Login

या वळणावर... ( भाग २ )

एका महत्त्वाकांक्षी स्त्रीची कथा
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा फेरी

कथेचे नाव - या वळणावर ( भाग २ )

मयुरीने राहुलचा अपमान केला नाही याचे नवल मयुरीच्या मैत्रिणींना तर वाटलेच होते; पण त्याचबरोबर राहुलच्या मित्रांना देखील नवल वाटले.

इथे मयुरी स्वतःशीच विचार करत होती की, 'राहुलमध्ये अशी काय जादू आहे की मी त्याला पाहतच राहिले. असं कुठल्याच मुलाच्या बाबतीत कधीच घडलं नव्हतं. आज मी राहुलला पाहून अशी का भरकटले गेले?'

एकीकडे मयुरी विचार करत होती तर दुसरीकडे तिची बॅग भरत होती. तिच्या चुलतबहिणीचे लग्न होते त्यामुळे ती तिच्या काकांकडे पुण्याला जाणार होती. खरंतर मयुरीला लग्न वगैरे ह्या गोष्टींमध्ये अजिबातच इंटरेस्ट नव्हता; पण तिच्या चुलतबहिणीने ऐश्वर्याने तिला लग्नाला येण्यासाठी इतका आग्रह केला की मयुरीला तिचे मन मोडवेना.

"आई ए आई! माझा तो लखनवी व्हाइट कलरचा ड्रेस कुठे आहे? राहूदे नको येऊस, मिळाला." मयुरी आईला हाका मारत होती; पण तिची आई कुठल्यातरी विचारात गुंतल्यामुळे तिचे लक्ष नव्हते.

"आई, अगं मी कधीची हाका मारते आहे तुला. तुझं लक्ष कुठे आहे? आणि हे काय इथे का रडत बसली आहेस? मी लग्नाला नको जाऊ का? तसं तर मलाही इतकं जावंसं वाटत नाही; पण ह्या ऐश्वर्याताईमुळे जावं लागतंय. तुला विचारूनच मी जाण्याचा प्लॅन केला ना? आणि आता मी जाणार म्हणून रडत बसली आहेस?" मयुरी म्हणाली.

"नाही गं, तसं काही नाही. उलट मीच तुला सांगितलं ना की, ऐश्वर्याच्या लग्नाला जा. काही झालं तरी तुझ्या काका-काकूंनी मला त्यावेळी खूप सपोर्ट केला होता. त्यांचे उपकार तर मी कधीच विसरू शकणार नाही. असंच भूतकाळात मन गेलं आणि आपोआप डोळ्यांत पाणी आलं. तू खुशाल जा लग्नाला आणि हो, ऐश्वर्याचं गिफ्ट ठेवलं आहेस ना बॅगमध्ये? नाहीतर गिफ्ट इथे आणि तू पुण्यात." मयुरीची आई म्हणजेच योगिता म्हणाली.

"आई! तुला किती वेळा सांगितलं आहे की, जुन्या गोष्टी आठवू नकोस म्हणून. काय मिळतं तुला सगळं आठवून? फक्त दुःखच ना? नको जीवाला त्रास करून घेऊस.
आई, तिथे मला बाबा पण भेटेल; पण आता बाबाला भेटण्यामध्ये मला पूर्वीइतकी ओढ राहिली नाही. तुला खरं सांगू? माझ्या लहानपणी तुम्ही दोघे वेगळे झालात तेव्हा मला बाबाबद्दल खूप जास्त प्रेम वाटायचे. बाबाला मी माझा सुपरहिरो मानायचे; पण जेव्हा मी मोठी झाले, मला समजायला लागले तेव्हा मला तुझे दुःख समजू लागले. तुम्ही वेगळे झालात तेव्हा मी खूप लहानही नव्हते नि खूप मोठीही नव्हते. तेरा वर्षांची होते. सतरा वर्षांचा संसार झाला होता तुमचा; पण तुम्ही दोघांनी जेव्हा वेगळं व्हायचा निर्णय घेतला तेव्हा मला समजत नव्हतं की मी कोणाकडे जाऊ? खरं सांगू तर मला बाबाकडे जायचं होतं; पण बाबाने माझी कस्टडी तुझ्याकडे सोपवली. कदाचित बाबा माझ्याकडे जास्त लक्ष देऊ शकला नसता असं मला वाटलं; पण खरी गोम वेगळी होती हे खूप नंतर कळलं मला. त्या दिवसापासून पुरुष जातीचा तिटकारा आहे माझ्या मनामध्ये.
काय नाही केलंस तू तुझ्या संसारासाठी? तुझा छंद बाजूला ठेवून नवऱ्याच्या करिअरला प्रोत्साहन दिलंस. त्याची प्रगती होण्यासाठी सगळं जीवन पणाला लावलंस आणि त्याच्या मोबदल्यात तुला काय मिळालं तर एक घटस्फोटाचा शिक्का! सॉरी आई, मी आज पहिल्यांदा हे सगळं काही बोलले तुझ्याकडे. खूप दिवस मनात साठून राहिले होते." मयुरी व्यक्त होत म्हणाली.

"मयू बेटा! सगळेच पुरुष सारखे नसतात. आता तुझे काका-काकू बघ, मामा-मामी बघ. ते करत आहेत ना अजून छान संसार? थोडे वादविवाद होत असतील त्यांच्यामध्ये; पण प्रेम आणि विश्वासाचे नाते आहे ना त्यांच्यात? तू पुरुष जातीचा इतका तिटकारा नको करूस. देव करो आणि तुला सांभाळणारा, तुझी काळजी घेणारा असा छान नवरा तुला मिळो." योगिता म्हणाली.

"आई! नाही करायचं आहे मला लग्न. प्लीज नको माझ्या लग्नाचा विषय काढुस." मयुरी म्हणाली.

"बरं बाई, नाही काढत विषय. जा लवकर झोप आता. उद्या सकाळी निघायचं आहे ना? उबर बुक करून ठेवली आहेस ना? कपडे भरले आहेस ना बॅगमध्ये सगळ्या इव्हेंटसाठी? पैठणीवर घालायला मोत्यांचे दागिने ठेवले आहेस ना नीट?" योगिता म्हणाली.

"हो आई, सगळं घेतलं आहे आठवणीने. डोन्ट वरी. तू पण झोप आता. गुड नाईट." मयुरी म्हणाली.

'देवा! माझ्या वेड्या लेकीच्या आयुष्यात खूप छान मुलगा येऊदे. माझ्या लेकीला जगातली सगळी सुखं मिळुदेत.' झोपण्याआधी योगिता देवाला नमस्कार करत म्हणाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मयुरीने स्वतःचे भरभर आवरले आणि पुण्याला जाण्यासाठी उबरमध्ये बसली.

क्रमशः
©नेहा उजाळे
0

🎭 Series Post

View all