Login

यात्रा भाग 10

Marathi Story Yatra - Fortuitous Circumstance
यात्रा भाग 10

मागच्या भागात आपण वाचले होते पूजेसाठी सर्वजण महादेवाच्या मंदिरात पोहोचतात आता पुढे


महादेवाचे मंदिर त्यावर केलेल्या विद्युत रोषणाई मध्ये उजळून निघाले होते.वरती असलेला सोन्याचा कलश सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. मंदिरावर ओम आणि त्रिशूळ असलेला केशरी रंगाचा झेंडा दिमाखात फडकत होता.आजूबाजूला खाद्यपदार्थांची,खेळण्याची छोटी छोटी दुकानं लागायला सुरुवात झाली होती. मंदिराच्या समोरच मोठे मोकळे मैदान होते.मंदिराबाहेर आणि आतमध्ये सुबक अशी फुलांची सजावट केली होती.सगळीकडे धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता.मंदिरातील प्रसन्न वातावरणाने सगळेच प्रफुल्लित झाले होते.

" सर्वजण आले का ? पूजेला सुरुवात करायची का?"
पुजारी काकांनी विलासला विचारले.

"व्हय,सुरुवात करा." आबासाहेब म्हणाले

साक्षी आणि अजिंक्य पूजेला बसले होते. अर्धा - एक तासात पूजा छान पार पडली. पूजेनंतर सर्वांनी देवाचे
दर्शन घेतले.
पूजा संपवून सर्वजण मंदिराबाहेर आले होते. गावातील लोकांची दर्शनासाठी हळूहळू गर्दी होऊ लागली.
तेवढ्यात तिथे भरदाव वेगाने एक जीप येऊन थांबली.
जीपमधून विजय आणि अजय दोघे भाऊ उतरले.
आबासाहेब आणि परिवाराला पाहून हात जोडत विजय

" राम राम आबासाहेब. एकदम वेळेवर पोहचलो आम्ही"

" घ्या ,आधी मंदिरात जाऊन दर्शन घ्या विजयराव."
त्याला हात जोडत आबासाहेबांसमोर उभा राहून विलास म्हणाला.

" ते तर घेऊच पण त्याआधी तुमच्यासगळ्यांना सकाळ- सकाळ एकजणाच दर्शन घडवाया आलोय."

"कुणाचं?".....रमेश

"अय महिपत ये बाहेर.आत काय बसलाय.".....विजय
एक आडदांड पहिलवान गाडीतून उतरला.

" कोण हा ?" ........रमेश

" लईच घाई रमेश तुला.सांगतो की.
हा महीपत आमच्याकडून उद्याची कुस्ती लढिवणार आण जिकणार बी."

" विजयराव आव कुस्त्या फक्त मनोरंजनासाठी लावतो आपण त्यात तुमी, का असा शेप्रेट आमचा नी तुमचा करताय."........सुरेश

"अजिबात नाय. आबासाहेब दम असल तर निवडनुका राहू द्या बाजुला उद्याच फैसला होऊन जाऊ दे.
आमचा गडी आम्ही उभा केला, तुमचा करा मग बघू कोण जिंकतय ते."

विजय ने आबासाहेबांना खुले आव्हान दिले होते. तिथे जमलेले लोक हा सगळा प्रकार बघत होते.
विजय चे बोलणे ऐकून अजिंक्य पुढे आला आणि म्हणाला

"विजय, यात्रा ही सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी आहे.भांडण्यासाठी नाही.यातून काहीच निष्पन्न होणार नाही उलट एकमेकांबद्दल राग वाढेल. हे असं काही नको करू."

" घाबरला काय अजिंक्य " इतक्यावेळ गप्प उभा राहिलेला अजय म्हणाला.

" अरे यात घाबरण्यासारख काय आहे. कुस्त्या राहू दे तू येतो का मैदानात बोल."
रमेश चवताळून पुढे येत म्हणाला.
अजिंक्य आणि विलासने त्याला अडवले.

"अरे एवढीच खुमखुमी आहे तर उद्या उतरवा ना तुमचा गडी मैदानात आणि होऊन जाऊ दे." ....अजय

" आबासाहेब तुमच्याकडून माग हटण्याची अपेक्षा नव्हती आम्हाला."
विजय आबासाहेबांना उकसवत म्हणाला.

सगळ्या जमलेल्या लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. आबासाहेब काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

" आमी अजून काय बी बोललो नाय विजयराव. कशापायी एवढा तांडव करताय. जा जाऊन दर्शन घेऊन या आणि तुमच्या महिपतरावसणी पण घेऊन जा. देवाच्या आशीर्वादाची गरज पडल उद्या त्याला मैदानात."
असे म्हणून आबासाहेबांनी रणशिंग फुंकले.

हे एकूण जमलेल्या लोकांत एकच उत्साह संचारला. कोण जिंकणार कोण नाही याच्या लगेचच चर्चा सुरू झाल्या. हा हा म्हणता बातमी गावभरच नाही तर आजूबाजूच्या गावातही पसरली.कोण जिंकणार यावर पैंज लागायला सुरुवात झाली.

"यावेळचा कुस्तीचा फड चांगलच रंगणार. लागा कामाला "
असे म्हणत आबासाहेबांनी विलास ला इशारा केला.


क्रमशः
काय होईल पुढे वाचू पुढच्या भागात.