी?" राहुलने विचारले.
"आपल्यामध्ये संवाद असावा. आपण एकमेकांसाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. आपापल्या पालकांसाठी आपण दोघांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. आपल्या संसारात आपण दोघांनी एकमेकांना समान वागणूक द्यायला हवी. एकमेकांच्या मतांचा आदर असावा आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या नात्यांत एकमेकांवर विश्वास आणि प्रेम हवे." मयुरी म्हणाली.
"कबूल है जहाँपनाह!" राहुल अदबशीर पद्धतीने म्हणाला.
मयुरी आणि राहुलचे लग्न झाले. त्या दोघांनी ठरविल्याप्रमाणे लग्नासाठी खूप खर्च न करता रजिस्टर पद्धतीने लग्न केले. दोघांनीही लग्नासाठी वाचवलेली काही रक्कम सामाजिक कार्यासाठी दान केली आणि बाकीची रक्कम आपापल्या व्यवसायासाठी ठेवली.
मयुरीच्या लग्नाला युगंधर उपस्थित राहिले होते. त्यांनी योगिताची मनापासून माफी मागितली. योगिताने काही न बोलता युगंधरकडे शांतपणे एक कटाक्ष टाकला. राहुल आणि मयुरीचे लक्ष त्या दोघांकडे होते. राहुलने मयुरीशी तिच्या आईवडिलांबाबत बोलायचे ठरवले.
मयुरी आणि राहुल हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला गेले. राहुलच्या प्रेमात मयुरी चिंब चिंब न्हाऊन निघाली होती.
"मयुरी! खूप दिवस झाले मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे." राहुल म्हणाला.
"काय झालं राहुल? काय बोलायचं आहे तुला?" मयुरी म्हणाली.
"मी जे काही बोलणार आहे ते तुला पटतं आहे का बघ. मयुरी, जर बाबा आईची मनापासून माफी मागतो आहे तर मलातरी वाटतं की, आईने बाबाला माफ करावे. मी म्हणत नाही की बाबाची काही चूक नाही; पण आता तो माफी मागतो आहे आणि त्याला भयंकर पश्चात्ताप झाला आहे, तर आईने त्याला माफ करावे असे मला वाटते. बघ, आता ते दोघे या वळणावर आले आहेत की जिथे त्यांना एकमेकांचा आधार हवा आहे. दोघेही एकटे पडले आहेत, त्यामुळे दोघे पुन्हा एकत्र आले तर त्या दोघांना त्यांच्या उतारवयात एकमेकांचा आधार मिळेल. मी बोललेल्या गोष्टींचा व्यवस्थित विचार कर." राहुल म्हणाला.
मयुरीने राहुलच्या म्हणण्यावर खूप विचार केला आणि राहुलला संमती दिली. आईवडिलांना एकत्र आणण्यासाठी राहुलने आणि तिने एक प्लॅन आखला. राहुलने बाबाला फोन करून भेटण्यासाठी ठिकाण आणि वेळ सांगितली तर मयुरीने आईला सांगितले. त्याप्रमाणे युगंधर आणि योगिता हॉटेलमध्ये पोहचल्यावर एकमेकांच्या समोर आले.
"युगंधर तू? तू इथे काय करतो आहेस?" योगिताने विचारले.
"मला तर राहुलने इथे भेटायला यायला सांगितलं." युगंधर म्हणाला.
"आणि मला मयुरीने इथे भेटायला सांगितले." योगिता म्हणाली.
"अच्छा! मग ते दोघे कुठे आहेत?" युगंधरने विचारले.
"मयू, कुठे आहेस तू? आणि इथे तुझ्या बाबालासुद्धा का बोलावले आहेस?" योगिताने मयुरीला थोडे बाजूला जात फोन लावला.
"आई, रागावू नकोस. बाबाला मीच बोलावले आहे. तुम्हां दोघांना जर खरं सांगितलं असतं तर तुम्ही दोघेही कदाचित आला नसता. म्हणून आम्ही दोघांनी हा प्लॅन केला. आम्ही दोघे ट्रॅफिकमधे अडकलो आहोत. पंधरा-वीस मिनिटांत पोहचतो. तोपर्यंत तुम्ही दोघे मोकळेपणाने एकमेकांशी बोला, कॉफी वगैरे ऑर्डर करा." मयुरी म्हणाली.
युगंधरने राहुलला फोन केल्यावर राहुलने मयुरीसारखेच उत्तर दिले.
"योगिता, काय घेणार आहेस चहा की कॉफी?" युगंधर म्हणाला.
"कॉफी चालेल." योगिताने सांगितल्यावर युगंधरने दोन कॉफीची ऑर्डर दिली.
"योगिता, कशी आहेस?" युगंधरने विचारले.
"मी ठीक आहे." योगिता म्हणाली.
"योगिता, मला माफ कर. मी आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे. मला माझी शिक्षा मिळाली आहे. मी पूर्णपणे एकटा पडलो आहे योगिता. प्लीज मला माफ कर. तू माफ केले नाही तर मला आयुष्यभर टोचणी सलत राहील." युगंधर गयावया करत म्हणाला.
