Login

या वळणावर ( भाग ४ )

एका महत्त्वाकांक्षी स्त्रीची कथा
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा फेरी

कथेचे नाव - या वळणावर ( भाग ४ )

"राहुल तू? तू इथे कसा आलास? माझा पाठलाग तर करत नाहीस ना?" त्या मुलाकडे पाहून मयुरी म्हणाली.

"ए बाई! मला तुझा पाठलाग करण्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. मी इथे आलो आहे. म्हणजे माझ्या पप्पांच्या खास मित्राच्या मुलीचे लग्न आहे म्हणून मी माझ्या पप्पा-मम्मीसोबत आलो आहे. बाय द वे, मी देखील असे म्हणू शकतो की, तू माझा पाठलाग करते आहेस." राहुल म्हणाला.

"मी आणि तुझा पाठलाग? फॉर युअर काइण्ड इन्फॉर्मेशन, ज्या मुलीच्या लग्नाला तू आला आहेस ती माझी सख्खी चुलतबहीण आहे. समजलं?" मयुरी म्हणाली.

"मयुरी इथे ये बेटा." मयुरीचा काका यशोधर मयुरीला हाक मारत होता.

"मयुरी हा माझा खास मित्र रितेश सबनीस आणि ह्या त्याच्या मिसेस रुही सबनीस. मुंबईमध्ये ह्यांचा स्वतःचा टेक्सटाईल्सचा बिझनेस आहे आणि हो! रितेश, ही माझी पुतणी मयुरी." यशोधर म्हणाला.

"ओह! ही युगंधरची मुलगी ना? युगंधर नाही आला लग्नाला?" राहुलचे वडील म्हणाले.

"युगंधर येणार आहे असे म्हणाला होता. शेवटी तो सेलिब्रिटी आहे तर त्याला वेळ मिळेल तेव्हा येईल." यशोधर म्हणाला.

"ओके, ओके! बरं मयुरी, मी मघाशी पाहिले तर तू आमच्या राहुलशी बोलत होतीस. तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का?" राहुलचे वडील म्हणाले.

"आमची हल्लीच ओळख झाली आहे पप्पा. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये आहोत. फक्त आमची स्ट्रीम वेगळी आहे." मयुरीकडे पाहत राहुलने त्याच्या वडिलांना उत्तर दिले.

इतक्यात लग्नासाठी जमलेल्या लोकांमध्ये युगंधर आल्यामुळे चुळबुळ सुरू झाली. लगेच सर्वांचे मोबाईल सरसावले जाऊन युगंधरचे पटापट फोटो आणि व्हिडिओ काढले गेले. युगंधरने आल्या आल्या नवरा-नवरीची भेट घेतली. मग दादावहिनीला भेटून तो मयुरीकडे आला.

"मयू! कशी आहेस तू? तुझी आई कशी आहे? तुझी आई लग्नाला नाही आली?" युगंधरने विचारले.

"मी ठीक आहे. आई देखील एकदम मस्त आहे आणि तू येणार होतास लग्नाला म्हणून आई नाही आली." मयुरी खाली मान घालून बाबाला उत्तरे देत होती. तिच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले होते.

"बरं मयू, मी दादा-वहिनीला काही मदत हवी आहे का पाहतो." युगंधर डोळ्यांतले पाणी टिपत म्हणाला.

बाबाला पाहून मयुरीला आनंद होण्याऐवजी चीड आली होती. ती उगाचच स्पृहाला सोबत घेऊन रुखवत पाहू लागली. नेमकी तिथे राहुलची मम्मा देखील रुखवत पाहत होती. मयुरीला तिथे पाहून ती मयुरीशी गप्पा मारू लागली. मयुरीलासुद्धा तिच्या बाबाशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट नसल्याने ती देखील राहुलच्या मम्माशी गप्पा मारू लागली.

जेवायला जातानासुद्धा राहुलच्या मम्माने जबरदस्तीने मयुरीला सोबत घेतले. मयुरीला खरंतर ऐश्वर्या दीदीसोबत जेवायचे होते; पण राहुलची मम्मा काही एक ऐकायला तयार नव्हती. शेवटी काकाला सांगून मयुरी राहुलच्या कुटुंबासोबत जेवायला खालच्या मजल्यावर गेली. जेवताना राहुल आणि मयुरीची सारखी नजरानजर होत होती; परंतु आता मयुरीच्या डोळ्यांत राहुलविषयी चीड दिसत नव्हती. अगदी राहुलला देखील हे जाणवत होते. मयुरीचे जेवण संपत आल्यावर त्याने टेबलवर सर्वांसाठी आईस्क्रीम आणली. राहुलची मम्मा चाणाक्ष नजरेने दोघांना पाहत होती. जेवण झाल्यावर थोड्या वेळाने राहुलचे कुटुंब मुंबईला जाण्यास निघाले.

दुपारीच रिसेप्शन आटोपल्याने आता हॉल जवळपास रिकामा झाला होता. ऐश्वर्याची पाठवणी झाल्यावर मयुरी देखील सर्वांचा निरोप घेऊन घरी जाण्यास निघाली.

"मयू! तू लगेच निघालीस? काकाकडे राहणार नाहीस का?" युगंधरने विचारले.

"चार दिवस झाले आई एकटी आहे." मयुरी म्हणाली.

"तुझा बाबा गेले चार वर्षे एकटा पडला आहे." युगंधर असे बोलल्यावर मयुरीने बाबाकडे चमकून पाहिले तर युगंधरच्या डोळ्यांत पाणी आले होते.

"मी तुला घरी सोडतो मयू." युगंधर म्हणाला.

"नको मी उबर बूक करते आहे." मयुरी म्हणाली.

