येता ना भाग १

येता ना? एक रहस्य
"येता ना.” डॉक्टरांना आवाज आला.

त्याच्या दुसर्‍याचं क्षणाला त्या डॉक्टरांच्या बाजूला असलेले मशीनचे आवाज वाढू लागले. तशी तिथे एकच धावपळ झाली.

तिचा श्वास फुलला होता. रक्तदाब तर त्याच्या उच्च चरणांवर जाऊन पोहोचला. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. पुढील पाच मिनीटं ही लढाई चालू होती. जणू काही यमदूताशी सामना चालू होता.

पाच मिनिटांनंतर तिचे दीर्घ श्वासाने वर खाली होणार शरीर आणि त्या शरीराला लावलेली मशीन दोन्ही शांत झाल्या. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अन् पुढच्याच क्षणाला मनाला हेलावून टाकणारा आक्रोश हॉस्पिटलच्या आवरात गुंजला.

“काजुऽऽऽऽ” तिच्याचं आईने तिच्या लाडक्या लेकीला साद घातली होती. जी कदाचित कधीच तिच्यापर्यंत पोहोचणार नव्हती.

(काही दिवसांपूर्वी.)

“कुठे आहेस?” मॅनेजर मोबाईलवर विचारतं होता.

“हा सर पोहोचतच आहे.” साक्षी त्या मॅनेजरच्या टीममधली एम्प्लॉई होती. आज एक क्लायंट येणार होता आणि आजच नेमका तिला उशीर झाला होता.

“मिस साक्षी नेमकं महत्त्वाच्या कामाच्या वेळेस कसा काय उशीर होतो तुम्हाला?” मॅनेजर जरा चिडून बोलले. ती तिच्या कामात खूपच हुशार असल्याने तिला लगेच भांडता पण येत नव्हतं. तिच्यासारखी एम्प्लॉई भेटणं एका कंपनीला किती महत्त्वाचं असतं ते त्या मॅनेजरला चांगलंच ठाऊक होत. ती आली की डील नक्कीचं फायनल होणार याची खात्री सगळ्यांनाच राहायची. पण नेमकं महत्त्वाच्या कामाच्या वेळी तिला आज उशीर झाला होता म्हणून त्या मॅनेजरची चिडचीड चालूच होती.

“सर नका काळजी करु.” साक्षी घाईघाईत चालता चालता बोलत होती. “मी पोहोचते आहे. हा क्लायंट हातातून नाही जाणार.” ती हसतचं बोलली.

“ते माहिती आहे मला.” मॅनेजर जरा निवांत झाले. “पण आपले बॉस माहिती आहेत ना?”

“ही कायं आलेच.” साक्षी ऑफिसचं दार उघडून पटकन आत आली.

आत आल्या आल्या पहिले ती एसीच्या थंड फ्लो खाली उभी राहिली होती. ते बघून बाकीच्या स्टाफने हसतच नकारार्थी मान हलवली.

“थंडी पडली आहे बाहेर आणि तुला कसलं गरम होत आहे?” निधी तिच्याजवळ येत बोलली.

“धावत आली ना.” साक्षी अगदीचं लहान मुलीसारखी बोलली.

“आलीच आहेस तर चल बॉसने बोलावल आहे.” मॅनेजर साक्षीला आवाज देत बोलले तशी साक्षी अजून एसीची हवा शरीरात भरुन घेत मॅनेजरसोबत बॉसच्या कॅबिनकडे रवाना झाली.

“या मिस एन्टरटेनमेंट.” बॉस लॅपटॉपवर काम करत बोलले. ते दोघेही कॅबिनच्या दारात उभे होते तसे साक्षीने मागे वळून पाहिले.

“तुला बोलत आहेत ते.” मॅनेजर तिच्या कानात खुसपुसले.

तसे तिने मॅनेजरकडे बघून तिच्या बॉसवर एक कडक कटाक्ष टाकला.

“तुझी ओळख पूर्ण ऑफिसमध्ये अशीच आहे मिस साक्षी.” बॉसने तिच्यावर नजर स्थिरावली.

“सगळ्यांनाच वाटतं की तू क्लायंटला एन्टरटेन करते म्हणून क्लायंटला तुझ्याकडून जास्त प्रॉपर्टी सेल होते.”

तसे साक्षीने तिचे तोंड वाकडे केले होते. ते बघून तिचे बॉस जरा नरमले नाहीतर तिची अजून मस्करी करायचा त्यांचा मुड होता.

“बरं या बसा.” बॉसने दोघांना बसायला सांगितले तसे ते दोघेही बॉससमोरच्या खुर्चीत बसले. नंतर एक फाईल काढून बॉसने बोलायला सुरूवात केली.

“एक प्रॉपर्टी आहे. बरेच प्रयत्न झाले पण ती काही विकली गेली नाही.” बॉसने ती फाईल दोघांसमोर ठेवली.

“आता ती आपल्याकडे आली आहे. मला अस वाटतं तुम्ही तिथे जाऊन या.”

मॅनेजरने ती फाईल उचलली. साक्षी पण तिच्या बाजूने वाचायला लागली होती. प्रॉपर्टीची माहिती बघून साक्षीलाही त्यात इंटरेस्ट आला.

“चांगली आहे प्रॉपर्टी.” मॅनेजर फाईल वाचून झाल्यावर बॉसकडे बघत बोलले. “गेली कशी नाही अजून?”

“माहित नाही. आता ती आपली जबाबदारी आहे. तिथे एक राऊंड मारून या. नेमकी जागा कुठे आहे? प्रॉपर्टीची कंडीशन वगैरे वगैरे. बाकी तुम्हाला माहितीच आहे.” इतर माहिती देत बॉस समजावत होते.