"युगंधर! तू आता एकटा पडलास म्हणून तुला पुन्हा माझी गरज वाटते आहे. जेव्हा सतरा वर्षांचा संसार सोडून तू आमच्या दोघींच्या आयुष्यातून गेलास, तेव्हा तू आम्हा दोघींच्या भावनांचा जरा तरी विचार केलास? ज्या काळात आम्हा दोघींना तुझी गरज होती त्याचवेळी तू आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलंस. ह्या समाजात एकट्या स्त्रीने आपले मूल वाढवणे किती कठीण असते ह्याचा जरातरी विचार तुझ्या मनाला शिवला? एका स्त्रीसाठी तिचा नवरा म्हणजे सर्वस्व असतो. मी माझ्या प्रेमात, कर्तव्यांत कुठली तरी उणीव भासू दिली होती का? मयूला माझ्यापेक्षा तुझी जास्त ओढ होती. तिला आईबरोबर बापाचे प्रेम देखील मला द्यायचे होते. तरी मयू खूप समजूतदार आहे म्हणून खूप गोष्टींची तडजोड केली तिने. खूप वेळा तिला काही आनंदाच्या, दुःखाच्या प्रसंगी डोकं ठेवायला बाबाचा खांदा हवा असायचा. बाबाचा खांदा नाही म्हणून माझ्या कुशीत शिरून प्रत्येक वेळी तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.
युगंधर, खूप मन दुखावलंस. माझ्या हृदयावर ज्या जखमा झाल्या आहेत त्या अजूनही ताज्या आहेत. कसं विसरू सगळं? आणि कसं तुला माफ करू?" योगिता पोटतिडकीने म्हणाली.
युगंधर, खूप मन दुखावलंस. माझ्या हृदयावर ज्या जखमा झाल्या आहेत त्या अजूनही ताज्या आहेत. कसं विसरू सगळं? आणि कसं तुला माफ करू?" योगिता पोटतिडकीने म्हणाली.
युगंधर मान खाली घालून योगिताचे म्हणणे ऐकून घेत होता. तितक्यात मयुरी आणि राहुल तिथे पोहचले.
"आईबाबा सॉरी, आम्ही तुम्हा दोघांना न विचारता तुमची भेट घडवून आणली." मयुरी म्हणाली.
"आई, लहान तोंडी मोठा घास घेतो. आई, मला माहिती आहे बाबाने त्याच्या आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे; पण त्या गोष्टीचा त्याला पश्चात्ताप झाला आहे. आई, तू बाबाला मोठ्या मनाने माफ करावे असे मला आणि मयुरीला वाटते आहे. आईबाबा तुम्ही आयुष्याच्या या वळणावर पोहचला आहात की आता तुम्हा दोघांना एकमेकांची जास्त गरज आहे. आईबाबा, तुम्ही दोघे ह्यावर विचार करा एवढेच माझे म्हणणे आहे." राहुल म्हणाला.
"राहुल, तुला आम्हा दोघांसाठी काय वाटते आहे ह्या तुझ्या मताचा मी आदर करते; पण खरं सांगू राहुल? मला आता पुन्हा मोहमायेत गुरफटायचे नाही. माझ्या मनाला जो खोलवर घाव बसला आहे, आम्ही दोघे पुन्हा एकत्र येऊन त्या जखमा भरणार नाहीत. राहुल! मी आधीच ठरवले होते की, मयूच्या लग्नानंतर मी एखाद्या सेवाभावी संस्थेमध्ये जाऊन माझे उर्वरित आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण करणार. मी खरंतर ह्या संदर्भात तुम्हा दोघांशी बोलणार होते. मी सगळी चौकशी करून ठेवली आहे. खूप दिवसांपासून माझ्या मनात हा विचार चालू आहे." योगिता म्हणाली.
"म्हणजे आई तू आम्हाला सोडून कुठल्यातरी संस्थेमध्ये जाणार? असं का करते आहेस आई? आम्ही दोघे आहोत ना कायम तुझ्यासाठी?" मयुरी रडकुंडीला आली होती.
"अग वेडे, मी जाते आहे म्हणजे अगदीच तुम्हाला भेटायला येणार नाही असे नाही. कधी माझी तुम्हाला गरज लागली तर मी तिथे असेनच. मला माझी नातवंडे अंगाखांद्यावर खेळवायची आहेत; पण आता मला खरोखरच जाऊ द्या." योगिता म्हणाली.
"मयू आणि राहुल, तुमच्या आईला नका अडवू. आता कुठे तिने स्वतःसाठी जगायचे ठरवले आहे तर तिच्या निर्णयाला पाठिंबा द्या." युगंधर म्हणाला.
शेवटी मयुरी, राहुलने आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला. योगिताने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात एक वेगळे वळण निवडले होते.
समाप्त
©सौ. नेहा उजाळे
ठाणे
©सौ. नेहा उजाळे
ठाणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा