येता ना भाग २

येता ना? एक रहस्य
सकाळपासून त्यांचं ऑफिसचं काम सुरु झालं होतं. आज आकांक्षा ही आल्या आल्या एसीच्या थंड हवेखाली उभी राहिली होती पण तिकडे कॅबिनमध्ये बॉस मात्र खूपच गरम झालेले होते. त्यांचा फोनवरचा चिडलेला आवाज बाहेरच्या आवारातही येत होता. ते बघून आकांक्षाने मॅनेजरला त्याचं कारण विचारलं.

“काजलने काल गेल्यापासून ऑफिसमध्ये एकही फोन केला नाही आहे.” मॅनेजरही जरा वैतागूनचं बोलत होते तिचा राग त्याच्यावरही जो निघाला होता.

“नाही तिचा रिपोर्ट आला आणि ती सुद्धा अजून आली नाही.”
काजलच्या अशा वागण्याने सगळेच अचंबित झाले होते.

काजलचा कालपासून काहीच निरोप न कळल्याने बॉस ही वैतागूनच त्यांच काम करत होते. दुपारपर्यंत ही काहीच न समजल्याने आता सगळेच चिंतेत पडले होते. तसा तिच्या घरचा नंबर होता पण संध्याकाळपर्यंत त्यांनी वाट बघण्याचं ठरवलं.

दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. सगळा स्टाफ जेवणात व्यस्त असताना रिसेप्शनवरचा फोन वाजला. जेवताना फोन आला असल्याने ती रिसेप्शनवर काम करणारी मिना जरा वैतागलीच होती. पण येणारा प्रत्येक फोन रिसीव्ह झाला पाहिजे, असा बॉसचा कडक नियम होता. कदाचित तो एखाद्या क्लायंटचा ही असू शकतो यासाठी तो नियम बनवला गेला होता. त्यामुळे मिनाने जरा वैतागूनच तो फोन उचलला.

फोन उचलण्याच्या दुसर्‍याचं क्षणाला मिना “कायं?” असं जोरात ओरडली.

तिच्या आवाजाने सगळेच तिच्या जवळ लगेच जमा झाले होते. तिला सगळेच “कायं झाल?” म्हणून विचारत होते पण ती एवढी घाबरून गेली होती की तिला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. शेवटी मॅनेजरने तिच्या हातातून फोन घेतला आणि फोनवर बोलू लागले. तसे त्यांचा चेहरा अजूनच चिंताग्रस्त झालेला दिसला.

“आम्ही आलोच.” एवढं बोलून मॅनेजरनी फोन ठेवून दिला.

“कायं झाल सर?” आकांक्षा अगदीच काळजीने मॅनेजरला विचारू लागली तर दुसरी एक स्टाफ मिनाला सांभाळत होती कारण ती खूपच घाबरलेली होती.

“नदीवरच्या पुलाखाली काजल सापडली.” मॅनेजर दीर्घ श्वास घेत बोलले.

“सापडली ना?” आकांक्षा जरा श्वास घेत बोलली. "तिकडे कायं करायला गेली होती ती?”

“सापडली म्हणजे ती जखमी अवस्थेत सापडली आहे.” मॅनेजर चिंतेमध्ये बोलले. “खूपच खराब अवस्थेत भेटली आहे ती.”

तसे सगळेच शॉकमध्ये गेले. ही बातमी ऐकून सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसला. आता प्रश्न बरेच होते पण त्याची उत्तर मात्र कोणाकडेच नव्हती.

“अस कसं झालं?” आकांक्षा डोळे विस्फारून विचारत होती. तिचे डोळे लगेच ओले झाले. तिने दोन्ही हातांनी तिचं तोंड झाकून घेतलं.

“काहीच कळायला मार्ग नाहीये.” मॅनेजर ही अस्वस्थ होतं बोलले.

“ तिला एकटीला जायची कायं गरज होती?” आकांक्षाला आलेला हुंदका ती सावरत बोलली. “पत्ता तर वाचला होता ना तिने. शहराच्या एका बाजूच घरं होतं ते तर समजलचं होत ना.” तिच्या बोलण्यात चिडचिड ही तितकीच जाणवत होती.

“त्यात ती साक्षी पण आली नाही.” मॅनेजर डोक्याला हात लावत बोलले. "सर तिला तर विचारून बघत नाही की कधी येणार ते.” आता मॅनेजर ही चिडूनच बोलले होते.

“काय?” आकांक्षाला जरा आश्चर्यच वाटलं होतं. तिला कालच साक्षीचं तिरकस बघणं आठवलं तसेच त्या जागेसंबंधी टाळलेलं बोलणं ही आठवलं.

तेवढ्यातच साक्षी ही ऑफिसला येऊन पोहोचली. तिला असं न कळवता उशीरा आलेल बघून मॅनेजर चिडूनच बोलायला लागले होते.

“मिस साक्षी. तुम्हाला कोणी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीही येणार आणि जाणार. धर्मशाळा नाही ही काही मॅनर्स आहेत का नाही तुम्हाला.” मॅनेजर रागातच साक्षीवर ओरडले.

साक्षी जागीच थबकून हे सर्व ऐकत होती. ती काही पुढे बोलायला जाणार तोच आकांक्षा पुढे आली आणि तिने साक्षीच्या खांद्याला घट्ट पकडून घेतलं.

