योग्य वेळ भाग ३
म्हण:- तोंड दाबून मुक्क्यांचा मार
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, दीक्षा ने आपल्या नवऱ्याच्या सवयी बदलण्याचा विडा उचलला आहे. आता पुढे...
दीक्षा सासुबाईंना म्हणाली,
"आई, तुम्हाला एक सूचना देतेय, तेवढी फक्त पाळा काही दिवस. आमच्या रूममध्ये कितीही पसारा दिसला तरी अजिबात आवरायचा नाही. राहूलने खायला मागितले तर तुम्ही द्यायचे नाही. हाताने घे असे सांगायचे. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, बघू तो कसा वर्क करतोय."
" ठीक आहे, तुमच्या रूममध्ये पाऊलच ठेवत नाही. त्याने जर मी खात असताना मागितले तर? मग मी नाही असे म्हणू?" मीनाताई म्हणाल्या.
"हीच माया आड येतेय ना सगळ्याच्या. अहो, तुम्ही खाता खाता उठून त्याला देण्यापेक्षा जा हाताने घे असे सांगा ना."
"मला नाही बाई जमणार. लेकराला टाकून असं खात बसणं."
"आई, हद्द झाली तुमच्यापुढे. त्याला चांगल्या सवयी लावण्यासाठी हे करायचे आहे ना? तुमच्या लक्षात येतेय का, आयुष्यभर तुम्ही सगळ्यांचा पसारा आवरत बसलात. तेच प्रत्येकाला आपापली कामे करण्याची सवय लावली असती तर तुम्हाला मोकळा वेळ मिळाला असता. तुमची एनर्जी यातच वाया गेली नसती."
"आपल्या माणसांसाठी प्रेमाने करायला आवडते मला."
"आई, तुमचे ना काहीच होऊ शकत नाही. मी सांगतेय तेवढे तरी
करा."
करा."
"बरं." असे म्हणत मीनाताई बाहेर हाॅलमध्ये येऊन बसल्या. विलासराव टिव्ही पाहत बसले होते. ते मीनाताईंना म्हणाले,
"जरा पाणी आण गं ग्लासभर." हे ऐकल्यावर मीनाताईंना आठवले, दीक्षाने तिच्या नवऱ्याच्या हातात काही द्यायचे नाही असे सांगितले आहे. आपण यांना पण जरा तशीच सवय लावण्याचा प्रयत्न करूया असे त्यांना वाटले. त्या म्हणाल्या,
"उठा की स्वतः, अन् घेऊन या. तेवढेच पाय पण मोकळे होतील." विलासरावांनी विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहिले.
"बरी आहेस ना तू? मी सकाळी सहा किलोमीटर चालतो रोज. मला कसले पाय मोकळे करायला सांगतेस? त्याची गरज तुलाच आहे. सकाळी फिरायला चल म्हणून किती मागे लागलो तरी येत नाहीस." गाडी आपल्यावरच घसरली हे पाहून मीनाताईंनी मुकाट्याने आत जाऊन पाण्याचा ग्लास भरून आणला. यांच्या सवयी आपण बदलू शकत नाही हे त्यांना कळून चुकले.
संध्याकाळी जेव्हा राहूल कामावरून आला तेव्हा मीनाताईंनी त्याला चहा बनवून दिला. चहाची कपबशी तिथेच टीपाॅयवर ठेवलेली पाहून त्या म्हणाल्या,
"अरे, ती कपबशी बेसीनजवळ विसळून ठेव जा." आईकडे पाहत राहूल म्हणाला,
"तुला पण दीक्षा चावली वाटतं. ठेवतो नंतर." मीनाताईंनी निग्रहाने कपबशी उचलली नाही. तो टीशर्ट अडकवून बाहेर गेला. कपबशी तिथेच पडून होती. दीक्षाने आल्यावर विचारले,
"ही कपबशी कुणाची पडलीय?"
"तुझ्याच नवऱ्याची. तू मला सांगितले होतेस ना, काहीच उचलायचे नाही म्हणून. त्यामुळे मी उचलली नाही."
तेवढ्यात आलेल्या राहूलला दीक्षा म्हणाली,
"ही कपबशी का उचलली नाहीस तू? ही जर उचलली नाहीस तर उद्यापासून तुला चहा मिळणार नाही हे लक्षात ठेव."
"तू नको देऊस. मम्मी देईल."
"नाही. त्याही तुला चहा देणार नाहीत. मी त्यांना तशा सूचना दिल्या आहेत."
"तू सूचना दिल्या आणि मम्मीने ऐकल्या? विशेष आहे."
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
काय होते पुढे? राहूल मध्ये सुधारणा होते? पाहूया पुढील भागात.
