झापड भाग ३ (अंतिम)

फसव्या स्वप्नांना बळी पडलेल्या तरुणाची कथा.
झापड भाग ३ (अंतिम)

©® अपर्णा परदेशी

एव्हाना बराच उशीर झाला होता. सोहळ्यातून बरेच लोक निघून गेले होते. उरलेले लोक खाण्यापिण्यासहित गप्पांचे फड रंगवत बसले होते. त्यांच्या सेवेसाठी जो तो तिलकला आवाज देत होता. त्यांच्याकडे त्याने दुर्लक्ष केले. त्याला फक्त साहेबांची गाडी आणि दवाखाना ह्या दोनच गोष्टी दिसत होत्या.

कुठल्यातरी कोपऱ्यात जगताप साहेब आपल्या मित्रांच्या संगतीत ग्लासवर ग्लास रीचवत होते. तिलकने त्यांना हुडकून काढले.

" साहेब, साहेब, कार हवी होती. वडिलांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी." तिलक एका दमात बोलून गेला.

सर्वांदेखत हा वर तोंड करून आपल्याकडे थेट आपली महागडी वस्तू मागतोय, म्हणून जगताप त्याच्याकडे रागाने पाहू लागला.

" काय रे जगताप, लायकी नसलेल्या माणसांना तू डोक्यावर बसवून ठेवले आहेस का ? कधीपासून इतका महान झाला तू. हा तर तुझी गाडी खेळण्यातली गाडी समजून मागतोय. " त्यांचा एक मित्र अडखळत बरळला.

" जगताप पायातली चप्पल पायात शोभून दिसते. डोक्यावर घालून फिरायची नसते. लाखाची गाडी असल्या भिकाऱ्यांना फिरायला देशील का आता ?" दुसऱ्याने पहिल्याची री ओढली.

तिलकला अपमानित झाल्यासारखे वाटले. पण त्याचे जगताप साहेब तसे नव्हते. माणुसकी होती त्यांना. त्याशिवाय का सर्व लोक त्यांच्या मागेपुढे फिरत होते. त्याने आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे पाहिले. जगतापच्या डोळ्यात नशा मावत नव्हती. दारूची की पैश्याची ? ते सांगणे जरा कठीण होते.

" तुझी हिंमत कशी झाली माझी गाडी मागायची. तुझ्या अवकातीत रहा. निघ इथून. कामे करायची सोडून मोठ्या तोंडाने गाडी मागतोय." जगताप साहेब रागाने लालबुंद होऊन त्याच्यावर डाफरले.

त्यांना जीभेचा तोल सांभाळता येत नव्हता ना स्वतःचा.

क्षणभर तो त्यांच्या आवाजाने गांगरला. त्यांच्या शब्दांनी त्याचा मेंदू तात्पुरता सुन्न झाला होता. त्यांनी त्याला त्यांच्या धारधार शब्दांनी धाडकन जमिनीवर आपटले होते. मघाशी आलेल्या आत्मविश्र्वासाची जागा आता लाचारीत रूपांतरित झाली.

" साहेब माझ्या वडीलांना सर्पदंश झाला आहे. तातडीने तालुक्याचा दवाखाना गाठायचा आहे. त्यांना दवाखान्यात सोडून लगेच तुमची गाडी जशीच्या तशी आणून देईल. देवा शपथ." तिलक गयावाया करत म्हणाला.

" गाडी काय तूझ्या बापाला फिरवायला घेतली होती का मी. तोंड वर करून मागायला लाज नाही वाटत ? लाखोंची गाडी आहे ती. तुमच्या सारख्यांची लायकी तरी आहे का त्यात बसायची." जगतापने त्याला सर्वांसमोर धारेवर धरले.

" साहेब, लवकर उपचार नाही मिळाले तर मरून जातील ते. दया करा माझ्यावर." तो त्यांचे पाय धरून विनवणी स्वरूपात याचना करू लागला.

सदानंदचा निस्तेज पडलेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर फिरत होता.

" अरे मेला तर मेला. एक तोंड खायचं कमी होईल घरातलं. तुझ्या डोक्यावरचा भार उतरेल. कशाला इतका खटाटोप करतोय त्या म्हाताऱ्यासाठी. उगाच माझाही वेळ फुकट घालवतोय. आज आनंदाचा दिवस आहे. त्यावर विरजण टाकू नको. आता जातो की माझ्या माणसांना बोलवून तुला हाकलायला सांगू." जगताप लालबुंद होऊन म्हणाला.

