झापड भाग २

फसव्या स्वप्नांना बळी पडलेल्या तरुणाची कथा.
झापड भाग २

©® अपर्णा परदेशी

ठरल्याप्रमाणे समारंभाचा दिवस उजाडला. जगतापने आपल्या हौशेखातर काही बड्या लोकांना आमंत्रित केले होते. त्यांची तो उत्तम बडदास्त ठेवत होता. जाऊ तिथे खाऊ ह्या उक्तीप्रमाणे सर्वच एकमेकांना सहाय्य करत असल्याने इथेही बऱ्याच लोकांनी हजेरी लावली होती.

तिलक तिथे सकाळपासून उभाच्या उभा होता. सर्वीकडे तो जातीने लक्ष देत होता. तिथला सर्व थाटबाट पाहून श्रीमंतांच्या समारंभात तिलक हरखून गेला होता. इतकी सर्व मंडळी जगतापच्या घरी एका छोट्याशा गावातील सोहळ्यात हजर राहतात म्हणजे जगताप किती मोठा माणूस असेल याची त्याला कल्पना येत होती. इथली चमक धमक पाहून त्याचे डोळे दिपले होते.

त्याला त्याचे वडिल सदानंदचे शब्द आठवत होते. राहुन राहुन त्यांचा रागही येत होता. ते त्याला सारखे जगतापपासून दुर राहायला सांगत होते. "असे लोक कुणाचेच सख्खे होत नसतात, वेळीच जागा हो. उद्योगधंद्याला लाग." असे ते त्याला बजावत होते. शिवाय हा कार्यक्रम म्हणजे नुसता देखावा आहे. श्रीमंतीचा बडेजाव मिरवण्यासाठी जगतापने असला शुल्लक कार्यक्रम ठेवला आहे, असे ते त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते.

पण तो कसलं ऐकतो ? वय तितकी बुध्दी. त्याला कुठे जगतापसारख्या लोकांचे छक्के पंजे माहीत होते. वरवर दिसणाऱ्या गोष्टींवर तो भुलला होता. त्याच्या डोळ्यावर झापड जी पडली होती. आपल्या वडिलांच्या तोंडून जगतापविरुद्ध एकही शब्द तो ऐकून घेत नव्हता. सदानंद त्याला कळकळीने समजावण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या मुलाने कुणाचेही अनुकरण करू नये, स्वबळावर उभे राहून खूप प्रगती करावी असे सदानंदला वाटायचे. परंतु, पालथ्या घड्यावर पाणीच.

सकाळी सकाळी पुन्हा यावरून दोघांमध्ये वादविवाद झाला होता. ते त्याला रिकामटेकडे उद्योग सोडून पोटापाण्यासाठी कामधंदा करायला सांगत होते. त्यावर तो खूप चिडला होता. " तुम्ही स्वतः आयुष्यात काही केले नाही आणि मलाही काही करू देणार नाही. जगताप साहेब देवमाणूस आहेत. त्यांच्याबद्दल पुन्हा मला भडकवायचा प्रयत्न करू नका. नाहीतर मला कायमचे गमवून बसाल." असे खडे बोल सुनावत तो तावातावाने निघून आला होता.

इथला झगमगाट पाहून कळत नकळत त्याच्या मनात दोन्ही ठिकाणची तुलना होत होती.

सदानंदबद्दलचा राग बाजूला सारून तिलक समारंभात येणारा जाणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करण्यात गुंतला. तो एकनिष्ठतेने आणि प्रामाणिकपणे त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडत होता.

संध्याकाळपासून समारंभ चांगलाच रंगात आला होता. एकंदरीत पाहता दणकेबाज सोहळा साजरा झाला होता. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पाहुण्यांना काय हवं ते काय नको, ते सर्व तिलक आपुलकीने बघत असल्याने जिकडे तिकडे फक्त तिलक तिलकच ऐकू येत होते. स्वतःच्या नावाचा होणारा गवगवा ऐकून तिलक मनातल्या मनात कुठे मावत नव्हता. तिलकला आनंदाच्या भरात स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी वाटत होती.

आता आपले दिवस पालटतील. आपले काम पाहून जगतापसाहेब आपल्यावर खूप खुश होतील. आपल्याला नक्कीच त्यांच्या हाताखाली कायमस्वरूपी ठेऊन घेतील. त्यानंतर आपल्याला कधीच मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही. अशा बऱ्याच कल्पना रंगवत तो तिथे सर्वांच्या पुढे वाकत होता.

कुणीतरी धापा टाकत त्या गर्दीत तिलकला शोधण्यासाठी आले होते. त्याच्या मित्र भुवन होता तो.

" अरे चल लवकर, तूझ्या वडीलांना साप चावला. तोंडातून फेस येतोय. आपल्याला तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवावे लागेल." भुवन घाईघाईने त्याला ओढत घेऊन जाऊ लागला.

" काय ? कसं ? कुठे घडलं हे ?"

नुसती बातमी ऐकूनच तिलकचे हातपाय गळून पडले.

भरून आलेल्या डोळ्यांसमोर त्याच्या वडिलांचा काळानिळा पडलेला चेहरा अंधुकसा तरळत होता.

" अरे बाबा, शेतातून अंधारात घरी परतत असताना घडली ही घटना. तू चल. घाई करायला हवी. फार वेळ नाहीये आपल्याकडे." भुवन त्याच्या बाह्या खेचत होता.

अचानक त्याच्या डोक्यात विचार चमकला.

" तू हो पुढे. मी साहेबांची मोठी गाडी घेऊन आलो. चारचाकीत जिल्ह्याच्या ठिकाणी लवकर पोहचू आपण. तू निघायची तयारी करून ठेव."

" अरे, ते मोठे लोक. त्यांची गाडी आपल्याला कशाला देतील. मी बैलगाडी तयार ठेवायला सांगितली आहे."

भुवन शंकेने बोलला खरा. पण खरंच गाडी मिळाली तर कमी वेळात पोहचू असेही त्याला वाटून गेले.

" आता मी साहेबांचा खास माणूस आहे. मला देतील ते त्यांची गाडी. इथे मी त्यांची दिवसरात्र सेवा करतोय. माझ्यासाठी ते इतकं पण नाही करू शकणार का ? तू हो पुढे. मी गाडी घेऊन आलोच." टिलक आत्मविश्वासाने म्हणाला.

फार वेळ नव्हता म्हणून भुवन त्याच्यावर विश्वास ठेऊन आल्या पावली पुन्हा त्याच्या घराकडे पळत सुटला.

तो जाताच तिलक सैरभैर होऊन गर्दीत जगताप साहेबांना शोधत हिंडू लागला.

क्रमशः

🎭 Series Post

View all