Login

यात्रा भाग 12

Marathi Kathamalika Marathi Story
यात्रा भाग 12

मागच्या भागात आपण वाचले आबासाहेबांच्याही गटाला एक चांगला कुस्तीपटू मिळाला होता आता पुढे......


दुसऱ्या दिवशी पाच वाजता कुस्त्या सुरू होणार होत्या.

"साक्षी,आवरले का तुझे?"
अजिंक्य रूममध्ये येत म्हणाला.

"नाही अजून, आदि झोपलाय त्याची झोप होऊ दे मग निघू."

"मी पुढे जातो तू राधाला घेऊन ये तुमच्यासाठी गाडी पाठवतो."

"अरे तू पुढे का जातोय? बरोबर जाऊ ना"

"थोड्या वेळातच कुस्त्या सुरू होतील तुम्ही येईपर्यंत संपतील सुद्धा नंतर आपण फिरू."

"अजिंक्य तुझं जाणं गरजेचं आहे का? नाही म्हणजे मला ना हे सगळं बरोबर वाटत नाहीये.असं वाटतंय काहीतरी चुकीचं घडतंय मन अस्वस्थ होतंय. प्लीज आपण जाऊ ना बरोबर"
साक्षी हट्ट करत होती.

"साक्षी तू खूप विचार करतेस काही होत नाही. मी कितीही म्हटलं ना मला हे सगळं पटत नाही तरी जिथे आबा असतील तिथे मी असणारच आणि आबासाहेब किती म्हणाले ना मी यात लक्ष घालू नको तरीसुद्धा त्यांना मनातून मी तिथे असावे असे वाटते हे मला माहित आहे."

थोडसं थांबून अजिंक्य परत बोलू लागला
"मी तिथे असल्याने त्यांना आनंदच होईल. तसेही आजचा एकच दिवस उद्या आपल्याला इथून निघायचे आहे शेवटी जाताना मला त्यांना आनंदात बघायचे आहे."

साक्षीच्या चेहऱ्यावरची नाराजी लपत नव्हती अजिंक्यने तिचा हात हातात घेतला

"तू माझ्यासाठी जे काही केलं ना त्यासाठी थँक्यू. आबा आणि आक्काला खुश ठेवण्यासाठी तू सगळं केलं. आजचा शेवटचा दिवस विश्वास ठेव सगळं ठीक आहे. तू राधाला घेऊन ये आपण आज खूप फिरू करू. ही यात्रा तू कधीही विसरणार नाहीस"
असे म्हणून अजिंक्यने साक्षीला घट्ट मिठी मारली.

त्यानंतर त्याने शांत झोपलेल्या आपल्या चिमुकल्याच्या गोड गुलाबी गालावर हळूच आपले ओठ टेकवले.

"किती क्युट दिसतोय ना हा झोपल्यावर."साक्षी कडे बघून अजिंक्य म्हणाला

"हो अगदी तुझ्यासारखाच"
साक्षीने हसून त्याला दुजोरा दिला.

अजिंक्य..... अजिंक्य ....
विलासने अजिंक्य ला हाक मारली

"आवरून लवकर या मी तुमची वाट बघतोय" असे म्हणून अजिंक्य गेला.
*********

थोड्या वेळात आदित्य उठल्यावर साक्षीने त्याला तयार केले ती स्वतः तयार झाली आणि राधाला घेऊन यात्रेत जाण्यासाठी निघाली.

आबासाहेबांनी कुस्त्या संपल्यावर सगळ्यांना जेवणाचे आमंत्रण दिले होते त्यामुळे बाकीचे कोणी यात्रेला जाणार नव्हते.घरातले बच्चे कंपनी त्यांच्या मित्रांबरोबर आधीच यात्रेची मजा लुटायला गेले होते.

अजिंक्यने साक्षीला आणण्यासाठी गाडी पाठवली होती.

"वहिनीसाहेब झालं काय गाडी येऊन थांबलीया दारात."
राधा रूममध्ये येत म्हणाली.

"हो" झालेच साक्षीने आदित्यला कडेवर घेतले.

"अले वा!आज आमचे राजकुमार काय दिसताय."
असे म्हणून राधा ने आदीला स्वतःकडे घेतले.

"यासनी माझ्याकडेच राहू द्या तुमी चला."

कार यात्रेच्या ठिकाणी पोहोचली.