“पण मीच का?” साक्षी उगांच भाव खात बोलली.
“कोणा दुसऱ्याला पाठवा, नाहीतर परत अजून काहीतरी बोलायचे.” तिला आजची मस्करी अजिबात आवडली नव्हती. तिने आजवर तिच्या मेहनतीने यशस्वीरित्या क्लायंटला प्रॉपर्टीज विकलेल्या होत्या आणि तिच्याबद्दल असं ऐकायला आल्यावर तिला रागचं आलेला होता. मग ती उठून केबिनच्या बाहेर निघून गेली तसे मॅनेजर आणि बॉसने दीर्घ श्वास घेतला.

“तुम्हाला माहिती आहे ना, तिला नाही आवडतं.” मॅनेजर

“अशी कशी ही? जरा मस्करी सहन होत नाही.” बॉस ती गेली त्या दिशेने बघत म्हणाले.

“आता तिच्या कामाबद्दल कोणी बोलले तर तिचं कायं? कोणीही ऐकून घेणार नाही.” मॅनेजर

“बाकी लोक बरं हसण्यावर घेतात?” बॉस प्रश्नार्थक बघत बोलले.

“एकतर ते मनापासून काम करत नाहीत.नाहीतर हो ला हो करण्यात एक्सपर्ट असतात.” मॅनेजर

“म्हणजे चमचेगिरीच ना.” बॉस हसतच बोलले तसे मॅनेजर पण हसले.

“ही मुलगी वेगळी आहे रे. हो ला हो करणं तिला जमतचं नाही. वरून काम पण प्रामाणिकपणे करते. अशी एम्प्लॉई मिळणं कठीण असतं.” बॉस

“आता कोणाला पाठवायचं? कारण ती तर जाणार नाही.” मॅनेजर विचार करत बोलले.

“बघूया. ह्यावेळेस तिला नाव ठेवणाऱ्यांपैकी कोणालातरी संधी देऊन बघू.” बॉस हसतच बोलले.

तसं त्या मॅनेजरलाही हसायला आलं होतं. त्या ऑफिसचं वातावरण स्टाफसाठी खूप छान होतं. अगदी फॅमिली मेंबर असल्यासारखं नातं होतं. पण जेव्हापासून साक्षी आली तेव्हापासून इतर स्टाफला तिच्यापासून जरा जेलसी व्हायला लागली होती. कारण दोनच महिने झाले होते तिला, पण ती तिच्या कामात खूप तरबेज आणि तितकीच तिने प्रगती ही केली होती.

बॉसने त्यांच्या टेबलावरच्या इंटरकॉमवरुन बाहेरच्या रिसेप्शनवर फोन लावला आणि त्यांच्या ऑफिसमधल्या दोघीं एम्प्लॉईजला बोलावून घेतलं. तशा काजल आणि आकांक्षा बॉसच्या कॅबिनजवळ आल्या.

“सर बोलावले.” काजलने दरवाजा हलकेच वाजवून विचारलं.

दोघींना आलेल बघून बॉसेने दोघींना आत बोलावून बसायला सांगितलं. मॅनेजरही आत होतेच.

साक्षीला असं अचानक कॅबिनबाहेर पडताना बघून दोघींना आत कायं झालं? हे जाणून घ्यायची खूपच उत्सुकता होती.

“ही प्रॉपर्टी बघा.” बॉसने ती फाईल दोघींसमोर ठेवली. "सेल साठी आपल्याकडे आली आहे.”

काजलने ती फाईल लगेच उचलली आणि आकांक्षसोबत वाचायला सुरूवात केली.

“सर मी जाते.” काजल फाईल वाचून लगेच बोलली. "चांगली आहे प्रॉपर्टी.”

“चांगली जरी असली तरी आजवर विकली गेली नाहीये.” बॉस तिच्याकडे रोखून बघत बोलले.

“सेल करणारा तसा माणूस भेटला नसेल.” काजलमध्ये बराच उत्साह संचारला होता.

“ठीक आहे. तु जाऊन प्रॉपर्टी बघून ये. हवंतर आकांक्षाला ही घेऊन जा सोबत.” बॉस बोलले.

“पहिले मी जाते. नंतर गरज लागलीच तर हिला सोबत घेऊन जाईल.” काजल

“ठीक आहे.” आकांक्षा बोलून कॅबिनच्या बाहेर पडली पण एवढी चांगली प्रॉपर्टी आजवर गेली नाही, हे ऐकून तिला त्या जागेवर जरा शंकाच आली होती.

दुसरीकडे आकांक्षाने लगेच घेतलेली माघार बॉस आणि मॅनेजरला ही शंका देऊन गेली होती. काजल तर नवीन प्रोजेक्ट मिळालं म्हणून तिने इतर गोष्टींकडे लक्ष दिलेलं नव्हतं. तिने ती फाईल उचलली आणि प्रॉपर्टीच्या दिशेने निघून गेली.

उत्साहात जाणाऱ्या काजलकडे साक्षीने फक्त तिरकस स्मित केलं. आकांक्षा आणि मॅनेजर ही बाहेर आले होते तेव्हा आपल्या डेस्ककडे जाताना आकांक्षाने साक्षीसोबत त्या प्रॉपर्टीबद्दल चर्चा देखील केली होती. साक्षीने का नकार दिला? याचीच तिला जास्त उत्सुकता होती पण साक्षीने तिला सांगायचं टाळलं. मग तिने ही तिचं तोंड वाकडं केलं आणि तिच्या जागेवर निघून गेली. नंतर बाकी सगळेच आपल्या कामात व्यस्त झाले होते. तो दिवस असाच संपून गेला.

क्रमशः

©®महेश गायकवाड

🎭 Series Post

View all