Login

यात्रा - भाग 3

Marathi Story - Yatra - Fortuitous Circumstance
यात्रा - भाग 3

मागच्या भागात आपण वाचले साक्षी महादेव नगर ला जाण्यासाठी तयार झाली होती. आता पुढे....


साक्षीने सगळे आवरल्यावर विलास ला फोन करून यायला सांगितल. ठरल्याप्रमाणे दुपारी दोन वाजता ते निघाले. जाण्यासाठी चार ते पाच तास लागणार होते.
साक्षीच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते.तर छोटा आदित्य आपल्याला फिरायला जायचे म्हणून खुश होता. तो उड्या मारतच गाडीपर्यंत आला.

साक्षी आदित्यला घेऊन मागच्या सीटवर बसली, सदा ड्रायव्हिंग सीटवर होता.तर विलास त्याच्या शेजारील सीटवर.

"सांभाळून जा." .......आई.

गाडी निघळी थोडी पुढे गेली तोच....
मला पुढे बसायचे म्हणून आदित्य हट्ट करायला लागला

"मम्मा मला पुढे बसायचे".

"आदित्य इथेच बसायचे.पुढे ते अंकल बसलेत ना."

"नाही, मला पण पुढेच बसायचे."

हे ऐकून,
"या चला राजकुमार तुम्हाला कोण नाही म्हणणार.
द्या त्याला माझ्याकडे; बसू द्या माझ्याजवळ"
असे म्हणून विलास त्याला आपल्या मांडीवर घेतले.

पुढे बसायला मिळाल्यामुळे आदित्य खुश झाला.

थोड्यावेळ कोणीच काही बोलले नाही.

त्यानंतर साक्षी विलासला
"एक विचारू."

"अं... हा... विचारा ना"....... विलास

"खरं खरं उत्तर द्या"...... साक्षी.

यावर विलास साक्षी कडे मागे वळून बघतो.
"हम्म........विचारा."

"तुम्हाला कसं समजलं मी इथे राहते. कारण अजिंक्य गेल्यानंतर घर ,ऑफिस सगळेच बदलले."

विलास थोडासा हसला....

तुम्हाला काय वाटतं, आपला एकुलता एक लाडका मुलगा गेल्यानंतर आपल्या सुनेला, नातवाला आबासाहेब असंच एकट वाऱ्यावर सोडतील?

"म्हणजे?"

"तुम्ही, आबासाहेबांवर चिडला होता. त्यावेळेस तुमची मनस्थिती नव्हती की त्यांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट तुम्ही ऐकाल पण म्हणून आबासाहेब त्यांची जबाबदारी सोडून थोडीच देणार होते.तुम्हाला घरी पोहोचवल्यानंतर ते आजच्या दिवसापर्यंत पर्यंतची तुमची सगळी माहिती माझ्याकडे आहे.आबासाहेबांनी तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते."

"वा छान!म्हणजे तुमच्या आबासाहेबांनी माझ्यामागे डिटेक्टिव लावले होते सांगा ना."

"गैरसमज करून घेऊ नका. फक्त तुमच्या आणि आदित्यच्या काळजीपोटी आबासाहेबांनी हे सांगितले होते. आधीच अजिंक्यचा जाण्याचा आरोप तुम्ही आबासाहेबांवर केला होता त्यामुळे ते जास्त दुःखी झाले होते.तुमच्या परिस्थितीला ते स्वतःला जबाबदार धरत होते. तुमच्या वडिलांचे ही छत्र तुमच्यावर नाही म्हणून फक्त तुम्हाला अडचण आली तर मदत करता यावी यासाठी तुमची माहिती ठेवत होतो."

"तुम्ही काही दिवस डॉक्टरांकडे जात होत्या हे देखील आबासाहेबांना माहित आहे."

"राग येऊ देऊ नका पण विषय निघालाच आहे तर सांगतो
मी भेटलो होतो डॉक्टरांना ,तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही हे सांगितले होते त्यांनी मला."

"वा छानच ! अगदी इत्यंभूत माहिती पोहोचवली तुम्ही
आबासाहेबांना. शाबासकी दिलीच असेल त्यांनी तुम्हाला."

साक्षीच्या या बोलण्यावर सदा आणि विलासने एकमेकांकडे बघतले.

