येता ना भाग ३

येता ना? एक रहस्य
भाग ३

“सॉरी गं. मला एकच तर मैत्रीण आहे. काल तुझं वागणं बघून तुझ्यावर थोडा संशय आला होता. पण तुचं तिचा जीव वाचवला.” आकांक्षा तिचे अश्रू पुसत बोलली.

“काल तिला बघून हसली होती म्हणजे एखादा एम्प्लॉई काम मिळाल्यावर कसा रिॲक्ट होतो? ते बघत होते तिला असं आनंदात बघून ती तिच्या कामाप्रती किती एकनिष्ठ आहे, ते मला समजलं होतं आणि ते बघूनचं मला आनंद झाला होता. माझ्या मामाच्या ऑफिसला एवढे चांगले एम्प्लॉई कामाला आहेत याचा मला अभिमान वाटला. नाहीतर बाकी ठिकाणी फक्त स्वार्थ बघायला मिळाला होता.” साक्षी बोलली.

“म्हणजे तू जाणूनबुजून सर्वांशी ॲटीट्युडमध्ये वागत होतीस?” आकांक्षा

साक्षीने डोळ्यांची उघडझाप करूनच तिला होकार दिला. तेवढ्यातच तिथे पोलीस येऊन पोहोचले.

सर्वात प्रथम पोलिसांनी बॉसच्या कॅबिनमध्ये त्यांच्याशी चर्चा केली आणि नंतर बाकी स्टाफ सोबत चौकशी केली. या सर्वांमधून काजलचे कोणासोबत वैर असल्याचे अथवा प्रेमप्रकरण असल्याचे असे काहीचं आढळून आले नव्हते.

काजलच्या बाजूने कोणताच सुगावा न लागल्याने, पोलिसांनी त्यांचा मोर्चा त्या जागेकडे वळवला ज्या जागेवर काजल कामानिमित्त गेली होती. एवढीच माहिती त्यांना तिथे मिळाली होती. मगं पोलीस त्या ऑफिसमधून बाहेर पडले. जाता जाता कोणालाही शहराच्या बाहेर पडता येणार नाही अशी तंबी देऊन गेले होते.

इकडे पोलीस गेल्यावर ऑफिसमधल्या सगळ्यांनी जरा सुटकेचा श्वास सोडला. टेन्शन तर होतंच पण वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय ही नव्हता. आता काम करण्याची कोणाची इच्छा ही होत नव्हती. तेवढ्यातच बॉस परत त्यांच्या कॅबिनच्या बाहेर आले. सगळ्यांवर एक नजर टाकली. सगळेच उदास बसलेले होते. ते बघून बॉसने बोलायला सुरूवात केली.

“तुम्हीच असे तोंड पाडून बसला तर काजल आणि तिच्या आईला कोण धीर देईल?” बॉस जरा कडक आवाजात बोलले. "चला हॉस्पिटलला जाऊन येऊ.”

बॉसचं बोलणं ऐकून स्टाफने त्यांचं टेबल आवरून घेतलं. अन् पुढच्या दहा मिनिटांत पूर्ण ऑफिस बंद करून ते सगळेच हॉस्पिटलकडे निघून गेले होते.

दुसरीकडे ते पोलीस काजल गेलेल्या घराकडे पोहोचले होते. पण तिथलं वातावरण असं होतं की जसं काही तिथे घडलचं नाही. पोलिसांनी काजलचा फोटो दाखवून आजुबाजुच्या घरात, 'तिला पाहिलं का?' म्हणून चौकशी केली होती पण तिला कोणी पाहिल्याचे ही आढळून आलेले नव्हते.

‘मगं ऑफीसमधली माणसं खोटं बोलत आहेत का?’ असा संशय पोलिसांना आला होता.

नंतर त्यांनी त्या घराची चौकशी केली तर त्या घराचे मालक परदेशात स्थायिक झाल्याचे तिथल्या शेजाऱ्यांनी सांगितले होते. तसेचं ते घर विक्रीसाठी एका एजन्सीकडे दिल्याची माहिती पोलिसांना समजली होती त्यामुळे ऑफिसमधली माणसं आता खरं बोलत असल्याचे पोलिसांना कळून आले.

तिथूनही फारशी काहीच माहिती न मिळाल्याने ते परत पोलीस स्टेशनला निघून गेले.

इकडे सगळा स्टाफ हॉस्पिटलला पोहोचला होता. काजलला जवळपास सर्वच शरीराला पांढऱ्या पट्ट्यांनी वेढलेलं होतं. अगदी तिचे सुजलेले डोळे ही तिच्यासोबत किती भयानक गोष्ट घडली असेल याची साक्ष देत होते. ते बघून आकांक्षाला रडायलाच आलेलं. साक्षीला ही तिला बघून खूपच वाईट वाटलं.

बॉस मात्र डायरेक्ट काजलच्या आईकडे गेले होते. बॉसला आलेलं बघताच ती माऊली धाय मोकलून रडायलाच लागली होती. बॉसनी त्यांना त्यांच्या हातानेच आधार दिला.

तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांना या सगळ्यांनाच बघुन आश्चर्यच वाटलं होतं कारण ऑफिसचा कलिग जर असा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला की सहसा फक्त त्याचे मित्र मंडळी एवढेच तिथे येत असतात. इथे तर बॉस सकट सगळेच आले होते. मग त्या पोलिसाने लगेच तपास करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना ही माहिती दिली.

