दिव्याखाली अंधार भाग - 3 ( अंतिम भाग )
यशोधराताईंची तब्येत सुधारल्यानंतर घरातलं वातावरण खूप बदलायला लागलं होतं. यशोधरा आता सुमेधाशी जरा मोकळेपणाने बोलू लागली होती.
चार वर्ष मनात साठवलेली कडवटता हळूहळू मऊ होऊन वितळत होती. पण नातं खोलून उघडं करायला वेळ तरी लागतोचं ना?
सुरुवातीला सर्व काही शांत आणि गोड चाललं,
दोघींची जोडी खरंच सुंदर दिसत होती. घरात प्रत्येकाला जाणवत होतं – “यशोधराताई आता बदलल्या आहेत.”
पण प्रत्येक नातं फुलताना… काही काटेही सोबत येतातच.
एके दिवशी सुमेधाला ऑफिसला महत्त्वाची मीटिंग होती. ती घाईत निघत होती.
“आई, मी आज लवकर येईन. संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी आपण दोघी मिळून करूया.” असं बोलून ती निघाली.
यशोधराताई हसून मान हलवतात. पण सुमेधा बाहेर गेल्यावर त्यांच्या मनात जुना विचार डोकावतो.
“बघूया परत वेळेवर येते का… नोकरीवाल्यांवर किती विश्वास ठेवायचा?”
संध्याकाळ झाली, आणि काम जास्त असल्याने सुमेधाला थोडा उशीर झाला. फोन करून ती सांगते,
“आई, अजून अर्धा तास लागेल.. प्लीज रागावू नका.”
अर्धा तास … यशोधराला मात्र जास्त वाटला.
थोड्या वेळाने यशोधराताई बाजूच्या जुन्या शेजारणीसोबत बोलत बसलेल्या होत्या.
“सूनबाई वेळेवर नाही आल्या कां? सुमेधा नोकरी करतेयं तर घर कसं सांभाळणार? सध्याच्या मुली… हातात फोन, आणि अनेक कारणं, ह्यांना लवकर मुलं नको, मॅरीड लाईफ एन्जॉय करायचं म्हणतात...!” असं शेजारीण टोमणा मारून बोलली.
यशोधरा पुन्हा थोडी ढळली, कारण सुमेधाला लग्नाला चार वर्ष होऊन अजून मुलं झालं नव्हतं.
इतक्यात सुमेधा धावत येते,
“आई, सॉरी… खरंच कामात अडकले होते. "
यशोधरा मात्र शांत बसून राहतात,
उत्तर नाही, हसू नाही. त्या दुखावलेल्या होत्या.
सुमेधाला स्पष्ट जाणवलं – “ आईंना राग आला आहे… त्यांच्या मनातील जुन्या जखमा, जुन्या सवयी अजूनही नाही गेल्या.”
रात्री जेवणानंतर दोघी एकट्या होत्या.
सुमेधाने म्हंटल,
आई, खरंच मी हे काही मुद्दाम केलं नाही, मला ऑफिसमध्ये अचानक एक काम आलं, म्हणून उशीर झाला.
यशोधरा दीर्घ श्वास घेत म्हणाल्या,
“नाही गं…मी रागावली नाही आहे,पण मला भीती वाटते.
मी इतकी वर्षे एकटी सगळं सांभाळलं… आता त्या सवयी बदलणं अवघड जातंय. आणि लोकांचं बोलणं… तेही मनात घर करतंचं ना ”
मी इतकी वर्षे एकटी सगळं सांभाळलं… आता त्या सवयी बदलणं अवघड जातंय. आणि लोकांचं बोलणं… तेही मनात घर करतंचं ना ”
सुमेधाने त्यांचा हात हलकेच पकडला, आणि म्हणाली,
“आई, लोक बदलत नाहीत… पण आपण दोघी बदलू शकतो ना? तुम्ही मला स्वीकारायला सुरुवात केलीय… तेवढंच खूप आहे माझ्यासाठी.”
यशोधराताईंच्या डोळ्यात पाणी जमा झालं.
सुमेधा म्हणाली,
“संपूर्ण जग जरी उलटं झालं ना आई… तरी आपल्या घरचे माझ्या बाजूला असतील तर मी कधीच एकटी नाही.”
त्या क्षणी शांततेत दोघींचं नातं पुन्हा घट्ट झालं.
पुढील काही दिवस अतिशय सुंदर गेले.
लग्नानंतर साडे - चार वर्षांनी सुमेधाने गोड बातमी दिली. बाळ येणार म्हणून घरं अगदी आनंदून गेलं.
एकत्र जेवण बनवणे, सेवाकार्यात सोबत जाणे, छोट्या-छोट्या गोष्टींवर मन मोकळं करणं — हे आता त्यांचं नित्याचं झालं होतं.
शेजारणीही म्हणू लागल्या—
“ताई, तुमचं आणि सुमेधाचं नातं तर आदर्श आहे. सासू-सून नव्हे, तर आई-मुलगीच वाटता तुम्ही!”
आशिष सुमेधाचा नवराही त्यांना बघुन आनंदी असे.
यशोधराताई हसत म्हणत,
“मन उघडून बघायचं असतं… आणि प्रेमाला वेळ द्यायचा असतो. तेव्हा दिवा घरातही उजळतो.”
सुमेधाचे डोळे ओले झाले.
तिला पहिल्यांदा खऱ्या घराची ऊब जाणवत होती.
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा