येता ना भाग ४

येता ना? एक रहस्य
योगायोगाने म्हणा किंवा कर्म धर्म संयोगाने म्हणा, एका युट्यूब व्लॉगरची नजर काजलच्या आईवर पडली. जो सामाजिक क्षेत्रात काम करण्यात प्रसिध्द होता. तो काजलच्या आईजवळ गेला पण त्याच इतक्या दुखाःत होत्या की त्यांना काहीचं सांगणं मुश्किल झाल होतं.

साक्षीने त्यांना पाहिलं आणि तिच्या डोक्यातली विचारचक्र फिरायला लागली. ती तशीच त्यांच्याजवळ गेली आणि घडलेली गोष्ट सांगितली.

इतके दिवस पोलिसांनी मिडीयापासून लांब ठेवलेली गोष्ट पंधरा मिनिटानंतर वाऱ्यासारखी पूर्ण राज्यात पोहोचली होती. त्या युट्यूब व्लॉगरचे पूर्ण राज्यात दहा लाखाच्या वर फॉलॉवर्स होते त्यामुळे ती बातमी पसरायला वेळ लागला नव्हता. पूर्ण राज्यात काजलच्या न्यायासाठी दाद मागितली जाऊ लागली.

निवांत झालेलं पोलीस स्टेशन ही आता खडबडून जाग झालं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. राज्याच्या पोलीस हेडक्वार्टरकडून या केसच्या तपासासाठी एका आयपीएस ऑफिसरची नेमणूक केली होती. जे पोलीस तपास करत होते त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले गेले.

त्याचं दिवशीच्या संध्याकाळी तिची पावलं काजलच्या ऑफिसमध्ये पडली. तिचं ती हेड क्वॉटरकडून नियुक्त झालेली आय पी एस ऑफिसर तारा देशमुख. त्या ऑफिसमध्ये तिला ही तिचं माहिती मिळाली जी आधीच्या पोलिसांना मिळाली होती. त्यांनी गोळा केलेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज सगळं काही तिने खंगाळुन काढलं होत‌ं पण तिला जे हवं ते मिळतच नव्हतं. काजलच्या ऑफिसमधून तिच्या घरी जाताना ती काजलच्या आईला भेटून गेली.

रात्री ती तिच्या आराध्य दैवताच्या फोटोसमोर जाऊन उभी राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांची सून आणि सरसेनापती हंबीरराव मोहीते यांची कन्या महाराणी ताराबाई त्यांचा फोटो होता तो. त्यांच्याच जन्माच्या दिवशी तर हिचा जन्म झाला होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बराचसा प्रभाव या तारावरही पडलेला होता.

तिला जेव्हा कधी काहीच मार्ग भेटत नसेल तर ती यांच्या फोटोसमोर येऊन उभी राहत होती. त्यांच्या फोटोकडे बघताना ताराला नवीन उर्जा मिळायची. बराच वेळ त्यांच्या फोटोकडे बघत राहिल्यावर ताराच्या चेहऱ्यावर बरीच चमक आली. त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन तारा परत तिच्या कामाला लागली.

मनाला पूर्ण शांत करून तिने नव्याने तपासणीला सुरूवात केली होती. घराच्या समोरच्या रस्त्यावर तर सीसीटीव्ही नव्हते. पण त्या रस्त्यावरून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या चौकात मात्र सीसीटीव्ही होते. त्याची फुटेज बघताना चौकात एक बाई आणि माणूस भलीमोठी कचऱ्याची बॅग घेऊन आले. त्याचवेळेस तिथे नेहमीच येणाऱ्या कचऱ्याच्या गाडीत ती कचऱ्याची बॅग टाकताना ते दोघं दिसत होते. ती बॅग कचऱ्याची असल्याने त्यावर कोणाला संशय आला नव्हता. म्हणून ती कचऱ्याची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरचे सीसीटीव्ही फुटेज आणि त्या गाडीवर असलेल्या चालकाची माहिती ताराने मागावून घेतली.

ती माहिती येईपर्यंत ताराने त्या घराची माहीती वाचायला सुरूवात केली. तर या आधीही त्या घरातून “येता ना.” असे आवाज येत असल्याची तक्रार ताराला मिळाली होती. काहींना तो भूतांचा प्रकार वाटतं असल्याने त्याबाबतीत कोणीच काही बोलले नव्हते.

या आधी ही ते घर विकण्याचा बाकी इस्टेट एजन्सीने प्रयत्न केला होता. पण त्यांना ही असाच आवाज आल्याचा अनुभव आल्याने त्यांनी या घराचा विषय सोडून दिलेला होता. ते घर आता ताराला अजूनच गोंधळात टाकायला लागलं होतं. घराची चावी पण एकच होती. जी सध्या काजलकडे दिली गेली होती.

