युती ! पार्ट 3 ( अंतिम भाग )

.
" विहान , दुसरी पार्टी जॉईन केलीस ? चल साहेबांना भेट. त्यांची माफी माग. " विहानच्या खांद्यावर हात ठेवून सलील म्हणाला.

" मी त्या माणसाचे थोबाडही पाहणार नाही. " विहान रागात म्हणाला.

" तोंड सांभाळून बोल. "

" माझ्या बहिणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे त्याने. आता बोल साहेब तसले नाहीत. पब्लिसिटी स्टंट आहे म्हणून. "

सलीलला काय बोलावे सुचले नाही. थोड्या वेळाने तो म्हणाला ,

" साहेब दारूच्या नशेत असतील. गैरसमज झाला असेल काही तरी. "

" तुझ्या बहिणीसोबत अस झाले असते तर ? तू कुत्रा आहेस त्या अनिलचा. तुझी लायकी सतरंज्या उचलण्याची. "

" विहान.." सलीलने विहानचे कॉलर धरले.

" आजपासून आपली मैत्री , प्रेम , यारी दोस्ती सगळं संपलं. " विहान म्हणाला.

दोघांमधली मैत्री तुटली.

सुनील राव अनिल रावांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहिले. विहान सुनीलरावांचा प्रचार करत होता. अनिल रावांची काही रहस्ये माहिती असल्याने सुनील रावांना विहानची खूप मदत होत होती. जोशी काकांच्या कँटीनमध्ये सर्व कार्यकर्ते चहानाश्ता करायला जमायचे. विहान आणि सलील एकमेकांना बोलत नव्हते तरी एकमेकांना ऐकू जाईल असे टोमणे मारायचे. दोघांमध्ये कधी कधी खूप वादविवाद व्हायचे.

" जोशी काका , इन्कम टॅक्स वाल्यांची रेड पडली होती म्हणे सुनील रावांवर. " सलीलने टोमणा मारला.

" स्त्रियांवर कुदृष्टी टाकण्यापेक्षा चांगलंच आहे ब्लॅक मनी जमवणे. " विहान म्हणाला.

" गप्प बसा दोघेही. चहा नाश्ता घ्या आणि जा. " वृद्ध जोशी काका म्हणाले.

" तुम्ही कुणाला सपोर्ट करतात जोशी काका ?" विहान आणि सलीलने एकसुरातच विचारले.

" लोकशाहीला. बाळांनो , एक गोष्ट लक्षात ठेवा राजकारणात व्यक्तिपूजा फार घातक असते. डोन्ट क्रीटीसाईज पॉलिटीशनस , क्रीटीसाईज पॉलिसिज. कोणताही नेता किंवा कोणतेही सरकार परफेक्ट नसते. सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुक करायला हवे आणि सरकार कुठे कमी पडत असेल तर टीकाही करता यायला हवी. Dissent is essence of democracy. त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीचा आदर करायला शिकायला हवं. आमच्या काळात विचार पटले नाही तर नेते राजीनामा द्यायचे. कधी कधी एखाद्या घटनेची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायचे. आताचे नेते मात्र सत्तेसाठी कोणत्याही थराला जातात. कसलीच नैतिकता उरली नाही. असो. लोकशाही टिकली पाहिजे. सर्वात महत्वाचे " संपल्यावर इलेक्शन , जपा तुमचे रिलेशन. " राजकीय मतभेदामुळे तुमची मैत्री संपवू नका. "

विहान आणि सलील जोशी काकांना दुर्लक्ष करून पाय आपटत निघून गेले.

निवडणूकीचा निकाल लागला. तिसराच उमेदवार निवडून आला. विहान आणि सलीलची मैत्री पूर्वीसारखी राहिली नव्हती. पण विहानच्या आईवडिलांनी आणि सलीलच्या आईने दोघांना समजवले. अखेरीस सर्व काही विसरून विहान आणि सलील गच्चीवर एकमेकांना भेटले. निवडणूक हरल्याचे दुःख दोघांनाही होते. म्हणून दोघांनीही दारूची पार्टी केली. दोघेही नशेत होते. गप्पा मारता मारता राजकारणाचा विषय आला. सलील सुनील रावांच्या विरोधात बोलू लागला आणि विहान अनिल रावांच्या विरोधात बोलू लागला. दोघेही एकमेकांना शिव्या देऊ लागले. परिस्थिती बिघडली. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. दारूच्या नशेत सलीलने विहानच्या डोक्यावर दगड हाणला आणि विहान गच्चीवरून पडला. विहानच्या देहातून प्राणपाखरू उडाला. सकाळी सलीलला जेलमध्ये टाकण्यात आले. कोर्टात गुन्हा सिद्ध झाला. विहानच्या घरच्यांना हा आघात सहन झाला नाही. त्यांनी तरुण मुलगा गमावला होता. विहानची आई हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावली. मग विहानच्या वडिलांनी आणि बहिणीने घर सोडले. ते दुसऱ्या शहरात स्थायिक झाले. सलीलची आई प्रत्येक नेत्याच्या घरी जाऊन उंबरठा झिजवत होती. पण कुणीही कसलीच मदत केली नाही. सर्व नातेवाईकांनी तिच्याशी संबंध तोडले होते. तिचे खाण्याचे वांदे झाले. भीक मागण्याची वेळ आली. एकेदिवशी सलीलला आईचा फोन आला. आईशी बोलून सलीलने फोन ठेवला. टेबलावर असलेल्या वृत्तपत्रांवर एक बातमी छापून आली होती ,

" अनिल राव आणि सुनिल राव यांच्यात युती !"

©® पार्थ धवन

🎭 Series Post

View all