Login

योग्य वेळ भाग ४

Family Drama

योग्य वेळ भाग ४

म्हण:- तोंड दाबून मुक्क्यांचा मार

©® सौ. हेमा पाटील.

दीक्षाने सासूबाईंना सूचना दिल्या आहेत, त्याप्रमाणे वागण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. आता पुढे...

"राहूल, यासाठी मला आधी त्यांचे ब्रेनवाॅश करावे लागले. वर्षानुवर्षे त्यांच्या अंगवळणी पडले आहे. हे चुकीचे आहे हेच त्यांना मान्य नव्हते. आता कशातरी तयार झालेत."

"अगं, पण एवढा अट्टाहास कशासाठी? आपण एखादी बाई लावू शकतो. आपण दोघेही चांगले कमावतो."

"बायका दहा लावू शकतो, पण आपली कामे आपणच केली पाहिजेत. तेवढी तरी शिस्त आयुष्यात हवीच. त्यामुळे आता कुठलेही बहाणे न करता आपापले सामान जागेवर उचलून ठेवणे हा एकच पर्याय तुझ्यापुढे आहे."

दीक्षाचे बोलणे ऐकून मीनाताईंना आपली चूक उमगली. आपण या सर्वांना आधीपासूनच अशा सवयी लावल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती‌. आता नवऱ्याची सुधारण्याची गॅरंटी नाही, पण मुलाला मात्र चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत असे त्यांना वाटले.

रात्री सर्वांचे जेवण झाल्यावर दीक्षाने सांगितले,

"प्रत्येकाने आपापले ताट बेसीनपाशी नेऊन विसळून मग भांड्यात ठेवा घासायला." विलासरावांनी मीनाताईंकडे पाहिले. मीनाताईंनी निमूटपणे स्वतः सोबत त्यांचे पण ताट उचलले. राहूलने आपले ताट विसळून ठेवले. ते पाहून मीनाताईंना आनंद झाला. त्यांनी दीक्षाकडे पाहून अंगठा उंचावला.

आठ दिवसांत राहूल आपला पसारा आवरायला शिकला. चहाची कपबशी बेसीनपाशी जाऊ लागली. टाॅवेल दोरीवर वाळत घातला जाऊ लागला. हे पाहून मीनाताईंना आश्चर्य वाटले. दीक्षाचे त्यांना कौतुक वाटले. ही आजची पीढी भलतीच हुशार आहे असे त्यांना वाटले. पण आपण मात्र आपल्या नवऱ्याच्या सवयी बदलू शकत नाही याचे त्यांना दुःख झाले.

याबाबत त्या दीक्षाशी बोलल्या. त्यांनी दीक्षाचे कौतुक केले.

"या़ंच्या सवयी बदलण्यासाठी काय करावे लागेल?" असे त्यांनी तिला विचारले.

"आई, आता ते शक्य वाटत नाही. लोखंड गरम असतानाच त्यावर घाव घालायचा असतो. इतकी वर्षे तुम्ही आयते त्यांच्या हातात देत आलात. आता इतक्या वर्षांनंतर त्यांच्यात बदल होईल अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. तुमचे लग्न झाल्या झाल्या हे होऊ शकले असते. तेव्हा केलेली चूक आता आयुष्यभर निस्तरावी लागणार आहे तुम्हाला."
दीक्षाचे हे बोलणे ऐकून त्यांना वाटले,

बरोबरच बोलतेय दीक्षा. आता ताट उचला, अगर पाणी स्वतः उठून घ्या असे त्यांनी सा़ंगून बघितले होते. यावर त्यांनी मीनाताईंकडे जळजळीत कटाक्ष टाकला होता. मीनाताईंचे लग्न झाले त्यावेळी सासुबाईंनीच त्यांना ही सवय लावली होती, सगळ्यांच्या हातात नेऊन देण्याची. तेव्हा दीक्षासारखे धाडस करून आपण वागलो असतो, तर? पण हा विचार फक्त मनात आला आणि ते शक्यच नव्हते असे त्यांना वाटले.

आपण तेव्हा कितीही वाटले, तरीही दीक्षासारखे वागू शकलो नसतो. त्याकाळी तोंड दाबून मुक्क्यांचा मार खाणे आपल्या नशीबी होते. सासुबाईंसमोर ब्र शब्द काढायची आपली हिम्मत नव्हती. त्यामुळे आपण आता बदल करू शकत नाही. आता सूंभ जळला तरी पीळ कायमच राहणार आहे. हे स्वीकारलेच पाहिजे असे मनाशी म्हणत त्या चहाची कपबशी घेऊन बेसीनपाशी आल्या.

समाप्त. ©® सौ. हेमा पाटील.

कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा ही वाचकांना विनंती.
0

🎭 Series Post

View all