युती ! पार्ट 1

.
सलील जेलमधून बाहेर आला. घरी येताच त्याची नजर त्याच्या आईवर पडली.

" आई , तुझे दागिने कुठे आहेत ?"

आई काहीच बोलली नाही. सलीलने पुन्हा मोठ्या आवाजात विचारले. तेव्हा त्याची आई रडू लागली.

" तुझी जेलमधून सुटका व्हावी म्हणून विकून टाकले." आई रडतच म्हणाली.

" मला वाटत होते साहेबांनी सोडवले."

" तुझे साहेब तर भेटलेदेखील नाहीत. मेला हलकट."

" आई, साहेबांना शिव्या नको देऊ. नक्कीच काहीतरी काम असेल त्यांना. मी कपडे बदलतो. जेवायला वाढ. खूप भूक लागली आहे. "

" हो रे माझ्या राजा. तू जेलमध्ये होतास तेव्हा माझ्या घश्याखालीही अन्न जात नव्हते. तू पटकन हातपाय धुवून घे आणि कपडे बदल. मी जेवायला वाढते. "

सलील शर्ट बदलत असताना त्याच्या आईचे लक्ष पाठीवरच्या जखमांवर गेले.

" सलील, कसल्या जखमा आहेत या ? पोलिसांनी चोप दिला का ? तुला हजारदा सांगते की राजकारणापासून लांब राहत जा. अरे किती मारलं आहे नराधमांनी. ज्याच्यासाठी एवढं केलेस त्या तुझ्या साहेबाच्या अंगाला हात तरी लावला का कुणी ?" आई रागावत म्हणाली.

" अग आई जेव्हा क्रांती होते तेव्हा अश्या किरकोळ जखमा अंगावर घ्यावाच लागतात. साहेब जेव्हा सत्तेवर येतील तेव्हा एका एका जखमेचा वचपा काढतील. तू बघच आई. एकदिवस मीही मोठा नेता होणार. अगदी माझ्या साहेबांसारखा. "

सलीलने पोटभर जेवण केले. मग त्याच्या आईने जखमांवर मलमपट्टी केली.

***

रात्री सलीलचा फोन वाजला. त्याची आई गाढ झोपेत होती. विहानचा फोन होता. सलीलने फोन उचलला.

" सलील , पटकन बाहेर ये. "

सलील बाहेर आला. समोर विहान उभा होता. दोघेही गच्चीवर गेले. एकमेकांना आलींगण दिले.

" मी ऐकलं आहे तुला जेलमध्ये टाकलं म्हणे. "

" अरे हो. मी आंदोलनात सहभागी झालो म्हणून पोलिसांनी मला आत टाकलं होते. तू कुठे होतास ?"

" यार चुलत भावाचे लग्न होते म्हणून पुण्याला गेलो होतो. तिथे मोबाईल खराब झाला. तुला अटक झाल्यावर काकूंनी सर्वप्रथम मलाच फोन केला पण माझा फोन लागलाच नाही. काकूंकडे माझ्या आईवडिलांचा नंबर नव्हता. सॉरी यार. संकटकाळी मदत करू शकलो नाही. "

" असूदे रे. पण मला वाईट वाटतंय की आईला तिचे दागिने विकावे लागले. "

" सिरीयसली ? फार धक्कादायक आहे हे. पण तुझ्यावर एफआयआर तर लागला नाही ना ?"

" नाही रे. फक्त मारलं थोडं. "

" थोडं ?"

" खूप. "

" कशाला नादाला लागतो मग अनिलसाहेबांच्या ?"

" ए साहेबांबद्दल काही बोलायच नाही. माझे आदर्श आहेत ते. " सलील म्हणाला.

क्रमश...

🎭 Series Post

View all