तसं तपास करणाऱ्या पोलिसांना काजलच्या आईचं बोलणं खरं वाटलं होतं. सर्वात पहिले त्यांच्याकडेच तर चौकशीसाठी गेले होते. तेव्हा त्यांनी काजलच्या ऑफिसचं वातावरण खूपच चांगलं असल्याचं सांगितलं होतं. अगदी एका कुटुंबाप्रमाणे तिचा बॉस सगळ्यांची काळजी घेत असतो, असं त्या बोलल्या होत्या. सवयीप्रमाणे पोलिसांनी लगेचच त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. पण आता खात्रीच पटली होती की काजलसोबत जे काही झालं त्याला ऑफिसमधलं कोणीच जबाबदार नव्हतं.

पोलिसांनी आजुबाजूचे सीसीटीव्ही देखील पाहिले होते. पण त्यात देखील नियमीत दिनक्रम वगळता इतकी कोणतीही संशयात्मक बाब त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती. आता सगळ्यांचं बाजूने दार बंद झाल्यासारखे वाटू लागले होते.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काजलला तपासून आयसीयुच्या बाहेर आले होते. त्यांना बाहेर आलेले बघून बॉस पटकन त्यांच्याजवळ गेले.

“कशी आहे काजल?” बॉस काळजीने विचारत होते. "ती बरी होईल ना?”

काजलची आई देखील आशेने डॉक्टरांकडे बघत होती.

“आत्ताच काही सांगता येणार नाही.” डॉक्टर दीर्घ श्वास घेत बोलले. "तिच्याकडे बघून आधी वाटतं होत की तिच्यावर जबरदस्ती किंवा बलात्कार झाला असेल पण तसं काही नाही आहे. तिला मारहाण खूपच झालेली आहे. शरीरावरचा एकही भाग असा नाही की जिथे मार बसला नसेल.”

डॉक्टरांच्या बोलण्याने तिची आई जागीच थिजली होती. मुलीच्या काळजीने तिला गरगरायला लागलं होत. त्या पडणारच होत्या तेवढ्यातच आकांक्षा आणि साक्षीने जाऊन त्यांना सांभाळलं. त्यांच कसंतरी सांत्वन करून साक्षीने त्यांना शांत केलं.

तिथे थांबूनही आता काहीच फायदा नव्हता म्हणून बॉसने साक्षीला काजलच्या आईजवळ थांबायला सांगितलं आणि बाकी स्टाफला घरी जायला सांगीतलं. वेळ तर कोणासाठी थांबणार नव्हता आणि पोटासाठी काम करणं ही गरजेचं होत म्हणून बॉसने बाकी सगळ्यांनाच उद्या ऑफिसला यायला सांगितलं.

आकांक्षाचा तर पाय निघतं नव्हता तिथून पण साक्षीने तिला आश्वस्त करून घरी पाठवून दिलं. काही वेळाने साक्षीची मामी म्हणजे बॉसची बायको जेवण घेऊन आल्या होत्या तसे साक्षीने काजलच्या आईला जबरदस्ती खाऊ घातले.

त्यानंतरचे चार ते पाच दिवस असेच गेले. गुन्हेगाराबाबात पोलिसांना कसलेच धागेदोरे मिळाले नव्हते. त्यामुळेच त्यांचा तपास आता जरा ढिला पडत चालला होता. काजलची आई तर हॉस्पिटलमध्येच ठाण मांडून बसलेली होती. घरी तिच्याशिवाय तरी दुसरं कोण होत तिला. त्यांचे नातेवाईक ही येऊन विचारपूस करुन गेले होते. त्यांचे शेजारी ही काजलच्या आईला जमेल तशी मदत करत होते.

पाच दिवसांनी काजलची तपासणी करण्यासाठी डॉक्टर तिच्याजवळ गेले. ती अजूनही आयसीयूमध्येच होती. तिथली नर्स अजून मागेच राहिली होती ते बघून डॉक्टरांनी त्या नर्सकडे पाहिलं आणि बोलले.

“येता ना.” डॉक्टर

तसा काजल जोरजोरात श्वास घेऊ लागली होती. तिला लावलेले मशीन्स ही आवाज करू लागले होते. तो आवाज ऐकून नर्स पटकन तिच्या बेडजवळ धावत आली. डॉक्टरनी इंस्ट्रक्शन्स दिले तसं नर्स मदत करू लागली‌.

डॉक्टरांची ही धावपळ एव्हाना काजलच्या आईच्या लक्षात आली. त्या ही लगेच आयसीयुच्या दाराच्या काचेतून आपल्या लेकीची ही तडफड बघू लागल्या. तसा त्यांचा ही जीव खालीवर होऊ लागला होता पण पुढच्या पाच मिनिटांत आतलं सगळंच काही शांत झालं आणि ते बघून काजलच्या आईचा जोरात आक्रोश सुरू झाला.

तो आवाज ऐकून हॉस्पिटलमध्ये येणारी साक्षी धावतचं काजलच्या आईजवळ पोहोचली. त्यांना सांभाळणं आता साक्षीच्या हाताबाहेर जाऊ लागलं होतं. काजलचा मामा ही नुकताच परत काजलच्या चौकशीसाठी आला होता. आपल्या बहिणीचा आक्रोश पाहून त्यानं पटकन तिला आपल्या कवेत घेतलं.

क्रमशः

©®महेश गायकवाड

🎭 Series Post

View all