जगतापचा चढलेला आवाज ऐकून तिथे उपस्थित असलेल्या नजरा तिलकवर खिळल्या. काहींच्या नजरेत तुच्छता होती. तर काहींच्या नजरेत दया. सर्व त्याच्याकडे उपेक्षित नजरेने पाहत होते.

जिथे त्याच्या वाचून पान हलत नव्हते, तिथेच सर्वांसमक्ष त्याचा पाणउतारा करण्यात आला होता. तिलकला मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्याला त्यांच्या बोचऱ्या नजरा सहन होत नव्हत्या. खाली मान टाकून तो जायला वळला.

" तू पण ना जगताप, अशा भिकाऱ्यांना कशाला पायाशी जमा करून ठेवतो. यांची जागा दाराबाहेरच." तिथला एक दातओठ खात जाणाऱ्या तिलककडे पाहून म्हणाला.

" अरे हा समारंभ झाला की हाकलून देणारच होतो. असले लाळघोटे, फक्त कामापुरते जवळ बाळगायचे असतात. ह्यांचा काय भरोसा. उद्या आपल्यापेक्षा कुणी मोठा माणूस दिसला तर लगेच तिकडे तळवे चाटायला लागतील." दारूच्या नशेत जगताप त्याच्या मनातले कटू विचार बोलून गेला.

ते ऐकून तिलकची धुंदी एका क्षणात उतरली. आतापर्यंत पाहिलेल्या स्वप्नांची एका झटक्यात राखरांगोळी झाली होती. आपला वापर करण्यात आला की आपण तो होऊ दिला, याबद्दल त्याच्या मनात द्वंद निर्माण झाले होते.

त्याला मागे वळून पाहण्याची ही इच्छा झाली नाही. त्याच्या डोळ्यांवरची झापड गळून पडली होती. ज्याला तो आपले आदर्श मानत होता त्याच्याकडे माणुसकीच शिल्लक नव्हती.

तिलकने रडतच घरचा रस्ता धरला. सदानंदचा शब्दन शब्द खरा ठरला होता. आपण आपल्या वडिलांचे का नाही ऐकले याचा तो पश्चाताप करत होता.

जगतापचे त्याच्याबद्दलचे विचार ऐकून त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. ज्याच्यासाठी तो आपल्या वडिलांशी भांडला होता. कुणाचेच न ऐकता ज्या जगतापसाठी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहून त्याने आपले भविष्यपणाला लावले होते, त्याच जगतापच्या नजरेत त्याला काडीची देखील किंमत नव्हती. याचे त्याला सर्वात जास्त वाईट वाटत होते.

त्याच्या नजरेसमोर मरणासन्न अवस्थेत असलेला आपला बाप तरळला. झालेला अपमान गिळून तो पळत सुटला. भुवनने बैलगाडी जुपली असेल. बैलांना पिटाळून दवाखाना गाठायला हवा म्हणून तो वारा चिरत वेगाने घराकडे धावत होता.

धापा टाकतच तिलक घराजवळ पोहोचला. दुरूनच त्याला त्याच्या घराबाहेर खूप गर्दी दिसली. त्याला पाहताच लोकांनी त्याला वाट करून दिली. त्याच्या घरात त्याला जोरजोराने रडायचा आवाज येत होता.

तिलक मंद पावले टाकत पुढे पुढे जाऊ लागला. तो रडणारा आवाज अजून स्पष्टपणे कानावर पडायला लागला. त्याने आवाज ओळखला. त्याचा अंगाचा थरकाप उडाला. भीतीने छाती दडपून गेली. त्याचे सर्वांग घामाने डबडबले होते.

त्याने मोठया हिमतीने घरात डोकावून पाहीले. त्याची आई छाती बडवत धाय मोकलून रडत होती. आपल्या वडिलांच्या पार्थिव शरीरासमोर आक्रोश करत असणारी आई पाहून तो मटकन खाली बसला. त्याने दोन्ही हातांनी आपले डोके घट्ट पकडून पायाशी दाबून धरले. त्याला परतायला खरंच खूप उशीर झाला होता.

फसव्या स्वप्नांना बळी पडून चुकीच्या व्यक्तीला आदर्श मानण्याच्या नादात तो आपले डोक्यावरचे खरेखुरे छत्र कायमचे गमावून बसला होता.

समाप्त.

🎭 Series Post

View all