येता ना अंतिम भाग

येता ना? एक रहस्य
तसे आत बसलेले रजनीश चमकून तिच्याकडे बघू लागले. पण लगेचच स्वतःला सावरत ते बोलले “दारात आल्यावर आत येऊ का? असं विचारतात, तुम्ही वेगळचं विचारलं.”

“मी घुमून फिरुन बोलणार नाही.” तारा आत येऊन समोरची खुर्ची बाजूला करत त्याच्याजवळ गेली आणि सणसणीत कानाखाली वाजवली. तसा तो खुर्चीवरून धडपडून खाली पडला.

“स्वतःचे काळे धंदे लपवण्यासाठी एका मुलीचा एवढा छळ केलास ******.” ताराने शिवी घालून त्यांच्या कमरेत डायरेक्ट लाथ मारली. काजलची अवस्थाच अशी केली होती की ताराचा राग खूपच अनावर झाला होता. ताराचं ते रूप बघून ऑफिसमधल्या इतर कोणाची हिंमतच झाली नव्हती मध्ये पडायची. त्यांना मार खाताना बघून तर काही महिला स्टाफच्या चेहऱ्यावर आनंद झळकला होता.

“पण मी काहीचं केलं नाही.” रजनीश स्वतःला सावरत तारापासून दूर पळत बोलले.

तारा देशमुख काय चीज आहे? हे त्यांना आधीच त्यांनी काढलेल्या माहितीवरून समजलं होतं म्हणूनच ते आता तिच्याशी प्रतिकार करण्याऐवजी तिच्यापासून लांब जात होते.

“तुमच्याकडे कायं पुरावा आहे?” रजनीश चवताळून बोलले.

“काजलला शुध्द आली आहे.” तारा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलली तसे तो चमकलाचं.

हाच तर तो ठोस पुरावा होता जो ताराच्या मोबाईलवर झळकला होता. काल हॉस्पिटलमध्ये गेल्यावर काजलने सांगितलेल्या खुलाश्यावरुन ताराला तो ठोस पुरावा मिळाला होता. तेव्हाच सोबत असलेल्या साक्षीने ही एका माणसावर आलेला संशय ताराला सांगून दाखवलेला होता.

ताराने पुढे बोलायला सुरुवात केली.

“तिने तिथे चाललेला तुझा ड्रग्जचा धंदा पाहिला होता. त्यासाठीच तर तू ते घर विकलं जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होतास ना. त्या घराचा मालक तर परदेशात राहतो. तो काही इकडे येणार नाही. बाजूच्या घरातून रस्ता बनवून त्या घरात सहज ये जा करत होतास. म्हणजे ते घर रिकामचं आहे असं सगळ्यांनाच वाटेल. पण त्या घराची विक्री दुसर्‍या एजन्सीकडे गेली म्हणून तू भुताटकीचा खेळ खेळलास. तरीही तिथे काजल आलीच.
तू पहिले तिला विकत घेण्याचा प्रयत्न केलास. ती ऐकतच नाही म्हणून तिला घाबरवण्याचा प्रयत्न केलास. ती घाबरल्यावर कमजोर पडली म्हणून मारण्याचा प्रयत्न केलास. तिला ज्या बॅगेत भरुन नेलं ती बॅग, तू वापरलेली ती कचऱ्याची गाडी, तुला मदत म्हणून “येता ना.” अशी आवाज करणारी ती शेजारीण, त्या गाडीचा चालक सगळेच माझ्या ताब्यात आहेत.” तारा ही तितकीच चिडून बोलली.

ताराने त्यांचा सगळाच प्लॅन एका दिवसात रजनीशसमोर उलगडून मांडल्यावर त्याला पहिले जरा धक्काच बसला. पण लगेच स्वतःला सावरत बोलला.

“ह्यांऽऽऽ.” रजनीश तुसड्यात बोलले. "तरी तू माझ काहीचं वाकडं करु शकत नाहीस. दोन दिवसात बाहेर येईल मी.” त्यांच्या डोळ्यात किंचितही पश्चाताप दिसत नव्हता.

तारा तर कधीची ह्याच क्षणाची वाट बघत होती. तिथून त्यांना सोबत घेऊन ती हॉस्पिटलला आली.

इकडे हॉस्पिटलमध्ये काही न्युज रिपोर्टर काजलच्या आईजवळ जाऊन माहिती घ्यायचा प्रयत्न करत होते पण साक्षीने त्यांना अक्षरशः उडवून लावलं होतं.

“फक्त ॲसिडीटी झाली म्हणून नेत्याची मुलाखत घ्यायला इथेच आले होते ना?” साक्षी चिडून बोलत होती. “तेव्हाच नाही दिसली ही आई. आता टीआरपी मिळेल म्हणून धावत आले. लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात तुम्ही त्यानुसार काम करा.”

