Login

योग्य वेळ भाग १

Family Drama
योग्य वेळ भाग १

म्हण:- तोंड दाबून मुक्क्यांचा मार

©® सौ. हेमा पाटील.

"राहुल आधी तो टॉवेल उचल. असा बेडवर कुणी ओला टॉवेल टाकतात का?" दीक्षा करवादली.

" अगं, मला उशीर झाला आहे. मम्मी ठेवील उचलून. माझा टिफिन भरला आहेस ना?" असे म्हणत राहुलने मोबाईल खिशात घातला. आपल्या बोलण्याकडे राहूलने दुर्लक्ष केले आहे हे पाहून दीक्षा अजूनच चिडली.

" तू टॉवेल उचलल्याशिवाय तुला टिफिन मिळणार नाही." दीक्षा म्हणाली .

" राहू देत, नको देऊस टिफिन. जातो मी तसाच." असे म्हणून राहूल बाहेर पडला. यामुळे दीक्षाची खूप चिडचिड झाली.

"गेला ना तो टिफीन न घेता? आता उपाशी राहील त्याचे काय? मी उचलला असता टाॅवेल." मीनाताई म्हणाल्या.

" आई, काही उपाशी वैगेरे राहणार नाही तुमचा मुलगा. मस्त हाॅटेलात हादडेल. तुमच्यापेक्षा मी जास्त ओळखते तुमच्या लेकाला." दीक्षा म्हणाली.

"पण घरचे ते घरचेच ना! कामावर जाताना कटकट करत जाऊ नकोस."

"कामावर जाताना कटकट करायची नाही. रात्र आहे म्हणून रात्री काही बोलायचे नाही. मग तुमच्या लेकाला कधी बोलायचे ते सांगा." दीक्षा म्हणाली. यावर मीनाताई काहीच बोलल्या नाहीत. सुनबाईंचा पारा एकदम वर टोकाला चढलेला आहे हे त्यांनी ओळखले आणि त्या मुकाट्याने रूममधला पसारा आवरू लागल्या.


"तुम्ही तुमच्या लेकाला अजिबात चांगल्या सवयी लावल्या नाहीत. त्या लावल्या असत्या तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती." दीक्षा म्हणाली.

" म्हणजे? काय म्हणतेस तू?"

" आता काय म्हणू माझ्या कर्मा! या राहूलला थोडी तरी शिस्त लावायची होती ना? हा बघा, टॉवेलचा बोळा करून कसा बेडवर टाकलाय. नाश्ता करून झालेली डिश उचलून बेसीनजवळ ठेवावी एवढे कॉमन सेन्स सुद्धा तुम्ही शिकवले नाहीत. आईच आहात ना?"

"हो ग हो. आता तुझ्याकडून हे शिकायचे का? माझ्या मुलीला मी हे सगळे शिकवले होते. आमच्यात पुरुष माणसे ही कामे करत नाहीत."

"हो का? तुमच्या महिला मंडळात परवा लेक्चर होते ना या विषयावर. तिथे तुम्ही अगदी हिरीरीने हा विषय मांडला होता. स्त्रियांना कसे कमी लेखले जाते, त्यांची कशी मुस्कटदाबी होते, या विषयावर तुम्ही खूप छान बोललात. चांगल्या टाळ्या पडल्या तुम्हाला, पण कुठल्याही सुधारणांची सुरुवात आपल्या घरापासून होते हे मात्र तुम्ही विसरलात.

लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण | तुमचे त्या इंदुरीकर महाराजांसारखे चाललंय. ते इतरांना कीर्तनामधून कसे वागावे याचे मारे धडे देतात, आणि स्वतः मात्र ते अंगीकारत नाहीत. लोकांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे आणि त्यात चुकीचे काय?

लोकांच्या पोरीबाळींना, बायकांना काहीही बोलायचे आणि स्वतःचे, स्वतःच्या मुलीचे वागणे कसे? आहे का त्या बोलण्याला शोभेसे? तसेच तुमचे झाले आहे. तुम्ही मारे स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारता, पण तुम्हीच या असमानतेला हातभार लावता हे सोयीस्करपणे विसरता."


"असे कसे म्हणतेस? तुला आमच्या घरात कसली बंधने आहेत का? राहुलला जेवढी मोकळीक आहे तेवढीच तुलाही दिलेली आहे. कुठल्याच बाबतीत तुझ्यावर आम्ही कधी बंधने घातली आहेत का? तरीही तू अशी बोलतेस! हे शोभत नाही तुला."

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

सासुसुनांची जुगलबंदी चांगलीच रंगली आहे. आता पुढे काय होते ते पुढच्या भागात समजेल.
0

🎭 Series Post

View all