"अग मी पण मुंबईमध्येच जातो आहे ना, तर आपल्याला एकमेकांची सोबत मिळेल." युगंधर म्हणाला.

"बाबा! तू इतकी वर्षे कधी आमच्या सोबत होतास?" मयुरीने विचारले.

"मयू, प्लीज मला माफ कर. मी तुमच्या दोघींचा गुन्हेगार आहे. तुझ्या आईलासुद्धा सांग मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली आहे. त्याची शिक्षा मी भोगतो आहे. इतकी वर्षं मी धजावलो नाही तुमच्याकडे माझी चूक कबूल करायला; पण आता खूप पश्चात्ताप होतो आहे." युगंधर म्हणाला.

बाबाचे बोलणे ऐकून कोणतीही प्रतिक्रिया न देता आणि जास्त आढेवेढे न घेता मयुरी तिच्या बाबासोबत मुंबईला जाण्यास निघाली. घरी गेल्यावर तिने सारा वृत्तांत तिच्या आईच्या कानावर घातला. योगिता सारं काही ऐकून गप्प बसली.

बघता बघता २-३ वर्षे लोटली. मयुरी आणि राहुल एकाच कॉलेजमध्ये असल्याने कधीतरी एकमेकांच्या दृष्टीस पडत जरी असले तरी त्यांच्यामध्ये मैत्री अशी झाली नव्हती. म्हणजे मयुरीनेच कधी प्रयत्न केला नव्हता. कारण राहुलला पाहिले की तिच्या मनात एक वेगळीच खळबळ उडत होती; परंतु तिचा निश्चय आड येत असे. मयुरीचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. तिला स्वतःची डान्स अकॅडमी सुरू करायची होती, त्यासाठी तिने नृत्यामध्ये एम.ए. करायचे ठरविले. राहुलने ग्रॅज्युएशननंतर बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्यासाठी युरोपला जाण्याचे ठरविले होते. त्याआधी मयुरीशी काही गोष्टी त्याला बोलायच्या होत्या.

"हॅलो मयुरी! तुझ्याशी थोडे बोलायचे होते. प्लीज मला उद्या भेटू शकशील? मी तुला वेळ आणि ठिकाण मेसेज करतो." राहुलने मयुरीला फोन केला.

"ओके येते." मयुरी म्हणाली.

दुसऱ्या दिवशी मयुरी राहुलने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोहचली. राहुल आधीच येऊन तिची वाट पहात होता.

"मयुरी, मी युरोपला पुढील शिक्षणासाठी जात आहे. मी चार वर्षांनी पुन्हा भारतात परतेन. त्याआधी मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. आपण दोघे एकमेकांना गेली तीन वर्षे ओळखतो आहोत. तर मयुरी मला हे विचारायचं आहे की, तू माझ्याशी लग्न करशील?" राहुल म्हणाला.

"राहुल, खरं सांगायचं तर मला लग्नच करायचं नाही. लग्नसंस्थेवर माझा विश्वास राहिला नाही. माझ्या बाबाला अभिनयाची आवड होती त्यामुळे त्याला त्या क्षेत्रात नाव कमवायचे होते. माझी आई भरतनाट्यम नृत्यामधे पारंगत होती, मात्र तिने आपल्या नवऱ्यासाठी आपली महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवली आणि सुरुवातीला बाबा स्ट्रगल करत होता तेव्हा त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली.
माझ्या जन्मानंतर तिने तिचे आयुष्य संसारात गुंतवून घेतले. खूप छान होतं आमच्या तिघांचं विश्व. त्यांच्या लग्नाच्या सतराव्या वाढदिवशी बाबाने आईला कबुली दिली की तो त्याच्या सह-अभिनेत्री विनीमधे गुंतला आहे. आईने कुठलीही आदळआपट न करता शांतपणे घटस्फोट दिला. काय चूक होती आम्हा दोघींची? सांग ना राहुल! त्या क्षणापासून ठरवले की मी लग्नच करणार नाही." मयुरीने आपल्या आईवडिलांची सगळी कथा राहुलला सांगितली.

"मला माहीत आहे सगळं मयुरी; पण सगळीच मुले, सगळेच पुरुष सारखे नसतात. तू सगळ्यांना सारखं समजू नकोस. बघ सारासार विचार करून निर्णय घे. तसंही मी चार वर्षांकरिता युरोपला जातो आहे. त्या काळात तुझं मतपरिवर्तन झालं तर ठीकच आहे. चल येतो मी, बाय. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. कधीही कुठलीही गरज लागली तर हक्काने सांग. आपण एकमेकांच्या संपर्कात राहू."

"ओके! मी विचार करेन. बाय राहुल. ऑल द व्हेरी बेस्ट." मयुरी म्हणाली.

राहुल युरोपला निघून गेला. इथे मयुरीने एम.ए. साठी कॉलेज जॉईन केले. राहुल लांब गेल्यामुळे मयुरीला त्याची उणीव भासत होती. राहुलच्या मम्माशी तिची चांगली ओळख झाल्यामुळे राहुलची मम्मा मयुरीला फोन, मेसेज करून तिची चौकशी करत होती. राहुल देखील तिच्या संपर्कात होता.

चार वर्षांनंतर राहुल मायदेशी आल्यावर दोन दिवसांनी अचानकपणे मयुरीच्या डान्स अकॅडमीमध्ये गेला. राहुलला पाहून मयुरीला आनंद झाला.

"मयुरी, कशी आहेस? कसा चालू आहे तुझा क्लास? तू काही निर्णय घेतलास का?" वरवर चौकशी करून राहुलने मुद्द्याला हात घातला.

"राहुल, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे; पण माझ्या काही अटी आहेत." मयुरी म्हणाली.

क्रमशः
©नेहा उजाळे
0

🎭 Series Post

View all