येशील ना.....
सांग प्रिये तू येशील ना....
साद मनीची ऐकून येशील ना....
प्रीत माझी जाणून घेशील ना....
सांग तू येशील ना....
या कवितेच्या ओळी वाचून तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या....
अभिराज तिच्यासाठी कविता लिहायचा, नुसत्याच कविता नाहीतर प्रेम-कविता लिहायचा.
आज त्याची कवितेची डायरी घेऊन बसली होती ईशाना.
त्या डायरीतला एक एक पान पलटवताना तिच्या काळजाचा एक एक तुकडा खाली पडत होता, बाजूलाच लग्नाचा अल्बम ठेवलेला होता, नकळत तिचे डोळे त्या अल्बम कडे वळले, इच्छा नसतानाही तिचे हात आपसुकच अल्बम कडे सरसावले , आपसूकच डोळेही लागले, हृदयाची स्पंदने वाढली, अल्बम उघडले आणि डोळे उघडताच पहिल्याच फोटोवर तिच्या डोळ्यातले मोती टपकले.
ईशाना साठी ते फक्त अश्रू होते पण अभिराज साठी ते मोती होते, त्याने ते मोती कधीच डोळ्यातून निघू दिले नव्हते, डोळ्यात साठवून ठेवले होते, अल्बम च्या पहिल्या फोटो मध्ये दोघे एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले एकमेकांकडे स्मित हास्य करत, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालत.
ईशानाने त्या संपूर्ण फोटो वरून हात फिरवला आणि डोळ्यात साचलेल्या मोत्याची माळ तुटून पडली आणि त्या दिवशी दहा वर्षानंतर पहिल्यांदा ईशाना ढसाढसा रडली.
कुणीतरी खांद्यावर हात ठेवला, ईशाना पलटली , बघितल तर बाजूला अभिराज होता.
“अभिराज..." असं म्हणत ईशाना त्याला बिलगली,
“हे काय इशू अशी रडतेस तू, हे मोती (तिच्या डोळ्यातला एक थेंब बोटावर घेऊन) यांना असं वाया घालवू नकोस ग आणि हे काय अवस्था करून ठेवली, चल उठ फ्रेश हो आणि छान एखादी नवी साडी नेस."
ईशाना फ्रेश झाली आणि नवी साडी नेसून साजशृंगार करून रूम मधून बाहेर आली, तिला बाहेर अभिराज दिसलाच नाही तिने अभिराज ला आवाज द्यायला सुरुवात केली,
“अभि... अभि कुठे आहेस तू?. हे बघ चेष्टा नको, मला चेष्टा आवडत नाही माहितीये तुला, अभी आता समोर ये...” ती अभिला शोधत शोधत पुन्हा रूम मध्ये केली आरशासमोर उभी राहिली आणि बघतच राहिली.
जेव्हा ती आधी नटायची तेव्हा तरी तिने स्वतःला कधी नीटस बघितलंही नव्हतं पण आता ती स्वतःला निरखू लागली तिला प्रश्न पडला की, खरंच ही मी आहे? खरच इतकी छान दिसते मी?
ती मनातल्या मनात पुटपुटली कितीतरी वर्ष झाली ईशाना ने साज शृंगार केलाच नव्हता, ऑफिस व्यतिरिक्त कुठे बाहेर जाणेही टाळत होती, खूप वेळ आराश्या समोर उभी राहून तिने अभिची वाट बघितली पण तो आलाच नाही.
कुणीतरी खांद्यावर हात ठेवण्याचा भास झाला बघितलं तर तिची छोटीशी पिल्लू होती – अनाया.
ती चिमुकली आईचे डोळे पुसत,
“ इशू तू का रडतेस?.( अनाया नी ईशानाला कधीच आई म्हटल नव्हत, अभिराज ईशु म्हणायचा म्हणून तीही ईशू म्हणायची )
"काय झालं?"
“ नाही ग पिल्लू, तू चल मी तुला जेवायला देते...” असं म्हणत इशाना उठली, तेव्हा तिच्या लक्षात आलं अभि आलाच नव्हता सगळे तिथे भास होते, अनाया नी पुन्हा आवाज दिला
“ ईशु चल ना ग, भूक लागली आहे.
“आले ग पिल्लू."
दोघींनी जेवून घेतलं आणि आपल्या रूम मध्ये गेल्या. अनायला झोप लागली पण ईशानाला काही झोप लागत नव्हती, तिनेे रावी ला फोन केला ( रावी तिची बाल मैत्रीण ,त्याच शहरात राहायची ) खूप वेळ फोनची रिंग वाजत राहिली पण कोणीच फोन उचलला नाही.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा