Login

या वळणावर... ( भाग १ )

एका महत्त्वाकांक्षी स्त्रीची कथा
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा फेरी

कथेचे नाव - या वळणावर (भाग १ )

"स्त्री म्हणजे पुरुषांच्या हातातील खेळणं नाही. थोडा वेळ खेळून आनंद लुटायचा. मग त्या खेळण्याचा कंटाळा आला की त्याच्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही! स्त्री देखील एक माणूसच आहे ना? तिलाही तिच्या भावना, महत्त्वाकांक्षा आहेतच ना? तुम्हां पुरुषांना स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू वाटते?....."

मयुरी देसाई कॉलेजमधील वादविवाद स्पर्धेमध्ये 'स्त्री आणि पुरुष समानता' ह्या विषयावर जोरदारपणे तिचे मुद्दे मांडत होती. तिचा प्रतिस्पर्धी राहुल सबनीस तिच्या तडफदार व्यक्तिमत्वाने प्रभावित झाला होता. त्याची मयुरीवरून नजरच हटत नव्हती, त्यामुळे त्याला त्याची बाजू काय मांडायची आहे ते देखील आठवत नव्हते. सरतेशेवटी त्याने स्पर्धेत हार पत्करली; पण त्याचबरोबर त्याने त्याचे हृदय देखील हरले होते.

इथे मयुरी जिंकल्याचा आनंद तिच्या मैत्रिणी जल्लोषात व्यक्त करत होत्या. तर तिथे राहुलला तो हरल्याबद्दल त्याचे सगळे मित्र चिडवत होते.

"काय यार! तुझी एका मुलीसमोर बोलती बंद झाली. उद्या संसारात पडलास तर तुझ्या घरात बायकोचं राज्य असेल." ऋत्विक म्हणाला.

"हा ना! मी तर ५०० रुपयांची बेट लावली होती तू जिंकणार म्हणून. माझे ५०० रुपये पण वाया गेले आणि तुझ्याकडून पार्टी पण गेली. राहुल एक सांग, तू असे कसे विसरलास तुझे मुद्दे?" विराज म्हणाला.

"अरे यार! ती मयुरी कशी जबरदस्त बोलत होती. तिच्याकडे पाहत बसलो आणि सगळं काही विसरून गेलो." राहुल उसासा सोडत म्हणाला.

"ए बाबा! तिच्या प्रेमात वगैरे पडला असशील तर विसरून जा. ती कुठल्याही मुलाला भीक घालत नाही. तिच्याकडून मुलांना अपमानास्पद वागणूक मिळते. तिच्या मते प्रेम, लग्न, संसार हे सगळं खोटं आहे. मी गेली दोन वर्षे ओळखतो आहे तिला. तूच ह्यावर्षी नवीन आला आहेस कॉलेजमध्ये म्हणून तुला माहीत नाही तिच्याबद्दल. अजिबात तिच्या वाट्याला जाऊ नकोस. आग आहे ती, पोळला जाशील." पार्थ म्हणाला.

"ती आग आहे तर असुदेत. मी पण खतरोंका खिलाडी आहे. नाही माझ्या प्रेमात ती पडली तर मी नाव बदलून टाकीन माझं." राहुल म्हणाला.

"ए बाबा! तुझं नाव तुला छान दिसतं. उगीच बदलायच्या भानगडीत पडू नकोस. तुला ऐकायचं नसेल तर घे तुझ्या पायांवर धोंडा मारून. आमचं काय जातंय?" पार्थ म्हणाला.

मित्रांना डावलून राहुल मयुरीजवळ गेला. मयुरी तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात बसली होती. राहुल तिच्या मैत्रिणींना बाजूला करत मयुरीजवळ पोहचला.

"ए हाय मयुरी! मी राहुल सबनीस.
काँग्रॅट्स! कसले भारी मुद्दे मांडत होतीस! त्यामुळे मी तुझ्या मुद्द्यांना खोडू शकलो नाही." राहुल म्हणाला.

मयुरीने राहुलकडे पाहिले असता ती काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. राहुल होताच तसा गोऱ्या रंगाचा, घाऱ्या डोळ्यांचा, उंचपुरा, देखणा, रुबाबदार, भारदस्त. राहुलकडे ती एकटक पाहते आहे ही जाणीव मयुरीला झाली तशी झटकन त्याच्यावरची नजर तिने फिरवली.

"थँक्स." इतकंच मयुरी बोलू शकली. खरंतर तिच्याजवळ कुठली मुले बोलायला आली तर त्यांचा तिला अपमान करायला आवडायचा. आज राहुलला पाहून ती स्तब्ध झाली होती. तिच्या मैत्रिणींना देखील आश्चर्य वाटले होते. त्यांना तर वाटले होते की, राहुल नामक बकरा आयता चालून आला आहे मयुरीजवळ. आता मयुरी त्याची खैर करणार नाही; पण झाले भलतेच! मयुरी राहुलला काही एक न बोलता कशी राहू शकली?

क्रमशः
© नेहा उजाळे ( संघ कामिनी )

मयुरी मुलांच्या बाबतीत कठोर वागण्याचे कारण काय असेल? राहुल त्याच्या प्रेमाने तिला जिंकून घेईल का? तिला राहुलबद्दल प्रेम वाटेल का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील भागांत पाहू.
0

🎭 Series Post

View all