“तुला माहित होती ना ती जागा कशी आहे ते? मुद्दाम पाठवले ना तू तिला तिथे.” आकांक्षा खूपच रागारागात साक्षीच्या खांद्याला जोरात आवळून बोलत होती. शेवटी काजल तिची जिवलग मैत्रीण होती.

“शटअपऽऽऽ मला सहाच महिने झाले आहेत भारतात येऊन. मला कसं इथल्या जागा माहिती असणार आणि तू मला का बोलतं आहेस?”  साक्षी ही तितक्याच आवेगाने बोलली.

“काल तिला जाताना बघून तिरकस हसली होतीस आणि मला ही तू काहीच सांगितलं नाहीस.”

“एवढ्यावरून तू मला जज केलसं?” तुला माहिती आहे का मी कुठे…”  साक्षी डोळे विस्फारून बोलली.

“काहीच बोलू नकोस तू.” आकांक्षाने रागातच साक्षीचं तोंडच दाबलं.
तसे मॅनेजर पटकन पुढे आले आणि त्याने साक्षीला आकांक्षांच्या हातून सोडवलं.

इतक्यात तिथे बॉस आले. तिथलं गंभीर झालेलं वातावरण बघून त्यांनाही जरा टेन्शनचं आलं होत.

“काजल सिव्हील हॉस्पिटलला ॲडमीट आहे. तिच्यावर कोणीतरी गंभीर हल्ला केला आहे. त्यासाठी पोलीस चौकशीसाठी आपल्या ऑफिसमध्ये येणार आहे.” बॉस परिस्थितीचा अंदाज देतं बोलले.

“पोलिसांना कशाला बोलावता? हिलाच पोलिसांकडे घेऊन जाऊया. हिनेच केलं असणार." आकांक्षा रागाने परत साक्षीकडे बघत बोलली.

बॉस आळीपाळीने आकांक्षा आणि साक्षीकडे बघत होते.

“काही बोलण्याआधी विचार करत जा मिस आकांक्षा.” बॉस आवाजात जरब आणतं बोलले.

“पण काल ती..” आकांक्षा पुढे बोलणार तोच परत बॉस बोलले.

“तिच्यामुळेच काजल सापडली आहे.” बॉस कडक आवाजात बोलले.

परत सगळ्यांना शॉक बसला.

“कॉलेज रोड वरून घरी चालली होती तर कॉलेजवरून येताना तो पूल रस्त्यात लागतो. तर तिथे काही मुलं आश्चर्याने खाली वाकून बघत होती. तिचं लक्ष तिकडे गेलं आणि तिने काजलला ओळखलं.” बॉसने पॉज घेतला. “मग तिनेच पोलिसांना फोन केला. बाकी सगळीच प्रोसिजर केली आणि मग इकडे आली.”

“तुम्हाला कसं इतकं माहित?” आकांक्षा अजूनही संशयाने साक्षीकडे बघत होती.

बॉसने साक्षीकडे पाहिले. ती खाली मान घालून खिन्नपणे बसली होती मग बॉसने परत दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरूवात केली.

“माझ्याचं घरून ती निघाली होती.” बॉसने साक्षीला कवेत घेतलं. आधी मिळालेल्या धक्क्यातून कोणी सावरलेलं नसतानाही बॉसने साक्षीला कवेत घेतलेले पाहून सगळेच शॉक झाले आणि आ वासून एकमेकांकडे पहायला लागले.

बॉसच्या मनातले वादळ शांत झाल्यावर ते वास्तवात आले. साक्षीने त्यांना हळूच तिच्यापासून दूर केलं. सगळेच अजूनही त्या दोघांकडे आश्चर्याने पाहत होते ते पाहून बॉसने एक उसासा घेतला आणि बोलायला लागले.

“माझ्या बहिणीची मुलगी आहे ती. सायकोलॉजीमध्ये पीएचडी करत आहे. त्यासाठी ती आपल्या ऑफिसमध्ये फक्त सेल्स गर्ल म्हणून काम करत होती. तिला सामान्य एम्प्लॉईची मानसिकता जाणून घ्यायची होती. सायकोलॉजीचा अभ्यास असल्यामुळेच समोरच्या माणसाची मानसिकता तिला समजून जात होती. त्यामुळेच ती इतक्या लोकांना प्रॉपर्टी सहज विकू शकली. इथे यायच्या आधी कोणाला काही न सांगण्याची तिने अट घातली होती पण आज जे काजलसोबत झालं…” बॉसने बोलता बोलता पॉझ घेतला.

“हिला काही झालं असतं तर मी माझ्या ताईला काय उत्तर दिलं असतं?” बॉस वर बघत बोलले. तेव्हा त्यांच्या डोळ्यात हलकीच आसवं दाटली होती.

थोडावेळ शांतता पसरली होती.

“पोलीस येऊन त्यांची चौकशी करतील. त्यांना जेवढी माहिती पाहिजे असेल तेवढी द्या. नंतर आपण काजलला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाऊया.”  एवढं बोलून बॉस त्यांच्या कॅबिनमध्ये निघून गेले.

साक्षी अजूनही तिथेच बसलेली होती. तिची नजर शून्यात हरवलेली होती. आकांक्षा तिच्याजवळ गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. खांद्याला स्पर्श झाल्यावर साक्षीने वर पाहिले तर आकांक्षा होती.

क्रमशः

©®महेश गायकवाड

🎭 Series Post

View all