Login

योग्य वेळ भाग २

Family Drama

योग्य वेळ भाग २

म्हण:- तोंड दाबून मुक्क्यांचा मार

©® सौ. हेमा पाटील.


मागील भागात आपण पाहिले आहे, सासू आणि सुनेची जुगलबंदी रंगली आहे. लेकाला वळण लावले नाही म्हणून सून सासूला चार शब्द सुनावतेय. आता पुढे...


"आई, तुम्ही मला मोकळीक दिली आहे, हे मला मान्य आहे; परंतु तुमच्या मुलाने कसे वागावे याबद्दल मात्र तुम्ही डोळेझाक करता हे चुकीचे आहे. घरात त्याचीही काही कर्तव्ये आहेत हे तुमच्या का लक्षात येत नाही? या साध्या साध्या गोष्टी बालपणापासून त्याला शिकवल्या असत्या तर आज त्याच्या अंगवळणी पडले असते. आता त्याला शिकवणे म्हणजे महा कठीण कर्म! तुम्हीच सांगा, शिस्त लहानपणी लागते की मोठे झाल्यावर?" यावर मीनाताई म्हणाल्या,

" हो, शिस्त लहानपणीच लागते हे बरोबर आहे, पण ज्यावेळी राहूल लहान होता तेव्हा वातावरण वेगळे होते, आतासारखे नव्हते."

"असे कसे म्हणता आई? आनंदी गोपाळ जोशी या पहिल्या डॉक्टर झाल्या तो काळ आठवा. त्या काळात त्यांच्या पतीने त्यांना खंबीरपणे पाठिंबा दिला म्हणून त्या डॉक्टर होऊ शकल्या. हे त्यांचे काम त्या काळात शोभणारे कुठे होते?" हे ऐकल्यावर मीनाताईंनी आपल्या तोंडाला कुलूप घातले. आपली सून दीक्षा बोलण्यात अगदी फटाका आहे हे त्यांना अनुभवाने माहीत होते. आपल्याला तोंड दाबून मुक्क्यांचा मार खावा लागतोय हे समजूनही त्या शांत होत्या, कारण त्यांनाही दीक्षाचे बोलणे पटत होते. तिच्यासमोर आपण आपली बाजू मांडूच शकत नाही याची त्यांना कल्पना होती, त्यामुळे त्या एवढेच म्हणाल्या,

"आता लग्नानंतर माझा मुलगा मी तुझ्या पदरात घातला आहे. आता त्याचे काय करायचे ते तू बघ." यावर दीक्षा म्हणाली,

" वा छान! नर्मदेचा गोटा माझ्या पदरात बांधलाय. आता त्याचा गणपती बनवायचा की मारुती ते मी ठरवायचे, पण त्या गोट्याला आकार देणे इतके सोपे आहे का? मग मारे भाषणं काय देता समानतेची? " हे ऐकून मीनाताई म्हणाल्या,

"तीनदा माझ्या भाषणावर का घसरतेस? घरची माणसं ऐकून कौतुक करतील म्हणून बोलावलं होतं तुम्हाला. कौतुक राहिलं दूर, जळलं कधी नव्हे ते चार वाक्यं बोलले तर तू सारखी त्याचा उद्धार करते आहेस. त्या इंदूरीकर बाबाला पण आत्ताच लेकीचा साखरपुडा करायचा होता, तोपण दणक्यात. माझ्या भाषणाची वाट लागली का नाही त्यामुळे."

"आई, काय बोलताय? चार वाक्यं जी बोललात, तसे वागलात का? हा माझा प्रश्न होता. इंदूरीकरांचे मी फक्त उदाहरण दिले तुम्हाला. जाऊदेत. तुमचा लेक गेलाच आहे बिना डबा घेता. तरीही त्याच्यात सुधारणा होईल असे काही मला वाटत नाही. मलाच काहीतरी शक्कल लढवली पाहिजे." दीक्षा म्हणाली.

"आता काय माझ्या लेकाला रात्री पण उपाशी ठेवणार आहेस का काय? तसे काही चालणार नाही बरं का! आधीच सांगून ठेवतेय. लेकाला तुझ्या पदराशी बांधलाय याचा अर्थ मी हातावर हात धरून बसेन असे समजू नकोस." मीनाताई म्हणाल्या.

"हेच... अजून ही आपल्या लेकाचे काही चुकतेय हे तुम्हाला मान्य नाही. मी याबद्दल बोलतेय मघापासून. घरातील कामे करणे राहिले, पण किमान स्वतःच्या वस्तू तरी व्यवस्थितपणे ठेवायला नको? सगळे आयते हातात देण्याची जी सवय तुम्ही लावली आहे, त्याबद्दल बोलतेय मी. लहान आहे का तो आता? तुम्ही राबला असाल त्याच्या हाताखाली, मी असले लाड चालू देणार नाही. बघा वठणीवर आणते की नाही त्याला."

हे ऐकून मीनाताईंनी निमूटपणे लेकाचा बेडवर अस्ताव्यस्त पडलेला ओला टॉवेल उचलला आणि दोरीवर वाळत टाकला.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

काय होते पुढे? दीक्षा बदलू शकते का राहूलच्या सवयी? हे पुढील भागात पाहू...

0

🎭 Series Post

View all