झापड भाग १

फसव्या स्वप्नांना बळी पडलेल्या तरुणाची कथा.
झापड  भाग १

©® अपर्णा परदेशी

सोनपुरात आज आनंदाचे वातावरण पसरले होते. जो तो फक्त गावातल्या मोठ्या बंगल्यावर होणाऱ्या सोहळ्याविषयी चावळत होता. सोनपुर गाव तसे छोटेसेच. महाराष्ट्राच्या कुठल्यातरी कानाकोपऱ्यात वसलेले. गावातील बहुतांशी लोक शेतीवाडी करणारी अशिक्षित मंडळी होती. तिथे सरकारी योजना कागदावर दिसण्याइतपत नावाला होत्या. म्हणून गाव तसा बराच मागासलेला होता.

त्या गावात नावाजलेला माणूस म्हणून 'जगताप' ओळखला जायचा. अतिशय श्रीमंत आणि राजकारणात मुरलेला म्हणून गावात त्याचा दबदबा होता. वरपर्यंत त्याची पोहोच असल्याने त्याच्या शब्दांना हवी तशी किंमत होती. आज त्याच्याच बंगल्यावर भव्य समारंभ होता. त्या समारभांचे एकमेव कारण म्हणजे जगतापचा एकुलता एक लाडका मिणमिणता दिवा 'कुमार.'.

कालपर्यंत घरभर रांगत फिरणारा कुमार एकाएकी चालायला लागला होता. तसा हा पण एक चमत्कारच म्हणावा लागेल. कारण कुमार तीन-चार वर्षाचा झाला तरी त्याला चालता येत नव्हते.

घराण्याला वारस हवा म्हणून जगताप आणि त्याच्या बायकोने बरेच नवस करून ठेवले होते. तेहतीस कोटी देवांपैकी एखाद-दुसरा देव त्यांच्या तावडीतून सुटका असेल. त्यातला कोणता देव पावला माहीत नाही. पण उशिरा का होईना त्यांच्या घरात पाळणा हलला. त्याचेच फलस्वरुप म्हणून कुमार जन्माला आला.

दीर्घ प्रतिक्षेनंतर घराण्याला वारस मिळाला म्हणून कुमारची विशेष दक्षता घेतली जायची. अतोनात कोडकौतुक व लाडाकोडात वाढवताना तो बोट दाखवेल ती पूर्व दिशा म्हणून सर्वच त्याच्या दिमतीला हजर असायचे. भरल्या घरात खात्यापित्या कुटुंबाची निशाणी म्हणून सुदृढतेच्या नावाखाली संगोपन झालेला कुमार चांगलाच गोलमटोल आणि लठ्ठ झाला होता. स्वतःचाच देह उचलायला त्याला कष्ट पडायचे. नंतर नंतर तर त्याला हालचाल करणेही अशक्य व्हायला लागले होते. अशाने तो उभा तरी कसा राहणार ?

डॉक्टर, वैद्य, हकीम अशा अनेक उपायांनी थकल्यानंतर कुणीतरी महात्म्याने कुमारचे वजन उतरवायचा सल्ला दिला. काही महिने तो अमलात आणताच कुमार मध्ये फरक दिसायला लागला. अचानक एक दिवस कुमारने स्वतःहून एक पाय उचलला. घरात आनंदाचे वातावरण पसरले. त्यात त्याने दुसरे पाऊल टाकताच जगताप आणि त्याची बायको अत्यानंदाने वेडे झाले. आपल्या घराण्याचा एकुलता एक वारस स्वतःच्या पायांवर चालायला लागला म्हणून त्यांनी सरळ पदस्पर्श सोहळाच आयोजित करून टाकला होता. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी, अजून काय ?

इथे त्या सोहळ्याची घोषणा व्हायचा अवकाश की जगतापच्या माणसांसहित स्वतःला त्याचे कार्यकर्ते म्हणवून घेणारे गावातले सर्वच झाडून कामाला लागले. गेल्या कित्येक दिवसांपासून ते कार्यकर्ते इतकी मेहनत घेत होते की, जसे काही हा कार्यक्रम त्यांच्याच घरचा होता. त्यांच्यातलाच एक म्हणजे 'तिलक'.

तिलक हा नुकताच मिसरूड फुटलेला गावातलाच वीस-बावीस वर्षाचा तरुण. त्याच्यावर त्याच्या जगताप साहेबांचा प्रचंड पगडा होता. रोल मॉडेल म्हणून तो जगतापचा फोटो पाकिटात ठेवायचा. जगतापचे पंचक्रोशीत वर्चस्व होते. लोक त्याला येताजाता सलाम ठोकायचे. त्याच्याभोवती लाळघोट्या माणसांचा गराडा असायचा. तिलकला ह्या गोष्टींचे फार अप्रूप वाटायचे. एक दिवस तो ही जगतापसारखा नावारूपास यावा असे त्याचे स्वप्न होते. त्याच्या ह्या स्वप्नपूर्तीसाठी एकमेव सोपा मार्ग म्हणजे खुद्द जगताप.

जगतापच्या दृष्टिपथात येण्यासाठी तिलक पूर्वीपासून मार्ग शोधत होता. अशातच जगताप आपल्या लाडक्या मुलासाठी खूप मोठा समारंभ आयोजित करणार असल्याची वार्ता त्याच्या कानापर्यंत येऊन पोहचली. त्या निमित्ताने का होईना, त्याला थेट जगतापच्या गोटात सामील व्हायची आयती संधी चालून आली होती. तिलकने याचा लाभ घेतला.

जगतापची नजर त्याच्यावर पडावी म्हणून तो त्याच्या घरी पडेल ती कामे करू लागला. तिथे तो घरगडी सारखा राबत होता. जगतापचा खास पंटर बनावा म्हणून त्याच्या लोकांचा शब्दनशब्द झेलत होता. गेल्या महिन्याभरापासून तो त्यांच्या दाराशी पडिक होता. त्याची निष्ठा पाहून एकदोन वेळा जगतापने त्याला शाबासकी पण दिली होती. "अशीच मेहनत करत राहशील तर एक दिवस माझ्याहून मोठा होशील." जगतापची अशी कौतुकाची थाप पाठीवर पडताच तिलक हवेत तरंगायला लागला होता.

जगतापसाठी त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. याचा परिणाम असा झाला की, काही दिवसांनी सर्वच छोट्या-मोठ्या कामांसाठी सर्वांनाच तिलकची गरज भासायला लागली. खरे तर तिलकलाही हेच हवे होते. जगतापचा वरदहस्त लाभण्यासाठी त्याला पहिली पायरी गवसली होती. आता दुसरी पायरी म्हणजे हा सोहळा व्यवस्थित पार पाडून दाखवायचा. जेणेकरून जगतापला तिलकवर भरवसा ठेवता येईल.

जगतापच्या पावलांवर पाऊल ठेवत तोही लोकांच्या मनावर राज्य करण्याची स्वप्ने बघत होता. जगतापच्या नजरेत आपली प्रतिमा तयार झाली की ते सहज शक्य होईल असे तिलकला वाटत होते. नकळत तो स्वतःला जगतापच्या जागी बघायला लागला होता. त्याच्या डोळ्यांवर झटपट प्रसिध्द होण्याची झापड पडली होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all