युती ! पार्ट 2

.
" बर आईवडील पुण्यातच थांबले आहेत. घरी कुणी नाही. " विहान डोळा मारत म्हणाला.

" चल. "

दोघेही विहानच्या घरी गेले. दोघांनीही दारूची पार्टी केली.

" विहान , आपण किती भाग्यवान आहोत ना. म्हणजे लहानपणी शाळेत एकत्र होतो. मग कॉलेजमध्ये एकत्र. "

" तू मात्र एका वर्षातच कॉलेज सोडलं. "

" मला इंटरेस्ट नव्हता रे अभ्यासात. म्हणून चायनीजचा गाडा टाकला. तुझा जॉब मात्र मस्त चालू आहे. "

" हो. घट्ट मैत्री आणि भावासारखे प्रेम दोन्ही आहे आपल्या नात्यात. तुला राग येणार असेल तर एक बोलू. तो अनिल देशमुख मला चांगला माणूस वाटत नाही. एका मुलीने केस केलीय त्याच्यावर. "

" हल्ली काही मुली पैश्यासाठी आणि पब्लिसिटीसाठी खोटे आरोप लावतात. विरोधी पक्षाचे कारस्थान आहे हे. "

" मी सुनील रावांची पार्टी जॉईन करण्याचा विचार करतोय. "

सलीलला धक्काच बसला.

" वेड्या असे नको करू. साहेबांना बदनाम करण्यासाठी लाखो लोक फिरताय मार्केटमध्ये. अरे साहेब लाखात एक आहेत. तुला माझी शपथ. "

कसेबसे सलीलने विहानला समजवले.

विहानची बहीण प्रिया हिलादेखील राजकारणाची आवड होती. अनिल साहेबांनी आपल्या पक्षात एक नवीनच महिला शाखा उघडली होती. प्रियाला त्यात सामील व्हायचे होते.

" कशाला राजकारणात जायचे तुला ? मुलींना असले धंदे शोभत नाहीत !" विहानची आई ओरडली.

" आई , ती लहानपणीपासूनच किती छान भाषणे करते. साहेबांनी पक्षाची महिला शाखा तर उघडली आहेच. तिला त्यात जॉईन करतो. एकदा साहेबांची भेट घालून देतो. " विहान म्हणाला.

विहानने प्रिया आणि अनिल रावांची भेट घडवून आणली. प्रिया फार मन लावून पक्षात काम करू लागली. एकेदिवशी अनिल रावांनी प्रियाला एकांतात गाठले. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

" ये ना जवळ. थोडं मजा करू. तुला नगरसेविकेचे तिकीट मिळवून देतो. " अनिल म्हणाला.

पण प्रियाने अनिलला ढकलले आणि ती पळून गेली. घरी हा प्रकार समजला.

" प्रिया , नक्की काय झाले होते ?" विहानने विचारले.

" दादा , त्याने फोन करून मला बंगल्यावर बोलावले. मग तिथे एका खोलीत माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. " प्रिया रडत म्हणाली.

विहानने रागात मूठ आवळली. त्याचे डोळे लालबुंद झाले.

" आताच बघतो त्याला. "

विहान जाणार इतक्यात त्याच्या वडिलांनी त्याला धरले.

" तुला माझी शपथ. जाऊ नको. या गोष्टीची कुठेच वाच्यता नको व्हायला. " विहानचे बाबा म्हणाले.

" तुझे बाबा योग्य बोलत आहेत. उद्या कोण लग्न करणार हिच्याशी ? देवाच्या कृपेने काही प्रकार घडला नाही. विहान तू शांत हो. " विहानची आई म्हणाली.

" तुम्ही दोघे आईवडील असून अस बोलताय ? तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला आणि तुम्ही शांत राहण्याचा सल्ला देताय?"

" ते फार मोठी लोक आहेत. तुझ्यावरच केस करतील. तुला मारायला गुंडे पाठवतील. " विहानचे बाबा म्हणाले.

विहानच्या आईवडिलांनी फार यत्न करून त्याला काही विपरीत करण्यापासून रोखले. पण त्याच्या मनातला राग काही केल्या शांत होत नव्हता. अखेरीस त्याने दुसरा पक्ष जॉईन केला. सलीलला हे कळल्यावर तो लगेच विहानला भेटायला गेला.

क्रमश...

🎭 Series Post

View all