Login

यात्रा - भाग 2

Yatra - Fortuitous Circumstance
यात्रा - भाग 2

मागच्या भागात आपण वाचले एक व्यक्ती साक्षीला महादेवनगरहून भेटायला आला होता.आता पुढे


"वहिनीसाहेब, आत येऊ का?"
अं.....हां....कशाला आलात तुम्ही इथे? काय काम आहे? आणि तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला?

मागून साक्षीची आई आली
"साक्षी आधी त्यांना आत तर येऊ दे."

"या तुम्ही.... बसा.मी पाणी आणते"... साक्षी ची आई पाणी आणायला गेली.

"तुम्ही सांगितलं नाही अजून इथला पत्ता तुम्हाला कसा समजला."
साक्षीने पुन्हा एकदा विचारलं.

" ईलास दादानं दिला."

'विलासने? त्याला कसं माहित'(साक्षी स्वतःशीच)

तोपर्यंत आईनी पाणी आणले.पाणी त्या व्यक्तीला देत त्यांनी विचारले

"तुमचं नाव ?.."......

"मी सदा...... सदाशिव नाव माझं, पण सगळे सदाच म्हणत्यात."

"कशासाठी आलात तुम्ही इथे ?"
साक्षीने रागातच विचारले

"ही चिट्टी घेऊन आलोय."

"चिट्ठी?"

आई आणि साक्षी एकदम बोलल्या, दोघींनी एकमेकींकडे बघतले.

"कोणी दिली ही चिठ्ठी?"

"विलास दादान दिली, अन् तुम्हासनी लवकर घेऊन यायला सांगितल हाय."

"काय!घेऊन यायला कुठे?आणि कशासाठी?
ते काही असू दे मला चिट्ठीही वाचायची नाही आणि कुठे कोणाबरोबर यायचे ही नाही. तुम्ही आधी इथून निघा." साक्षी चिडून उभी राहिली आणि त्यांना दरवाजाकडे हात दाखवून जाण्याचा इशारा केला.

"वहिनीसाहेब रागवू नका. यकदा चिट्टी वाचा."

"तुम्ही निघा आधी इथून....."

"वहिनीसाहेब ऐका माझं;आबासाहेब आजारी हायत. अंथरुणाला खिळलेत तुम्हास्नी एक डाव भेटायचं हाय त्यांना....."

हे ऐकल्यानंतर साक्षी तशीच खाली बसली. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे ,भीतीचे भाव उमटले.

"एक बार चिट्टी वाचा मी उद्याच्याला परत येतो."
असे म्हणून सदा गेला.

आईने दार लावले...... साक्षी कडे बघितले.
साक्षी विचारात होती.

"साक्षी काय विचार करतेस. बघ तरी काय लिहिले आहे चिठ्ठीत."

"मला नाही वाचायचे. मला नाही जायचे.
आजारी आहेत तर मी काय करू;अजिबात घरात घ्यायचं नाही उद्या त्याला."
हे बोलताना साक्षी पूर्णपणे अस्वस्थ झाली होती.

"साक्षी,आधी तू शांत हो.
ऐक माझं; ती चिठ्ठी वाच."

"आई."...... साक्षी रडायला लागली.


आईने साक्षीचे डोळे पुसले ,तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

"असं करून कसं चालेल.
काहीही झाले तरी अजिंक्य चे वडील आहेत ते. तो आज या जगात नाही पण तुला तर तुझे कर्तव्य केले पाहिजे ना.
तुझे बाबा गेले त्यावेळेस अजिंक्य घरच्यांचा विरोध पत्करून आपल्या दोघींसाठी आपल्या सोबत राहिला. तुला-मला आधार दिला.
आज तुझी वेळ आहे त्याच्या घरच्यांना आधार देण्याची."

साक्षी काहीच बोलली नाही ती फक्त स्तब्ध बसली होती.
"साक्षी...?.... आईने साक्षीच्या खांद्यावर हात ठेवले

"हां....,
आई तु म्हणतेस ते बरोबर आहे पण जे घडले त्यालाही तेच जबाबदार आहेत. त्या गावात परत जायची मला भिती वाटते."

"साक्षी आधी ती चिठ्ठी वाच. मग बघू काय करायचे ते."

साक्षीने चिठ्ठी उघडली आणि मोठ्याने वाचायला सुरूवात केली....

वहिनींना विलासचा नमस्कार,

"आबासाहेबांच्या सांगण्यावरून चिठ्ठी लिहीत आहे.
आबासाहेबांची तब्बेत बरी नाही.
एक आठवडा झाला, चालन फिरणं बंद झालं आहे.
त्यांच्या नातवाला एकदा भेटायची इच्छा आहे त्यांची.
चिठ्ठी मिळाली की लवकरात लवकर येण्याची तयारी करावी. आबासाहेबांकडे आता जास्त वेळ नाही.
अक्का साहेबांनी देखील तुम्हाला येण्याची विनंती केली आहे.
तुमची येण्याची सगळी व्यवस्था मी केलेली आहे. चिठ्ठी घेऊन आलेला माणूस तुम्ही सांगाल त्यावेळेस तुम्हाला घ्यायला हजर होईल.
लवकरात लवकर यावे."
विलास.