साक्षीने बरेच कडवे घोट त्या न्युजवाल्यांना पाजले होते. थोड्याचवेळात आयपीएस ऑफिसर तारा देशमुख ही तिथे येऊन पोहोचली. तिला आलेलं बघून साक्षीच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. ताराच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघून तिला खरा गुन्हेगार सापडल्याची खात्री साक्षीला झाली होती. यासाठीच तर तारा पोलीस डिपार्टमेंटमध्ये ओळखली जात होती.

“त्यांना काय विचारत आहात जे काही आहे ते मला विचारा.” तारा कडक आवाजात कडाडली.

तसे सगळेच न्युज रिपोर्टर तारा भोवती गोळा झाले. तसं ताराने बोलायला सुरूवात केली.

“खरा गुन्हेगार माझ्या ताब्यात आलेला आहे.” तारा सगळ्यांनाच बघत बोलली तसा सगळ्यांना धक्काच बसला होता.

“तो जिवंत आहे ना?” एका न्युजवाल्याने खोचकपणे विचारलं. कारण या आधी जो कोणी गुन्हेगार ताराच्या वाकड्यात घुसण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तारा त्याचा जागेवरच एन्काउन्टर करत होती.

“हो, देवाच्या कृपेने आहे जिवंत.” तारा ही नाखुशीनेच बोलली. “आणि हो एक खुशखबरी पण आहे.”

“कोणती?” न्यूज रिपोर्टर

“काजल पूर्णपणे बरी झाली आहे.” तारा आता जरा आनंदात बोलली होती.

“पण ती तर…” न्युज रिपोर्टर बोलता बोलता थांबला.

“ते तर जाणूनबुजून सांगितलं गेलं होतं. ती फक्त कोमात गेली होती.” नंतर ताराने साक्षीकडे पाहिलं. “ही जी मुलगी आहे, हिच्यामुळे ती परत वाचली.”

ताराच्या या वाक्यावर सगळेच गोंधळले होते. अगदी काजलची आई देखील.

“तो गुन्हेगार तर इथे ही काजलच्या मागे मागे तिला मारायला आलेला होता.” ताराने बोलायला सुरूवात केली. “काजल हॉस्पिटलमध्ये ॲडमीट झाल्यापासून एक माणूस तिच्या रूमच्या आजुबाजूला घुटमळत होता. अगदी आत ही जायचा प्रयत्न करत होता. त्यामुळेच साक्षीला त्याच्यावर संशय आला आणि तिने हा खेळ खेळला. काल रात्री काजलला पूर्ण शुध्द आली होती मग तिच्याकडून मी सगळीच माहिती घेतली.”

“मग त्या गुन्हेगाराला कुठे ठेवलं आहे?” न्युज रिपोर्टर

तसं ताराने मागे वळून पाहिलं, सगळ्यांचेच डोळे विस्फारले गेले होते. एका स्ट्रेचरवर एका जखमी माणसाला आणलं जात होतं. त्याचीही अवस्था जरा बिकटच दिसत होती. न्युज वाल्यांनी झटक्यात ताराकडे पाहिलं.

“पळून चालला होता.” तारा बेफिकीरपणे बोलली. “पळता पळता दुसर्‍या मजल्यावरून खाली पडला.”

रजनीशने तुसड्यात उत्तर दिल्यावर ताराने त्याला इतक धुतलं होतं की अगदी त्याला मुव्हीमधला फिलिंग दिला होता.

एवढे दिवस गुंतलेली केस ताराने तीन दिवसात सोडवली होती म्हणून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पण ताराने साक्षीचे देखील आभार मानले होते कारण तिच्या हुशारीमुळेच काजल आज वाचली होती.

तारा नंतर काजलजवळ गेली होती. तिने ही तारासमोर हात जोडले.

“परत असा आगाऊपणा करायला जायचा नाही.” ताराने तिला प्रेमाने खडसावले. “काही कळलं तर पहिले पोलिसांना सांगायचं. असं डायरेक्ट जाऊन कोणालाही भिडायचं नाही.”

काजलनेही मानेनेच तिला होकार दिला होता.

“त्याचे साथीदार ही काही दिवसांत माझ्या तावडीत सापडतील तोपर्यंत थोडी सतर्क रहा. तसं पोलीस तुझ्या सुरक्षेसाठी आहेतच.”

काजलच्या आईने परत तारासमोर हात जोडले. तसे तिने त्यांचे हात धरुन खाली केले. “फक्त तुमचे आशिर्वाद असू द्या.”

काजलच्या ऑफीसचा सगळा स्टाफही ताराला भेटला. अगदी त्यांचे मॅनेजर ही तेवढ्यातच तिच्या सोबतीचा कॉन्स्टेबल ताराजवळ आला.

“नवीन केससाठी बोलावणं आलं आहे.” कॉनस्टेबल “येता ना?”

तशी तारा सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडली होती.

**समाप्त **

©®महेश गायकवाड

🎭 Series Post

View all