त्या घराची माहिती वाचता वाचता ताराला अजूनच एक तक्रारीचा कागद मिळाला. ज्यात सर्वात पहिले ज्या एजन्सीकडे घर विकण्यासाठी दिल होतं. त्यां एजन्सीने घराच्या मालकाविरुध्द त्यांची फी दिली नसल्याची तक्रार केली होती. मग ताराच्या संशयाच्या लिस्टमध्ये त्याचेही नाव आलं होतं. ताराने त्या एजन्सीच्या मालकाची माहिती, मोबाईल नंबर, लोकेशन सगळेच काढायला सांगितलं.

मग ताराने त्या घराच्या मालकाची आणि त्याच्या नातेवाईकांची माहिती शोधून काढली. त्यात ही तिला काहीच वावगं वाटलं नाही. अगदी एखाद्या मुव्हीसारखा प्लॅन्ड मर्डर वाटायला लागला होता. तारा तशीच परत त्या घराकडे गेली. सोबतीला एक कॉन्स्टेबल ठेवला होता. रात्रीचे ९ वाजले होते. घरातला प्रत्येक कोपरा तिने बारकाईने तपासला. घराच्या तळघरातही तारा दोन वेळा जाऊन आली. दुसर्‍या वेळेस परत पायऱ्या चढताना त्या जिन्याच्या बाजूला अंधाराची जागा होती. तिथे जरा बरचसं सामान ठेवलेलं होतं. तरी तिथल्या वस्तू सरकवल्याच्या खुणा ताराला दिसल्या होत्या. त्या इतक्या बारीक होत्या की सहज कोणाला दिसणारातल्या नव्हत्या.

तारा हळूच तिथे घुसली. तिथल्या वस्तूंना हात लावून बघत असताना आतल्या लहानश्या भिंतीला हात लागताच ती खूपच पातळ जाणवली. त्या भिंतीवर जोर देताच ती बाहेरच्या बाजूला दरवाजासारखी उघडली गेली. ताराने ती भिंत निरखून पाहिली तर ती एक लाकडाच्या फळीने बनवलेली दिसली. थोडसंच गुहेसारखं खोदकाम केलेलं दिसलं. त्यातून ती तशीच पुढे गेली पण पुढचा रस्ता बंद दिसला.

ताराने तळघरापासून इथपर्यंत आल्याची दिशा आठवली आणि पटकन तिथून बाहेर येऊन त्याचं दिशेने बाहेरच्या दिशेने बघू लागली. तिला समोर त्या महिलेचे घर दिसलं होत‌ं ज्या महिलेने तिथून कोणालाच न पाहिल्याचं सांगितलं होतं.

ताराने सर्वात अगोदर तर त्या महिलेसोबत प्रेमाने माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकतच नव्हती म्हटल्यावर ताराने तिचं मुळ रुप तिला दाखवलं होतं. मगं ती महिला पोपटासारखी बोलू लागली.

प्लॅन जरी मुव्ही सारखा केला असला, तरी खरं आयुष्य मुव्ही सारखं कधीच नसतं ही गोष्टचं गुन्हेगार विसरून जातो. सगळं काही ऐकून घेतल्यानंतर ताराच्या चेहऱ्यावर आसुरी स्मित आलेलं.

थोड्याचवेळात ताराच्या मोबाईलवर त्या गाडीची माहिती झळकली होती. ती कुठे कुठे गेली होती? याची ही सर्व माहिती तिला मिळाली. त्या गाडीचा चालकही ताब्यात आल्याचं त्या मेसेज मध्ये लिहिलेलं होतं. तारा फोन ठेवणारं होती की गुन्हेगाराविरूद्धचा ठोस पुरावा सांगाणारी बातमी फिरत तिच्या मोबाईलवर झळकली. तसा ताराचा आत्मविशावास अजून वाढला. त्या महिलेला पोलीस स्टेशनला पोलिसांच्या ताब्यात दिली मग तारा तशीच हॉस्पिटलला गेली.

नियमानुसार गुन्हेगाराला अटक करायला जायच्या आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागणार होती. किमान त्यांच्या कानावर घालणे क्रमप्राप्त होते पण ती तर तारा होती ना. गनिमांच्या छावणीत घुसून गनिमीकाव्याने हल्ला करणे हे तर तिचं आवडतं काम होतं.

ती रात्र तारा निवांत झोपली होती. आज सकाळीच उठून ती एका इस्टेट एजन्सीच्या ऑफिसला पोहोचली सोबत नेहमीचा कॉन्स्टेबल होताच. हे पहिलं ऑफिस होत जिथे त्या घराची विक्री करण्यासाठी घराच्या मालकाने त्यांच्याकडे दिल होतं. ऑफिसच्या बाहेर एका कोपर्‍यात कव्हर घातलेली गाडी तिला दिसली. ताराने हसतचं ते कव्हर थोड उचलून पाहिलं आणि आत गेली.

“येता ना?” तारा त्या ऑफिसच्या बॉसची कॅबिन उघडून बोलली.

क्रमशः

©®महेश गायकवाड

🎭 Series Post

View all