साक्षी रागाने,
"म्हणजे आधी आयुष्य उध्वस्त करायचे आणि त्यानंतर ते परत रुळावर येते का यासाठी प्रयत्न करून काय मिळवलं तुमच्या आबासाहेबांनी.
नाही म्हणायला गावात त्यांना मोठेपणा आणि इज्जत मिळाली असेल, हो ना."

"वहिनी"....... विलास जरा मोठा स्वरात.

"काय वहिनी ,मोठं कौतुक सांगताय तुमच्या आबासाहेबांच.
आज पाच वर्षे झाली, अजूनही बंदुकीच्या गोळींचा आवाज माझ्या कानात घुमतोय, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अजिंक्य अजूनही डोळ्यासमोर पाहून रोज तीळ तीळ मरते मी. "हे बोलल्यावर साक्षीला रडू आवरले नाही.

आईला असं रडताना पाहून आदित्यने विचारले
"मम्मा काय झालं तुला? मी येऊ का मागे."


हे ऐकून साक्षी स्वतःला सावरले

"अरे काही नाही राजकुमार; ती बघ, ती गाडी बघितलीस का तू .तुला आवडते का तशी गाडी?"
बाहेरची गाडी दाखवून विलास आदित्यच लक्ष दुसरीकडे वळवतो.

साक्षीने डोळे पुसले. ती सीटला मागे डोके टेकून एकटक खिडकीतून बाहेर बघत बसली.

आदित्य शी बोलता बोलता विलास हळूच आरशातून साक्षी कडे नजर टाकली,तिची ही अवस्था बघून त्याला हतबल झाल्यासारखे वाटत होते.

यानंतर कोणीच काही बोलले नाही.


"ईलास दादा."..... सदा

"हां. "...

"इथ उभी करायची का गाडी?"

"अरे हो त्या पुढच्या हॉटेलवर कर."

"कशासाठी?"..... साक्षी

आता आपल्या गावाकडचा रस्ता लागेल, पुढे जास्त हॉटेल नाहीत आणि अंधारही पडेल तर इथेच थांबू.... विलास

सगळे उतरतात.

विलासने आदित्य साठी चिप्स ,चॉकलेट घेतले.आदित्य ते खाण्यात गुंग झाला होता.

साक्षी ,विलास आणि सदाने चहा घेत होते.
वेळ पाहून शांततेत विलास.. साक्षीला

"मी तुमची अवस्था समजू शकतो पण हेही तितकच खरं आहे की आबासाहेबांनीआणि अक्कासाहेबांनीही आपला लाडका एकुलता एक मुलगा गमावलाय."


यावर साक्षी काहीच बोलली नाही. चहाचा कप खाली ठेवून ती आदित्यला घेऊन गाडीत जाऊन बसली.

विलासने मोठा श्वास घेतला.

"ईलास दादा मला तर सगळं लई अवघाड
वाटायला लागलय"...... सदा

"हम्म.....आता काय? बघू काय होईल ते होईल"...... विलास

दोघही गाडीत जाऊन बसले

गाडी चालू झाली..
राजकुमार पुढे यायचं ना ....विलासने हसत आदित्यला विचारले.

"नको. मला आता मम्मा कडेच बसायचं."

"बर"..... विलास.

आदित्य साक्षीला बिलगून बसला.

गाडी हळूहळू गावाच्या रस्त्याने धावू लागली.तसे साक्षीचे मनही भूतकाळात धाव घेऊ लागले

खूप खुश होता अजिंक्य त्या दिवशी.....
का नसणार?
दोन वर्ष त्याच्याशी अबोला धरणारे त्याचे वडील त्याचे आबासाहेब आज त्याच्याशी बोलले होते.

'आबासाहेब देशमुख' महादेव नगरचे सर्वेसर्वा.
गावामध्ये त्यांचा मोठा रुबाब. एकही व्यक्ती त्यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही .आबासाहेब ही तसे दिलदार व्यक्तिमत्व. गावांमधील लोकांवर अन्याय होऊ द्यायचे नाही आणि कोणाला आपल्यासमोर आवाजही चढवू द्यायचे नाही . गाव म्हटलं की राजकारण आणि राजकारण म्हटले की विरोधक हे आलेच.

पण तरीही आबासाहेब आणि अक्कासाहेब या जोडीला गावात पहिला मान असायचा. अजिंक्य हा त्यांचा एकुलता एक मुलगा.