संध्याकाळचं महादेवाच्या मंदिरावर ची लाइटिंग अजूनच उठून दिसत होती. मोठ्या पाळण्यांमध्ये छोटे-मोठे सगळेच बसून आनंद घेत होते. सगळ्या प्रकारचे दुकानं सजून तयार होते. प्रत्येक दुकान गर्दी न तोडून भरलेलं होतं. यात्रेतील हे दृश्य साक्षी पहिल्यांदाच एवढं जवळून बघत होती.

मंदिराच्या समोरच्या मोठ्या मैदानावर बरेच लोक गोल रिंगण करून उभे होते ते बघून साक्षीने राधाला विचारले

"राधाताई तिथे सगळे असे का उभे आहेत".

" आव तीत तर कुस्त्या चालल्यात ना."

"अच्छा म्हणजे अजिंक्य आणि आबासाहेब तिथे आहेत."

"आव सगळीच हाईत."

यात्रेमध्ये खूप खाद्यपदार्थांची दुकानं थाटली होती. सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांनी तर बायकांची नुसती झुंबड उडाली होती. लहान मुलं खेळण्या घेण्याचा हट्ट करताना दिसत होती.
साक्षी हे सगळं कुतूहलाने बघत होती.

तेवढ्यात समोरून विलास येताना राधाला दिसला

"ईलास दादा" राधा मोठ्याने ओरडली.

"अरे तुम्ही आलात का?"साक्षी कडे बघत विलास म्हणाला.

राधाच्या कडेवर असलेल्या आदित्यचे गाल ओढत म्हणाला "अजून थोड्यावेळ फक्त मगअजिंक्य आणि तुम्ही खूप फिरा."

"ईलास दादा कुस्त्याकोण जिंकतय?"
राधाने उत्सुकतेने विचारलं.

"म्हणजे काय?आपणच"
शर्टाची कॉलर ओढत विलास म्हणाला.

"थोड्या वेळातच निकाल लागल शेवटचा राऊंड आहे त्यासाठीच मिरवणुकीची तयारी करायला जातोय."
एवढं बोलून विलास गेला.

"आले आमच्या राजकुमारास्नी कोणती गाली पाहिजेल. ही मोती घ्यायची का?"
छोट्या बाळाशी लाडाने बोलत राधा त्याला खेळण्या दाखवत होती.

"वहिनीसाहेब, नुसतं बगता काय घ्या की कायतरी.तुमच्या तिकडल्यापरीस भारी नाय पण इतली आटवण मनून घ्या."

"अगं हो घेते पण आधी मला सगळं बघू तर दे."
थोड्या वेळात अचानक रिंगणाच्या ठिकाणी मोठमोठे बोलण्याचे आवाज यायला लागले. अचानक काहीतरी गडबड झाली सगळेच इकडे तिकडे पळायला लागले. कोणालाही काही कळत नव्हते.

"काय झाले राधाताई हे असे का पळत आहेत."

"वहिनीसाहेब माग वा काय तरी बिनसल दिसतय."

"म्हणजे?"साक्षी कन्फ्युज होऊन म्हणाली.

तेवढ्यात समोरून एक व्यक्ती धापा टाकत आला. तो काढतात ड्रायव्हर होता थोड्यावेळपूर्वी तो साक्षीला घेऊन यात्रेत आला होता. जोरात पळाल्यामुळे त्याला खूप दम लागला होता त्याच अवस्थेत तो म्हणाला,

"वहिनीसाहेब माग फिरा. घराकडे निघाव लागल लगेच चला."

"पण का आणि अजिंक्य?"

"वातावरण लईच तापलंय तुमी आदी घरला चला."

"नाही मी येणार नाही अजिंक्य ला घेतल्याशिवाय तर नाहीच नाही."

तेवढ्यात बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज झाला आणि त्या पाठोपाठ एक भारदस्त पुरुषी आवाज आला....

"अजिंक्य राव".......

आबासाहेब बेंबीच्या देठापासून ओरडले होते. हो बाबासाहेबांचा आवाज होता तो.

"हा तर आबासाहेबांचा आवाज होता. बरोबर ना राधाताई."

आता मात्र साक्षीच्या हृदयाचा ठोका चुकला तिने रिंगणाच्या दिशेने धाव घेतली. तिच्या पाठोपाठ

"वहिनीसाहेब थांबा असं म्हणत ड्रायव्हर आणि राधा ही पळाले.

क्रमशः


नक्की काय घडले असेल.... वाचू पुढच्या भागात.