Login

दिव्याखाली अंधार - भाग - 2

Yashodhara
दिव्याखाली अंधार - भाग - 2


घरात संवाद कमी होत गेला.
यशोधराला वाटायचं,
“आजकालच्या सूना स्वार्थी. आईसारखी माया कुणाला कळत नाही.”

आणि
सुमेधाला वाटायचं,
“आई इतरांसाठी देवदूत… पण माझ्यासाठी मात्र दूरची व्यक्ती.”


दिवसेंदिवस दोघींतलं अंतर वाढत गेलं.


एक दिवस घरात एक प्रसंग घडला.

यशोधराताईने एका गरीब बाईला घरात आणली.
तिला दोन दिवस थांबायला जागा हवी होती.


सुमेधाने नम्रपणे विचारलं,
“आई, आधी सांगितलं असतं तर मी खोली तयार ठेवली असती.”


यशोधराने चिडून म्हटलं,
“इतकी तयारी नको. सेवा करताना एवढे फॉर्मॅलिटी पाहत बसत नाहीत.
तुझ्यासारख्या नोकरीवाल्या मुलींना हे समजायचं नाही..”


हे शब्द ऐकून सुमेधाला वाईट वाटले.


“आई… सेवा करणं चुकीचं नाही. पण घरातल्या लोकांची काळजी घेणंही सेवा आहे ना?”
ती हळू आवाजात म्हणाली.


यशोधरा अधिकच संतापली,
“मला शिकवतेस? माझ्या कर्तुत्वावर प्रश्न?
मी जगाला सांभाळतेय… घराची काळजी मीच घेतेयं इतकी वर्षे!”


वाद वाढतच गेला.

त्या रात्री दोघीही रडत होत्या — पण वेगवेगळ्या खोलीत.
आणि घरातलं प्रेम शांतपणे कोसळत होतं.


दुसऱ्या दिवशी अचानक यशोधराताई तब्येत बिघडून बेशुद्ध पडल्या.
सगळं घर धास्तावलं.

डॉक्टरांनी सांगितलं,
“तणाव, थकवा आणि योग्य आहार-विश्रांती नसल्यामुळे अशी अवस्था झालीये.”


तिच्या शेजारी बसून सुमेधाचे हात थरथरत होते.
तिचे डोळे भरून आले.


“आई, तुम्ही एवढं सारं करत गेलात… पण स्वतःची काळजीच नाही घेतली.”
तिच्या डोळ्यांत अपरंपार माया होती.


यशोधरा ताईंच्या डोळ्यांत पाणी आलं.
पहिल्यांदाच तिला जाणवलं — ही मुलगी तिची शत्रू नाही… तिची आधारवड आहे.


घरी आल्यावर दोघी एकट्या बसल्या.

सुमेधा म्हणाली,
“आई, तुमच्या सेवेला मीही मानते. खूप अभिमान आहे मला तुमचा.

पण… तुम्ही मला तुमचं म्हणालातचं नाही कधी.
इतर सगळ्यांना आईसारखं प्रेम देता… पण मी मात्र नेहमी दूरच राहिले.”


यशोधराताईंचा आवाज थरथरला,

“मी चुकीची होते गं. मला वाटायचं तुम्ही शिकलेल्या मुली अतिशहाण्या असता. तुम्हाला घरची काळजी नसते.


मी जगाला माया दिली… पण माझ्या स्वतःच्या घरात अंधारच राहिला.
दिवा पेटवणारी मीच… पण घरातल्या मनांना उजाळा देणं राहून गेलं.”


त्या क्षणी तिने सुमेधाचा हात हातात धरला.
दोघींच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू… पण या वेळी दुःखाचे नव्हते.


यशोधरा ताईंनी घरातील जबाबदाऱ्या सुमेधासोबत वाटून घ्यायला सुरुवात केली.


सुमेधाही सेवाकार्यात सहभागी होऊ लागली.
हे नवीन दृश्य बघून सगळे म्हणू लागले,
“ताई आणि सुमेधा — दोघींची जोडी देवासारखी! घरही सांभाळतात, बाहेरही देवाची सेवा.”


घरात प्रेम वाढत गेलं.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- सासू - सून हे नातं अजून फुलतं की बिघडतं ते)
0

🎭 Series Post

View all