आबासाहेबांना एक लहान भाऊ होता पण एका अपघातात त्याचे निधन झाले. त्याला दोन मुलं आणि एक मुलगी. भावाच्या निधनानंतर आबासाहेबांनीच मुलांना सांभाळले त्यांचे लग्न करून दिले. त्यांच्या परिवारात आता दोन मुलं त्यांच्या दोन बायका एक मुलगी आणि एक जावई असे सर्वजण होते. कोणीही आबासाहेबांच्या शब्दा बाहेर नव्हते पण आपल्याच एकुलता एक मुलाने आपल्या मनाविरुद्ध लग्न केलेले आबासाहेबांना रुचले नाही.

अजिंक्य ला त्यांनी शिक्षणासाठी शहरात पाठवले होते. शिक्षण झाल्यावर अजिंक्य ला नोकरी मिळाली .त्याच कंपनीत साक्षीचे वडील अजिंक्यचे बॉस होते. अजिंक्य आणि साक्षीच्या वडिलांचे चांगली ट्युनिंग होत. त्यामुळे त्याचे साक्षीच्या घरी येणे जाणे असायचे. थोड्याच दिवसात त्याची आणि साक्षीची ही मैत्री झाली पण अचानक साक्षीच्या वडिलांची प्रकृती खालावली त्यांना शेवटच्या स्टेजचा कॅन्सर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
आपण जास्त दिवस जगू शकणार नाही हे साक्षीच्या बाबांच्या लक्षात आले.

"तू माझ्या मुलीशी लग्न केले तर मी सुखाने डोळे मिटेल".
ही इच्छा त्यांनी अजिंक्य ला बोलून दाखवली आणि एक दोन दिवसातच त्यांची प्राणज्योत मालवली.

अजिंक्य पुढे आता खूप मोठे संकट होते काय करावे त्याला काही सुचत नव्हते.
त्यालाही साक्षी आवडत होती. तिला आणि तिच्या आईला असं दुःखात एकटं सोडणं त्याला जमणार नव्हतं. त्याने गावाकडे येऊन आबासाहेब आणि अक्का साहेबांना सगळं सांगून लग्नाची परवानगी मागितली पण मुलगी आपल्या जातीची नाही म्हणून त्यांनी ती नाकारली. त्यांच्याविरुद्ध जाऊन अजिंक्यने साक्षीशी लग्न केले तिच्या आईला तिला आधार दिला पण स्वतःच्या आई-वडिलांचा राग ओढवून घेतला.
अजिंक्य शी कुठलाही संबंध ठेवायचा नाही अशी सक्त ताकीद आबासाहेबांनी घरच्यांना दिली होती. पण आपल्या मुलावरील राग ते किती दिवस धरणार होते.

एक वर्षानंतर त्यांना नातू झाल्याचा अजिंक्यने कळवले होते आता तरी आबासाहेबांचा राग कमी होईल असे अजिंक्यला वाटले होते पण आबासाहेब तरीही आपल्या निर्णयावर बाहेरून ठाम होते पण मनातून त्यांनाही नातवाला बघण्याची इच्छा होत होती.

कसेबसे एक वर्ष त्यांनी अजून काढले आणि गावच्या यात्रेचे निमित्त करून विलासला सांगून अजिंक्य ला फोन लावला.

गाडीच्या खिडकीतून साक्षीची नजर बाहेर भिरभिरत होती .जसजसा तो रस्ता तिला आठवत होतात तस तशी ती तिच्या आठवणीत रममान झाली.

तिच्यासमोर अजिंक्यता तो हसणारा चेहरा आला.

त्या दिवशी तो धावत आणि मोठ्याने ओरडत आला होता तिच्याकडे, अगदी लहान मुलासारखा.

" साक्षी ......साक्षी......"

"हो ..हो ..अरे काय झाले? का ओरडतोयस एवढा?"

अजिंक्यने साक्षीला उचलून घेतले आणि गोल गोल फिरवले.

"अरे काय करतोस? खाली उतरव आधी मला.
काय झाले? एवढा कसला आनंद झालाय तुला?
सांगशील का?"

सांगतो सांगतो....

क्रमशः

काय कारण असेल अजिंक्यच्या आनंदाचे वाचू पुढच्या भागात.