साक्षीने चिट्ठी बाजूला ठेवली. डोळे झाकून तशीच खुर्चीवर मागे डोके टेकवले.
"आई, गावाचे नाव जरी काढले तरी त्या सगळ्या घटना झरझर एकामागे एक डोळ्यासमोर उभ्या राहतात.
का गेलो आम्ही तिकडे,नसतो गेलो तर आज अजिंक्य माझ्याबरोबर असता. हा एकमेव विचार डोक्यात येतो." साक्षी कळकळीने आईला सांगत होती.

"साक्षी जसा तुला हा त्रास होतोय तसा तेही अजिंक्य चे आई-वडील आहेत त्यांना देखील त्रास होत नसेल का. जे घडले ते घडायला नको होते पण आता आपण त्याबद्दल विचार करून घडणाऱ्या गोष्टी बदलणार नाहीत. त्याचा फक्त त्रास होईल."

"नाही,तरीपण मी आता तिकडे जाणार नाही आदित्यला घेऊन तर मुळीच नाही.".... साक्षी.

"ठीक आहे खूप उशीर झालाय .तू आता झोप उद्या बोलू."
आई साक्षीची मनस्थिती बघून म्हणाली.


दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी आदित्यला स्कूलबस मध्ये बसून मागे फिरली तोच तिच्यासमोर विलास उभा होता.

"विलास तू इथे! मी येणार नाहीये."

"आपण घरी जाऊन बोलायचे का?"

"तरीही माझा विचार बदलणार नाही."

विलास आणि साक्षी घरी आले...

"तुमचा राग जरा शांत झाला असेल,तर मी बोलू का?"

"बोल.". ..... साक्षी चिडून.

"आबासाहेबांनी तुम्हाला येण्याची विनंती केली आहे. त्यांना एकदा शेवटचा आदित्यला आणि तुम्हाला भेटायचं आहे. नाही म्हणू नका ही त्यांची शेवटची इच्छा आहे.
तुमची आणि आदित्यच्या सुरक्षतेची पूर्ण जबाबदारी माझी.
जसे तुम्हाला घेऊन जाईन तसेच सुरक्षित आणूनही सोडेल.
हात जोडतो तुम्हाला पण नाही म्हणू नका. माझ्याबरोबर चला."

"त्या आधी तू मला सांग, तू इथे कसा?"

"रात्री सदाचा फोन आला,तुम्ही यायला तयार नाहीत. म्हणून रात्रीच निघालो इकडे यायला."

साक्षी थोडावेळ विचार करते.
"मी एकटी आले तर;आदित्यला नको."

"असं करू नका त्यांना त्यांच्या नातवाला बघायचंय शेवटचं.
तुम्हाला म्हणालो ना, त्याची सुरक्षेतेची जबाबदारी माझी."

साक्षीने आईकडे बघितले.
आईने डोळ्यांनी तिला जाण्यासाठी सांगितले.

"ठीक आहे,कधी निघायचे."

"तुम्ही तयारी करा. दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान निघू.
तुमचं झालं की फोन करा.हा माझा नंबर."
एवढं बोलून विलास गेला.

"आई मी बरोबर करते ना."
साक्षीने आईला विचारले

"हो,काळजी करू नको होईल सगळे व्यवस्थित.
साक्षी, हा विलास कोण आहे".

"विलास हा अजिंक्यचा मानलेला भाऊ.
गावातील अनाथ मुलाला आबासाहेबांनी आपलं मानलं. मुलाप्रमाणे त्याला वाढवलं,त्याचं शिक्षण केलं. आबासाहेबांचा सगळ्यात जवळचा आणि विश्वासू माणूस.
अजिंक्यचा ही खूप विश्वास होता याच्यावर. हा जर त्यावेळेस तिथे असता तर अजिंक्य आपल्या सोबत असता असं आक्कसाहेबही म्हणाल्या होत्या.
पण तेव्हां तो तिथे नव्हता."

"असो... आता तेच तेच बोलून काय उपयोग".....साक्षी दीर्घ श्वास घेते.

"जा, तयारी कर. आदित्यला लागणाऱ्या गोष्टी व्यवस्थित पॅक कर. किती दिवस थांबावे लागेल माहीत नाही."....आई

"किती दिवस ? कशाला ...
मी एक दिवसात भेटून लगेच निघणार."....... साक्षी.

क्रमशः

साक्षीने गावी जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का वाचू पुढच्या भागात.